गजेंद्र आणि तो नक्र अर्थात मगर ही दोन्ही रूपकं म्हणून पाहिली तर काय जाणवतं? गजेंद्र हा जीव आहे आणि तो नक्र म्हणजे त्याला भवसागरात वारंवार खेचणारं प्रारब्धच आहे! ‘भागवत’ सांगतं की, हा खेळ हजार र्वष सुरू होता. जन्म आणि मृत्युरूपी ये-जाच जणू. जीव आपल्या संपूर्ण ताकदीनिशी प्रारब्धाच्या पकडीतू स्वत:ला सोडवू पाहतो. प्रारब्ध दिसायला प्रथम फार क्षुल्लक भासतं. पण जसजसे त्याचे पाश आवळले जाऊ  लागतात तसतशी सगळी शक्ती पणाला लावूनही अनेकदा त्याच्या पकडीतून सुटता येत नाहीच. आप्तमित्र, स्वकीय जन कुणी कुणीही त्यातून वाचवू शकत नाहीत. अखेर अंत:करणातील तळमळ जाणून परम तत्त्वाशी एकरूप सद्गुरूच धाव घेतात. ते प्रथम काय करतात? तर ‘सुदर्शनचक्र’ सोडून त्या नक्राचा शिरच्छेद करतात. म्हणजेच भ्रम, मोह आणि आसक्तीनं जीव प्रारब्धात भरच घालत असतो आणि जगणं अधिकच दु:खाचं करीत असतो. ‘सुदर्शन चक्र’ सोडून सद्गुरू प्रारब्ध खरं काय आहे, याचं सु म्हणजे चांगलं, वास्तविक दर्शन घडवतात. एकदा प्रारब्धाचं वास्तविक रूप कळलं आणि आपण मोहानं त्यात घालत असलेली भर लक्षात आली की आपोआप ती भर घालणं थांबेल.

आता आपण ‘मनोबोधा’च्या १२० आणि १२१व्या श्लोकाकडे वळणार आहोत. १२१व्या श्लोकात भक्त प्रल्हादाचा उल्लेख आहे. मात्र  प्रल्हादाबाबतही आधीच ९६व्या श्लोकात विवरण झालं असल्यानं त्याची पुनरुक्ती आपण टाळणार आहोत. तर प्रथम हे मूळ श्लोक आणि त्यांचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू.

हे श्लोक असे आहेत :

विधीकारणें जाहला मत्स्य वेगीं।

धरी कूर्मरूपें धरा पृष्ठभागीं।

जना रक्षणाकारणें नीच योनी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी।। १२०।।

महा भक्त प्रल्हाद हा कष्टवीला।

म्हणोनी तयाकारणें सिंह जाला।

न ये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोण्ही।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी।। १२१।।

प्रचलित अर्थ : देवाने ब्रह्मदेवासाठी मत्स्याचं रूप घेतलं. पृथ्वी समुद्रातळी जाऊ  नये म्हणून भगवान कूर्म म्हणजे कासव झाले. भक्तांच्या रक्षणासाठी वराह योनीतही भगवंताने अवतार घेतला. खरंच तो देव भक्तांचा अभिमानी आहे (१२०). राक्षस पित्याने अतोनात छळ केल्याने भक्त प्रल्हादासाठी ते नृसिंह झाले. त्या नरसिंहाच्या नेत्रांतून जणू आगीच्या ठिणग्याच बाहेर पडत होत्या. त्यामुळे त्याच्याजवळ जाण्याचीही कोणाची टाप नव्हती. असा तो देव भक्ताभिमानी आहे (१२१).

आता मननार्थाकडे वळू. १२०व्या श्लोकापासून दशावतारांचा दाखला समर्थ देत आहेत आणि हा प्रत्येक अवतार भक्तरक्षण साधण्यासाठी कसा होता, हे मांडत आहेत. १२० आणि १२१ या दोन श्लोकांत मत्स्य, कूर्म, वराह आणि नरसिंह या चार अवतारांचा उल्लेख आहे. पुराणकथेनुसार प्रलयकाळी ब्रह्मदेव निद्रिस्त झाले तेव्हा त्यांच्या मुखातून निघणारे वेद हरण करावेत म्हणून हयग्रीव नावाचा राक्षस त्यांच्याकडे गेला. तो वेद पळवून नेत असल्याचं पाहून भगवंतांनी मत्स्याचा अवतार घेत त्या दैत्याचा नाश केला आणि ते वेद ब्रह्मदेवाला आणून दिले. समुद्रमंथनाच्या प्रसंगी मंदार पर्वत बुडू लागला तेव्हा भगवंताने कूर्म अवतार घेत तो पर्वत आपल्या पाठीवर तोलून घेत वर काढला. मत्स्य आणि कूर्म अवतारांनंतर आता वराह आणि नरसिंह या अवतारांकडे वळू. या अवतारांचं वैशिष्टय़ असं की, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू या दोन दैत्य भावांपासून भक्तांचं रक्षण करण्यासाठी देवानं वराह आणि नरसिंह हे अवतार घेतले आहेत.