12 December 2017

News Flash

३९५. सूक्ष्मदर्शक भिंग!

जगाशी आपण वाद घालतो ते आपलं मत जगानं ऐकावं आणि मान्य करावं

चैतन्य प्रेम | Updated: July 21, 2017 4:07 AM

जगाशी आपण वाद घालतो ते आपलं मत जगानं ऐकावं आणि मान्य करावं, याच एकमेव हेतूनं. त्याचबरोबर जगाशी आपण संवाद साधू पाहतो त्यामागेही आपलंच मत जगाच्या मनावर बिंबवता यावं, हाच हेतू असतो.

आता इथं जे ‘जग’ म्हटलं आहे ते मागेच सांगितल्याप्रमाणे अवघी सृष्टी नव्हे. आपलं जग आपल्यापुरतं असतं. आपल्या जिवाभावाची माणसं, आपल्या रक्ताच्या नात्याची माणसं, आपले परिचित, आपले मित्र आणि आपले शत्रू, आपले सुहृद आणि आपले वैरी.. या साऱ्यांनी आपलं ‘जग’ बनलं असतं. ‘मी’ हाच या माझ्या जगाचा स्वाभाविक केंद्रबिंदू असतो आणि त्यामुळे या ‘मी’च्या वकिलीसाठी, त्याच्या भलामणीसाठी, त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी, त्याच्या जपणुकीसाठी आपण प्रसंगी वाद घालतो किंवा संवाद साधू पाहतो.

बरं, हा संवादही आपण त्याच लोकांशी साधू पाहतो ज्यांच्यावर आपण भावनिकदृष्टय़ा अवलंबून असतो.. किंवा जे दुरावले तर आपल्या भावनिक, मानसिक स्थिरतेला धक्का पोहोचेल, असं आपल्याला वाटत असतं. प्रत्यक्षात आपलं सुख, आपला आनंद असा जगावर अवलंबून राहू लागला तर आपण मानसिक आणि भावनिकदृष्टय़ा किती कमकुवत बनतो, हे आपल्या लक्षात येत नाही. जगात जर काहीच शाश्वत नसेल.. अगदी ‘मी’ आणि ‘माझा’ भासणारा हा देहसुद्धा शाश्वत नसेल, तर मग माझ्यासारखंच अशाश्वत असलेलं हे जग म्हणजेच या जगातली ‘माझी’ माणसं मला अखंड शाश्वत सुख ते कसलं देणार! या जगातला प्रत्येक माणूस त्याच्या-त्याच्या जगातच जगतो आहे, आपापल्या जगाचा जो-तो स्वत:च केंद्रबिंदू आहे, जगातला प्रत्येकजण स्व-सुखासाठी पराधीन आहे! दुसऱ्या अशाश्वत आधारावरच अवलंबून आहे. मग माझ्या सुखाची या जगाला पर्वा कुठून असणार?

तेव्हा आशा, अपेक्षा, हट्टाग्रह आणि दुराग्रहातून या जगात सुरू असलेली माझी स्वार्थप्रेरित वाद आणि संवादाची धडपड जेव्हा थांबेल तेव्हाच ‘मी’च्या अवाढव्य उंबरठय़ापलीकडे लक्ष जाईल! आपला अहंभावच या वाद आणि संवादाला कारणीभूत असतो, ही जाणीव झाली की तो अहंभाव सुटावा असं वाटू लागेल. तो सुटणार मात्र नाही बरं का!

सद्गुरूची प्राप्ती होऊन त्याच्या बोधाप्रमाणे जोवर जगणं सुरू होत नाही तोवर अहंकाराला किंचितसा धक्कादेखील लागत नाही, हे खरं. पण तरीही साधनपथावर पहिली पावलं टाकणारा माणूस वाचून, ऐकून आणि कधी सत्पुरुषांच्या बोलण्यानं प्रभावित होऊन आपल्या अहंभावाबाबत सजग होतो. हा अहंभाव गेल्याशिवाय परमात्मा प्राप्त होऊ  शकत नाही, ही भावना जागी झाल्यानं आपला अहंभाव आपल्याला जाणवू मात्र लागतो. त्यासाठी सूक्ष्म विचारक्षमतेच्या जोरावर मन सूक्ष्मदर्शक भिंगच होतं जणू! मग आपल्या वागण्या-बोलण्याकडे प्रामाणिक साधक सूक्ष्म लक्ष देऊ  लागतो. असं लक्ष दिलं की आपल्या वागण्या-बोलण्यामागे असलेला आपला सूक्ष्म अहंकार जाणवू लागतो.

 

 

First Published on July 21, 2017 4:07 am

Web Title: samarth ramdas philosophy 267