समर्थ रामदासांनी ‘मनोबोधा’च्या १२३व्या श्लोकात दशावतारातील सातव्या अवताराचं अर्थात रामचरित्राचं पुण्यस्मरण केलं आहे. मत्स्य, कूर्म आणि वराह हे तीन अवतार पशुयोनीतले होते. नरसिंह हा अवतार पशुमानव रूपातला होता. वामन हा लहान मुलाच्या रूपातला, तर परशुराम हा क्षात्रवृत्तीच्या तपस्व्याचा अवतार होता. आता राम व कृष्ण, या समस्त योग प्रकाशित करणाऱ्या पूर्णावतारांना समर्थ स्पर्श करीत आहेत. तर आता रामचरित्रातील ज्या गोष्टींचा उल्लेख समर्थ करीत आहेत त्यांचा साधकासाठीचा अर्थ जाणून घेऊ. या. श्लोकात रामचरित्राचं सर्व सारच समर्थानी अत्यंत मनोज्ञरीत्या मांडलं आहे. पहिल्या चरणात अहिल्येचा संदर्भ आहे. प्रभू जेव्हा ताडका-वधानंतर अरण्यातून परतत होते तेव्हा सीतास्वयंवरासाठी गुरू विश्वामित्र त्यांना मिथिलापुरीकडे घेऊन निघाले. त्या वेळी वाटेत एक ओसाड आश्रम लागला. हा आश्रम कोणाचा आणि तो असा निर्जन का, असा प्रश्न राम व लक्ष्मण यांनी विचारला. तेव्हा विश्वमित्रांनी त्यांना सांगितलं की, हा आश्रम मुनी गौतम यांचा आहे. मग त्यांनी कथा सांगितली. अहिल्या ही ब्रह्मदेवाची मानसकन्या. सृष्टीतलं सर्व सौंदर्य एकवटून तिची निर्मिती झाल्यानं ती अत्यंत रूपवान होती. गौतम मुनींची ती पत्नी होती. देवराज इंद्राचं मन मात्र तिच्यावर जडलं होतं. एकदा गौतम मुनी नदीवर स्नानासाठी गेल्याचं पाहून त्यांचंच रूप धारण करून इंद्र कुटीत आला. अहिल्येशी रत होण्याचा प्रयत्न तो करीत असतानाच गौतम कुटीकडे परतले. इंद्राचा हीन हेतू लक्षात येताच त्यांनी त्याला शाप दिला आणि त्याची कोणी पूजा करणार नाही, असंही जाहीर केलं. अहिल्येलाही त्यांनी शिळा होशील, असा शाप दिला. प्रभू राम जेव्हा अवतार घेतील आणि या मार्गानं जात असतील तेव्हा त्यांच्या चरणाचा स्पर्श होताच तू पूर्ववत होशील, असा उ:शापही त्यांनी दिला. विश्वामित्रांनी ही कथा सांगितल्यावर रामांनी त्या शिळेला पदस्पर्श केला आणि अहिल्या प्रकट झाली. त्यानंतर सीतास्वयंवर झालं आणि रावणानं बंदी बनवलेल्या देवांना मुक्त करण्यासाठी प्रभू गेले, असा उल्लेख दुसऱ्या चरणातून प्रतीत होतो. आता तिसऱ्या चरणातच रामचरित्राचा अटीतटीचा उत्कर्षबिंदू लपला आहे! तो पाहण्याआधी पहिल्या दोन चरणांत साधकांसाठी असलेल्या बोधाचं मर्म जाणून घेऊ .

अहिल्या म्हणजे सुबुद्धी आणि सीता म्हणजे पूर्ण भक्ती. इंद्र म्हणजे इंद्रियं. सुबुद्धी ही इंद्रियांना वश झाल्यानं, इंद्रियांच्या विषयांत अडकल्यानं जडमूढ पाषाणवत झाली आहे. योग्य काय, अयोग्य काय, सत्य काय, असत्य काय, या साऱ्याची जाणीव लोपली आहे. या जिवाला जर परमात्म्याची पूर्ण भक्ती प्राप्त व्हावी असं वाटत असेल, तर सद्गुरूंचा चरणस्पर्श हवा, अर्थात सद्गुरू ज्या मार्गानं जातात त्या मार्गावर मी पडलं पाहिजे! त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मी चाललं पाहिजे. आता एवढय़ानं काही परिपूर्णता येत नाही. परीक्षा संपत नाही, उलट  सुरू  होते.

परम भक्ती प्रस्थापित व्हावी म्हणून ज्या अंतरंगात सद्वृत्तीला आश्रय मिळाला पाहिजे, त्या अंत:करणावर अहंकाररूपी रावण कब्जा करतो. त्या सद्वृत्तीला मुक्त करण्यासाठी आणि अहंचा निरास करून त्वममय असलेली परम भक्ती प्रकट करण्यासाठी सद्गुरूच प्रक्रिया सुरू करतो, पण तरीही हा संघर्ष अगदी ताणला जातो. भक्ताच्या आंतरिक हेतूंचीच ही कठोर परीक्षा असते. अशीच कठोर परीक्षा प्रभूंनीही घेतली होती. देवांची, भक्तांची, साक्षात सीतेची आणि रावणाचीही! आपल्या अंतासाठी रावणही अधीर झाला होता, पण त्याचाही जीव टांगणीला लागला होता. यातून सुटका केली ती बिभीषणानं! म्हणूनच ‘मनोबोधा’च्या १२३व्या श्लोकाचा तिसरा चरणही आहे बिभीषणाचाच!!