News Flash

४०५. दशावतार : ३

समर्थ रामदास विरचित ‘मनोबोधा’च्या १२२व्या श्लोकात परशुराम अवताराचा उल्लेख आहे

समर्थ रामदास विरचित ‘मनोबोधा’च्या १२२व्या श्लोकात परशुराम अवताराचा उल्लेख आहे- ‘द्विजाकारणें भार्गव चापपाणि!’ भगवान श्रीहरीनं जमदग्नी आणि रेणुकेच्या पोटी हा परशुरामाचा अवतार घेतला आहे. या अवताराची सविस्तर कथाही ‘भागवता’च्या नवव्या स्कंधात आहे. तिचा आपल्या या श्लोकाच्या विवेचनापुरता मागोवा घेऊ. क्षत्रिय वंशातील हैहयांचा राजा अर्जुन हा महिष्मती साम्राज्यावर राज्य करीत होता. त्यानं प्रखर दत्तउपासना केली होती. दत्तानं प्रसन्न होऊन त्यानं मागितलेल्या वरानुसार त्याला मनुष्यमात्रांपासून अजिंक्यत्व आणि एक हजार बाहूही दिले होते.  हजार बाहू लाभल्यानं तो सहस्रार्जुन म्हणून विख्यात झाला होता. एकदा तो आपल्या शेकडो सैनिकांसह शिकारीसाठी म्हणून दाट जंगलात गेला होता. त्या वेळी परतत असताना सर्वानाच तहानेनं व्याकूळ केलं. तोच त्यांच्या नजरेस जमदग्नी मुनींचा आश्रम पडला. मुनींनी त्यांना पाण्यासोबत फळं आणि उत्तमोत्तम खाद्यपदार्थही दिले. या निबिड अरण्यात एका साध्याशा आश्रमात राहणाऱ्या या मुनींना आपलं आणि इतक्या सैनिकांचं असं स्वागत साधलं तरी कसं, असा प्रश्न पडून राजाला आश्चर्यही वाटलं. तेव्हा मुनींकडे कामधेनू आहे, हे राजाला समजलं. तेव्हा ती कामधेनू आपल्यासोबत नेण्यास त्यानं सैनिकांना फर्मावलं. गाय विलाप करीत असताना सैनिकांनी तिला वासरासकट ओढून नेलं. परशुरामाला झाला प्रकार समजला तेव्हा संतापानं बेभान होत तो राजा गेला त्या दिशेनं वेगानं धावला. तीक्ष्ण कुऱ्हाड, भाले, धनुष्य आणि ढाल हाती घेत परशुराम अशा वेगानं निघाला होता की जणू हत्तींच्या कळपावर सिंहच झेपावत असावा. महिष्मतीत प्रवेश करीत असलेल्या राजाच्या सैनिकांना त्यानं गाठलं तेव्हा सहस्रार्जुनानं चतुरंग सेना त्याच्यावर सोडली. अजेय परशुरामानं त्या सैन्यांचा नि:पात केला. त्यानंतर संतापानं पेटून उठलेला सहस्रार्जुन आणि परशुराम यांच्यात घनघोर युद्ध झालं. त्या वेळी परशुरामानं आपल्या तीक्ष्ण कुऱ्हाडीनं त्याचे हजार बाहू कापून टाकले आणि त्याचा शिरच्छेद केला. हे पाहून सहस्रार्जुन राजाचे सर्व पुत्र भेदरून पळून गेले. कामधेनू सोबत घेऊन आश्रमात परतलेल्या परशुरामानं राजासकट हजारो सैनिकांची हत्या केल्याचं समजताच जमदग्नी दु:खी स्वरात म्हणाले की, ‘‘क्षमावृत्ती हा आपला तपस्वी लोकांचा गुण आहे, त्या विपरीत तुझं वर्तन झालं आहे. तेव्हा तू तीर्थाटनाला जा.’’ परशुरामानं त्याप्रमाणे वर्षभर तीर्थयात्रा आणि अनुष्ठानं केली. तो आश्रमात परतल्यावरचा एक प्रसंग माहीत आहेच की, एकदा जमदग्नींचा रेणुका मातेवर कोप झाला. तिला मारून टाकण्याची आज्ञा त्यांनी केली तेव्हा परशुरामानं तात्काळ आपल्या मातेचा आणि त्याला विरोध करणाऱ्या भावांचा शिरच्छेद केला. त्याच्या या ‘आज्ञापालना’नं प्रसन्न झालेल्या जमदग्नींनी त्याला वर मागण्यास सांगितलं तेव्हा या सर्वाना जिवंत करा आणि जे घडलं त्याचं त्यांना स्मरणही राहू देऊ  नका, असं परशुरामानं मागितलं. जमदग्नी ‘तथास्तु’ म्हणताच झोपेतून उठल्यागत सर्व जण जिवंत झाले. जसजसे दिवस जाऊ  लागले तसतसं सहस्रार्जुनपुत्रांचं मन सूडभावानं धगधगू लागलं. परशुराम काही कामानिमित्त आपल्या भावांसह जंगलात गेला तेव्हा या राजपुत्रांनी येऊन जमदग्नींचा वध केला आणि त्यांचं मस्तक घेऊन ते पळून गेले. मातेचा आक्रोश जसा कानावर पडू लागला तेव्हा अतिशय वेगानं परशुराम आश्रमात आला. त्यानं क्रोधानं महिष्मतीवर चाल करीत सर्व सहस्रार्जुन पुत्रांचा नि:पात केला. त्यानंतर विष्णूच्या या अवतारानं एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. तत्त्वचिंतक मात्र म्हणतात की, युद्ध हा जर क्षत्रियाचा गुण असेल, तर परशुरामानं पृथ्वी नि:क्षत्रिय केली नाहीच. कारण एक क्षत्रिय उरला होताच तो म्हणजे योद्धा परशुराम!

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 12:02 am

Web Title: samarth ramdas philosophy 276
Next Stories
1 ४०४. दशावतार : २
2 ४०३. दशावतार : १
3 ४०२. गजेंद्र-मोक्ष
Just Now!
X