12 December 2017

News Flash

४०० : भातुकली.. खरी आणि खोटी

उपमन्यूची कथाही प्रसिद्धच आहे. वसिष्ठ कुलात जन्मलेला हा व्याघ्रपाद ऋषींचा ज्येष्ठ पुत्र.

चैतन्य प्रेम | Updated: July 28, 2017 4:26 AM

उपमन्यूची कथाही प्रसिद्धच आहे. वसिष्ठ कुलात जन्मलेला हा व्याघ्रपाद ऋषींचा ज्येष्ठ पुत्र. याचा धौम्य हा कनिष्ठ भाऊही पुढे ऋषी म्हणून विख्यात झाला. उपमन्यू लहान असताना घरी आत्यंतिक दारिद्रय़ होतं. त्याला त्याची माता पाण्यात पीठ कालवून ते दूध म्हणून देत असे. एकदा त्याच्या मित्राची माता गाईचे दूध काढताना त्याने पाहिली. ते धारोष्ण दूध त्यालाही प्यायला मिळाले. दुसऱ्या दिवशी घरी आईनं पाण्यात पीठ कालवून ते दूध म्हणून त्याला प्यायला दिलं तेव्हा लहानगा उपमन्यू ते पिईना. मित्राकडे जसं दूध मी प्यायलो तसंच दूध दे, म्हणून तो हटून बसला. त्याची माता कळवळली. गाईचं दूध का देऊ शकत नाही, याचं काय कारण सांगणार ती? उपमन्यूला पोटाशी धरत ती म्हणाली की, ‘‘बाळा, आपण मागच्या जन्मी देवाची भक्ती केली नाही ना म्हणून या जन्मी आपल्या नशिबी दारिद्रय़ आलं आहे. तेव्हा गाईचं दूध कुठून मिळणार आपल्याला?’’ उपमन्यूनं आईचे डोळे पुसले आणि तो त्या देवाला शोधू लागला, ज्याच्या भक्तीअभावी दारिद्रय़ त्यांच्या वाटय़ाला आलं होतं! ईश्वराच्या शोधात असतानाच त्याचं चित्त त्या अज्ञात ईश्वराच्या विचारात असं काही एकाग्र होऊ लागलं की त्याच्या प्राप्तीनं आपल्याला काय साधायचं आहे, हेसुद्धा तो विसरला! त्याच्या त्या अनन्य भक्तीनं प्रभू प्रसन्न झाले आणि त्यांनी उपमन्यूला क्षीरसमुद्राचे म्हणजे दुधाच्या समुद्राचे आधिपत्यच दिले.  ध्रुवाची कथाही अतिविख्यात आहे. उत्तानपाद राजाची नावडती राणी सुनीती हिचा हा पुत्र. एकदा तो वडिलांच्या मांडीवर बसला असताना त्याची सावत्र आई सुरुची हिनं त्याला सिंहासनावरून खेचलं आणि त्याला ती खूप टाकून बोलली. अर्थात लहान निरागस ध्रुवाला अपमान आणि मान याची जाणीव कुठून असणार? सावत्र आईकडेही तो आई म्हणूनच तर पाहात होता. त्या भावनेला मोठा धक्का बसला. आपल्या पित्याच्या वात्सल्याला दुरावल्याची जाणीव झाल्याने लहानगा ध्रुव रडत रडत आपल्या आईकडे गेला. तिला मिठी मारून तो अधिकच हमसून रडू लागला तेव्हा आईही कळवळली. ‘‘बाळा, आपण देवाची भक्ती केली नाही म्हणून राजाच्या पोटी जन्मूनही तुला राज्यसुख नाही,’’  असं ती हुंदके देत सांगू लागली. तेव्हा पाच वर्षे वयाच्या छोटय़ा ध्रुवाच्या मनातही देव-जिज्ञासा जागी झाली. त्या देवाला भेटण्यासाठी तो निघाला तेव्हा वाटेत त्याला भक्तिमार्गाचे भाष्यकार महर्षी नारद भेटले. त्यांनी गुरुमंत्र देऊन ध्यानमार्गही शिकवला. देव भेटणारच असा प्रखर विश्वास आणि निष्ठापूर्वक साधना यामुळे ध्रुवावर भगवंत प्रसन्न झाले. लहानग्या ध्रुवाच्या मुखावाटे शब्द फुटेना तेव्हा प्रभूंनी हसून मोठय़ा वात्सल्यानं आपल्या शंखाचा स्पर्श त्याच्या गालाला केला तेव्हा ध्रुवाच्या तोंडून भगवंताची जी स्तुती झाली ते अजरामर स्तोत्र ठरले. एक राजा आणि एक सामान्य माणूस यांच्या कथेबरोबर एक राजपुत्र आणि एक ऋषिपुत्र अशा दोन बालभक्तांच्या कथांचा संकेत समर्थानी केला आहे आणि त्या कथांमध्येही काही रूपकं आणि काही संकेत दडले आहेत! या दोघांनाही त्यांच्या आईनं सांगितलं की, ‘देवाची भक्ती आपण केली नाही म्हणून हे दुख वाटय़ाला आलं आहे.’ दोघंही निरागस होते म्हणून त्यांना ते पटलंच, पण हे दुख दूर करण्याच्या उपायाकडेही ते म्हणूनच निग्रहानं आणि विश्वासानं वळले.

मोठे असते, तर कदाचित त्यांनी, भक्ती न केल्यानं दुख देऊ करणाऱ्या देवावरच टीका केली असती किंवा तो नाहीच, या ठाम समजुतीनं त्याचं दर्शन हीदेखील कल्पनाच आहे, हे गृहीत धरून सगळा जन्म जगाच्या भक्तीतच घालवला असता! लहानपणी भातुकली खेळताना रिकाम्या लाकडी बोळक्यातला भातही खराच वाटतो, मग न दिसणारा देव तरी खोटा का वाटावा? दोघं मोठे असते तर कदाचित भातुकलीसारखा प्रपंचही खराच वाटला असता का आणि खरी साधना भातुकलीच्या खेळासारखी खोटीच वाटली असती का? देवच जाणे!

First Published on July 28, 2017 4:26 am

Web Title: samarth ramdas philosophy 271