13 December 2017

News Flash

३९७. विभक्ती प्रत्यय!

आचरणातले दोष कळू लागले की ते लगेच दूर होतील

चैतन्य प्रेम | Updated: July 25, 2017 5:07 AM

आचरणातले दोष कळू लागले की ते लगेच दूर होतील, असं नाही. मात्र पूर्वी त्या दोषांची जाणीवच होत नव्हती, आता ती होऊ  लागली, एवढं तरी घडेल? मग जे अखंड समाधान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्यात हे दोष कसे अडसर बनून उभे ठाकले आहेत, हे जाणवू लागेल. आचरण लगेच सुधारणार नाही, पण संथपणे का होईना त्या दिशेनं पावलं पडू लागतील. सत्पुरुषांचा सहवास असेल तर मग जाणवेल की आचरण सुधारण्याचा अभ्यास स्वबळावर अशक्य असला तरी काहीतरी साधना, परमात्मचिंतनाचा काही उपाय अमलात आणला की तो अभ्यास अधिक सजगतेनं होऊ  लागतो. मग सत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे वागू लागलो की आचरण सुधारू लागतं. आचरण सुधारलं की हातून घडणाऱ्या क्रियांमध्ये फरक होऊ  लागतो. स्वार्थकेंद्रित क्रियांचं प्रमाण कमी होतं आणि पावलं भक्तिपंथाकडे वळतात. समर्थ म्हणूनच म्हणतात की, ‘‘क्रियापालटें भक्तिपंथेंचि जावें!’’ हे मना तुझ्या हातून होणाऱ्या क्रियांमध्ये, तुझ्या कृतींमध्ये जसजसा बदल होईल तसतसा तू भक्तीच्या वाटेवर अग्रेसर होशील.

याचं कारण असं की, आजवर घडणाऱ्या सर्व क्रिया, माझी कृत्यं ही संकुचित होती. ‘मी’पणाच्या ऊर्मीतून घडत होती. त्यात व्यापकतेचा, परमात्म जाणिवेचा विसर होता. त्या कृत्यांचा केंद्रबिंदू जेव्हा ‘मी’ राहणार नाही तेव्हा आपोआप ‘तू’ची जाणीव वाढेल. म्हणजेच हे जे जीवन आपल्याला लाभलं आहे ते आपल्या कर्तृत्वानं नव्हे. आपल्या जडणघडणीत अनेक अन्य व्यक्तींचा आणि परिस्थितीचाही हातभार आहे. तेव्हा मी माझ्यापुरता स्वार्थाध विचार करत जगणं चुकीचं आहे, ही जाणीव होऊ  लागेल. मग मुळात जन्म परमात्मकृपेनं लाभला आहे ही जाणीवही होऊ  लागेल. जन्मच नव्हे तर आपलं जगणंही आपल्या कर्तृत्वाचं नाही. आपल्या जगण्याचा आधार असलेली चैतन्यशक्ती ही स्वउपार्जित नाही. या सुप्त जाणिवेतूनच माणसाचं भक्तिमार्गाकडे लक्ष जातं. अर्थात या वाटचालीचा प्रारंभ काही व्यापक हेतूतून झाला नसतो. आपल्याला लाभलेल्या अनुकूल परिस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि अशीच परिस्थिती कायम टिकावी, या प्रार्थनेसाठी किंवा वाटय़ाला आलेली प्रतिकूल परिस्थिती टळावी हे साकडं घालण्यासाठी माणूस ‘भक्ती’ करू लागतो! विशिष्ट वारी विशिष्ट देवतेच्या मंदिरात जाणं, विशिष्ट दिवशी विशिष्ट स्तोत्र म्हणणं, विशिष्ट दिवशी विशिष्ट जप करणं वा उपवास करणं, अशी या ‘भक्ती’ची सर्वसामान्य रीत असते.

त्यात गैरही काही नाही. कारण अशा ‘भक्ती’तूनच का होईना आणि हळूहळू का होईना, पण खरी भक्ती याहीपेक्षा अधिक असली पाहिजे, हे जाणवू लागतं. मग खरी भक्ती काय असावी, याचा विचार मनात सुरू होतो. सत्पुरुषांच्या सांगण्यातून आणि संतसाहित्यातून हे समजू लागतं की, ‘‘परमात्मा हाच आनंदाची खाण आहे. खरा अखंड आनंद हवा असेल तर परमात्म्याचाच आधार घेतला पाहिजे. त्या परमात्म्यापासून विभक्त आहोत म्हणूनच त्या आनंदाला पारखे आहोत. हा विभक्तपणा संपला की खरी भक्ती आपोआप सुरू होईल आणि मग खरा परमानंद लाभेल!’’ हे सगळं आपण वाचतो, ऐकतो खरं, पण तरीही वाटतं की हे सारं शाब्दिकच आहे. प्रत्यक्षात हे शक्य तरी आहे का? नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या आपल्या विद्यार्थ्यांची छायाचित्रं एखाद्या शिकवणी वर्गाच्या जाहिरातीत झळकतात. ती पाहून आपण आपल्या मुलांना त्या शिकवणीत दाखल करतो, पण ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास यांच्या तसबिरी बघून आपण भक्तिमार्गावर दाखल होत नाही! हात जोडून बाजूला होतो आणि ‘मी-माझे’, ‘तू-तुझे’नं व्यापलेल्या ‘विभक्ती प्रत्यया’तच रमतो!

 

First Published on July 25, 2017 5:05 am

Web Title: samarth ramdas philosophy 268