13 December 2017

News Flash

४०४. दशावतार : २

कृपा भाकितां जाहला वज्रपाणि।

चैतन्य प्रेम | Updated: August 4, 2017 4:37 AM

वराह आणि नरसिंह या अवतारांचं वैशिष्टय़ असं की, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू या दोन दैत्य भावांपासून भक्तांचं रक्षण करण्यासाठी देवानं हे अवतार घेतले आहेत. पुराण कथेनुसार हे दोघे भगवान विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय होते. यांनी एकदा विष्णू दर्शनाला आलेल्या सनत-सनकादि कुमारांचा अपमान केला होता. त्यामुळे, ‘पुढील जन्मी तुम्ही दैत्य व्हाल,’ असा शाप सनत कुमारांनी त्यांना दिला होता. अखेर माझ्याच हातून तुम्हाला मृत्यू येईल आणि मुक्ती मिळेल, असं विष्णूंनी त्यांना सांगितलं आणि या दोघांना हा दैत्यजन्म लाभला. या दोघांनी ब्रह्मदेव प्रसन्न व्हावा म्हणून उग्र तप केलं होतं आणि त्यांना कोणताही देव, दैत्य व मनुष्य कोणत्याही शस्त्रानं तुम्हाला मारू शकणार नाही, असा वर मिळाला होता. या दोघांनी अनन्वित अत्याचार सुरू केले आणि हिरण्याक्षानं पृथ्वीलाच रसातळाला म्हणजे सप्तपाताळातील सर्वात अखेरच्या पाताळात नेलं. तेव्हा तिच्या रक्षणासाठी भगवान विष्णूनं वराहअवतार घेत त्याला मारलं आणि पृथ्वीला वाचवून देव व मानवांचं रक्षण केलं. त्याचाच भाऊ  हिरण्यकशिपू यानं कालांतरानं आपला विष्णुभक्त पुत्र प्रल्हाद याचा अनन्वित छळ सुरू केला तेव्हा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी भगवंतानं नरसिंह अवतार घेत हिरण्यकशिपूला ठार केलं होतं. ही कथा आणि त्या अनुषंगानं चिंतन आपण ‘मनोबोधा’च्या ९६व्या श्लोकाच्या वेळी केलं आहेच. त्यामुळे त्याची पुनरुक्ती करीत नाही. आता पुढील म्हणजे १२२वा श्लोक आपण पाहणार आहोत. हा मूळ श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:

कृपा भाकितां जाहला वज्रपाणि।

तयाकारणें वामनु चक्रपाणि।

द्विजाकारणें भार्गव चापपाणि।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी।। १२२ ।।

प्रचलित अर्थ : इंद्राने करुणा भाकली तेव्हा बळीने हिरावलेले त्याचे समस्त ऐश्वर्य त्याला परत देण्यासाठी भगवान वामन रूपात प्रकटला. तपोनिष्ठ द्विजांच्या रक्षणासाठी चापपाणि परशुरामही झाला. देव भक्तांचा सांभाळ केल्याशिवाय राहत नाही.

आता मननार्थाकडे वळू. वामन अवताराची कथा ‘श्रीमतभागवता’च्या आठव्या स्कंधात अत्यंत विस्तृतपणे आहे. अत्यंत संक्षेपाने ती जाणून घेऊ. राजा बली हा प्रल्हादाचा नातू होता आणि अत्यंत उदार होता. युद्धात इंद्रानं त्याचं राज्य जिंकून घेतलं होतं आणि त्याला ठारही केलं होतं. पण शुक्राचार्यानी त्याला पुन्हा जिवंत केल्यानं बली त्यांचा शिष्य झाला आणि भृगु कुळातील द्विजांच्या पाठबळानं त्यानं इंद्रपदाच्या प्राप्तीसाठी शतयज्ञांचा संकल्प सोडला. त्यातील ९९ यज्ञ पूर्ण झाले. त्याच्या सामर्थ्यांपुढे निष्प्रभ होऊन इंद्रादी देव स्वर्गाचा त्याग करून गुप्त रूपात वावरू लागले. तेव्हा या समस्त देवांच्या अर्थात आपल्या पुत्रांच्या रक्षणासाठी अदितीने भगवान विष्णूचे तप केले. ते प्रसन्न होऊन भगवान वामन रूपात तिच्या पोटी अवतरित झाले. बलीचा यज्ञ सुरू होता तिकडे बटु वेशात भगवान गेले . या बटुमूर्तीला पाहून आनंदित झालेल्या बलीनं कोणतेही दान मागून घेण्याची विनंती केली. आणि कथा परिचितच आहे की वामनानं त्रलोक्य जिंकलेल्या बलीकडे तीन पावलं भूमी मागितली. शुक्राचार्यानी वामनाचं अवतार रहस्य जाणून बलीला सावध करण्याचा प्रयत्न केला, पण एकदा शब्द दिल्यानं आपण तो मागे घेणार नाही, असं बली म्हणाला. मग वामनानं व्यापक रूप धारण करीत दोन पावलांतच भूमी आणि स्वर्गादी लोक पादाक्रांत करीत बलीला पाताळात गाडलं तेव्हा बलीनं तिसरं पाऊल ठेवू देण्यासाठी आपलं मस्तक पुढे केलं. भगवंतांनी इंद्राला त्याचं ऐश्वर्य अशा प्रकारे परत तर केलंच, पण बलीला विश्वकम्र्यानं निर्माण केलेल्या आणि इंद्रादिकांनाही अप्राप्य अशा सुतल लोकांत स्थान दिलं. तिथं भगवंतांचं सान्निध्यही त्याला लाभत होतं. आपल्या मनात हे सारं वाचून अनेक प्रश्नही आले असतील.. ऐश्वर्य आणि पदासाठी तळमळणाऱ्यांना देव तरी कसं म्हणावं, असा प्रश्नही काहींच्या मनात उमटला असेल.. दशावतार विवेचन संपल्यावर आपण त्यावर थोडा विचार करणार आहोत.

 

 

First Published on August 4, 2017 4:37 am

Web Title: samarth ramdas philosophy 275