13 December 2017

News Flash

३९८. दाखला!

तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास, एकनाथ, जनाबाई आदी अनेकानेक संतांची चरित्रं आपल्याला माहीत असतात

चैतन्य प्रेम | Updated: July 26, 2017 4:02 AM

तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास, एकनाथ, जनाबाई आदी अनेकानेक संतांची चरित्रं आपल्याला माहीत असतात; पण त्या चरित्रातून बोध घेऊन आपणही भक्तिमार्गावर दृढपणे चालावं, असं काही आपल्याला वाटत नाही, कारण संतांची गोष्टच निराळी, ते अवतारी होते, असं म्हणून आपण पळवाट शोधून काढतो. भक्तिमार्गात जर फार पुढे गेलो तर प्रापंचिक जबाबदाऱ्यांचं काय होईल, हा एक ढाल-प्रश्नही असतोच! जणू त्या जबाबदाऱ्या आज आपण अगदी बिनचूक पार पाडतोच आहोत! पण भक्तिपंथावर जर आलो आणि खरे भक्त झालो तर तो परमात्मा आपली पूर्ण काळजी घेतो, हे समर्थ आता सांगत आहेत. ‘मनोबोधा’च्या ११६ ते १२५ या दहा श्लोकांत, ‘नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी,’ हीच ग्वाही समर्थ देत आहेत. या सर्व दहा श्लोकांत तपस्वी राजा अंबरीश, ऋषीपुत्र उपमन्यू, राजपुत्र ध्रुव, गजराज गजेंद्र, पापकृत्यांत जन्म गेलेला अजामिळ, असुरपुत्र प्रल्हाद, ऋषीपत्नी अहिल्या आणि द्रौपदीसाठी भगवंतांनी कशी धाव घेतली, याचं वर्णन आहे. दशावतारांचाही उल्लेख आहे. अजामिळ, प्रल्हादाची कथा, त्यावरील चिंतन मागेच आलं आहे म्हणून त्यांची पुनरुक्ती टाळून आपण अन्य कथांचा अत्यंत संक्षेपानं विचार करणार आहोत. या कथा तशा सर्वपरिचित असल्यानं त्यांचा काही वेगळा संकेत आहे का, याचाही आपण थोडा मागोवा घेणार आहोत. प्रथम हे श्लोक आणि त्यांचा प्रचलित अर्थ तेवढा आपण पाहू. हे श्लोक असे आहेत :

बहू श्रापितां कष्टला अंबऋषी।

तयाचे स्वयें श्रीहरी जन्म सोशी।

दिल्हा क्षीरसिंधू तया ऊपमानी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी।। ११६।।

धुरू लेंकरूं बापुडें दैन्यवाणें।

कृपा भाकितां दीधली भेटि जेणें।

चिरंजीव तारांगणीं प्रेमखाणी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी।। ११७।।

गजेंद्रू महासंकटीं वाट पाहे।

तयाकारणें श्रीहरी धांवताहे।

उडी घातली जाहला जीवदानी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी।।११८।।

अजामेळ पापी तया अंत आला।

कृपाळूपणें तो जनीं मुक्त केला।

अनाथासि आधार हा चक्रपाणी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी।। ११९।।

प्रचलित अर्थ : विष्णुभक्त अंबरीश राजा याच्या वाटय़ाला दुर्वास मुनींच्या शापाने जे कष्ट आले ते सर्व भगवंतानं सोसले. तसंच ऋषिपुत्र उपमन्यू याला दुग्धसागर असा क्षीरसागरच बहाल केला. देवाला भक्ताचा अभिमान असल्यानं आपल्या भक्ताची उपेक्षा तो कधीच करत नाही (११६). लहानग्या ध्रुवाला सावत्र आईनं आसनावरून उतरवलं तेव्हा त्याच्या आंतरिक तळमळीनं भगवंतानं प्रसन्न होऊन त्याला अढळपद दिलं (११७). जलक्रीडेत दंग असलेल्या गजराज गजेंद्राचा पाय एका मगरीने धरला. स्वत:चं, आपल्या परिवाराचं आणि आप्तांचं अजस्र बळ लावूनही गजेंद्राची सुटका होईना तेव्हा त्याच्या आर्त प्रार्थनेसरशी देवानंच धाव घेतली (११८). पापाचरणात रत अशा अजामिळाचा अंत ओढवला तेव्हा ‘नारायण’ या लाडक्या पुत्राला त्याने हाका मारल्या. त्या ‘नामा’च्या आधारावर देवानं त्यालाही आधार दिला (११९).

आता मननार्थाकडे वळू. हे श्लोक वाचताना अगदी प्रथम काही जणांच्या मनात येईलच की, आताचा काळ कुठला आणि त्यात या कथा कुठल्या? देवानं त्या काळी धाव घेतली असेलही, पण आज तो घेईल का? या कथांवर विश्वास ठेवून नि:शंक होता येईल का?.. समर्थाच्या काळीही हाच प्रश्न काहींच्या डोक्यात आलाच असेल! नाही का?

 

 

First Published on July 26, 2017 4:02 am

Web Title: samarth ramdas philosophy 269