12 December 2017

News Flash

४०८. दशावतार : ६

‘मनोबोधा’च्या १२३ व्या श्लोकात समर्थ रामदास म्हणतात

चैतन्य प्रेम | Updated: August 10, 2017 6:10 AM

‘मनोबोधा’च्या १२३ व्या श्लोकात समर्थ रामदास म्हणतात, ‘अहल्येसतीलागि आरण्यपंथें। कुडावा पुढें देव बंदीं तयांतें। बळें सोडितां धाव घाली निशाणीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥’ यातल्या तिसऱ्या चरणाचा अर्थ रामानं युद्धाचा डंका वाजवला, असा प्रचलित आहे. पण हा जो ‘निशाणी’ शब्द आहे तो मोठा रहस्यमय आहे. ही निशाणी आहे लत्ताप्रहाराची. याच अर्थानं हा शब्द ‘मनोबोधा’त दुसऱ्यांदा आला आहे!  तो पाहण्याआधी ‘रामायणा’चं एक रहस्य जाणून घेऊ. रावण हा प्रभू रामांचा अनन्य पार्षद होता. जय-विजय या अनन्य भक्तांनी हिरण्याक्ष व हिरण्यकशिपू म्हणून जन्म घेतला, हे मागे सांगितलं आहेच. तेच दोघे कुंभकर्ण आणि रावण म्हणून जन्मले. या प्रत्येक जन्मात त्यांची अट एकच होती की आम्हाला मरण प्रभूकडूनच यावं! प्रभू अवतरित होण्याआधी रावणानं पाश्र्वभूमी तर मोठी भीषण तयार केली होती. असंख्य ऋषीमुनींना ठार मारलं होतं, अत्याचारांसाठी राक्षसांना पूर्ण सूट दिली होती. त्यामुळे प्रभूंना त्यांच्या लहानपणीच ऋषींच्या यज्ञ रक्षणासाठी जावं लागलं खरं, पण प्रभूंनीही अनाचाराचं मूळ कारण असलेल्या रावणाकडे लगेच मोर्चा वळविला नाही.  पुढे कैकेयी मातेनं चौदा वर्षांचा वनवास लादला; त्या वनवासातही प्रभू अधेमधे राक्षसांशी झुंजत होते, पण रावणाकडे लक्ष देत नव्हते! मग सीतामातेचं अपहरण झाल्यावर तिच्या शोधात फिरत असताना हनुमंताची भेट, सुग्रीवाशी मत्री, वालीचा वध, अंगदाला युवराजपद देणं यात एक वर्ष गेलं. अखेर हनुमंतांनी प्रभूंना सांगितलं की, ‘आपलं जे मुख्य उद्दिष्ट सीतामातेची सुटका, त्याचाच या सर्वाना विसर पडला आहे. काळ नुसता निघून जात आहे.’ मग प्रभूंनीही क्रोधावतार धारण केल्यावर लंकेवर स्वारी करण्याचं ठरलं. आता प्रथम हनुमानाला लंका पाहून यायला पाठवलं. जो गेल्या पावली सीतामातेला आपल्या खांद्यावर बसवून आणू शकत होता, त्याला ती परवानगी मात्र दिली नाही! मग हनुमान गेले, सीतामातेची अवस्था पाहिली, रावणाची लंका जाळली.. तरी काही ठोस घडेना तेव्हा रावणानं बिभीषणाला लत्ताप्रहार करून घालवून दिलं! बिभीषणाला अपमानित करण्याची रावणालाही इच्छा नव्हती, पण बळेच त्याला त्यागण्यासाठी जो लत्ताप्रहार करावा लागला तोच राम-रावण युद्धात निर्णायक ठरला. बघा हं, रामाचं नावही ज्या रावणानं उभ्या आयुष्यात घेतलं नाही आणि ज्या रामभक्तीला पूर्ण विरोध केला त्यानं बिभीषणाच्या महालात रामाची भक्ती चालू दिली होती! लत्ताप्रहार हे असं पाऊल ठरलं ज्यानं प्रभू राम क्रोधित झाले! आपल्या भक्तानं आपल्या वक्षस्थळी केलेला लत्ताप्रहार जो प्रभू भक्ताच्या प्रेमाची निशाणी म्हणून मिरवतो (हरिभक्तिचा घाव गाजे निशाणी – मनोबोध श्लोक ३७) तोच प्रभू आपल्या अनन्य भक्ताला कोणी लत्ताप्रहार केला तर सहन करू शकत नाही!  तेव्हा सद्गुरू साधकाची सुबुद्धी जागी करतो आणि आपल्या मार्गानं चालायला सांगून अंतकरणातली सद्वृत्ती मोकळी करण्यास वाव देतो आणि इथेच परीक्षा सुरू होते. पूर्ण भक्तीची प्राप्ती व्हावी, अशी साधकाची इच्छा असते, पण त्याची अहंरूपी देहबुद्धी त्या भक्तिभावाला गिळंकृत करून टाकत असते. अहंच्या जाळ्यात फसलेल्या आणि अडकलेल्या भक्तिभावाला बंधमुक्त करण्याची प्रक्रिया सद्गुरू सुरू करतात तेव्हा ही त्याच्यातील सद्वृत्ती आणि भक्तीचीच परीक्षा असते. जीवालाही अधेमधे प्रामाणिकपणे वाटतं की आपला अहंकार, आपली देहबुद्धी नष्ट व्हावी. पण तसा प्रयत्न करताच अहं अधिकच उफाळून यावा, अशी स्थिती उद्भवते. धड जगता येत नाही आणि धड मरणही येत नाही, यामुळे देहबुद्धीही कासावीस होत असते. अशा वेळी सद्गुरूविषयीच्या अत्यंत क्षीण अशा प्रेमभावाला जेव्हा हा अहंकार धक्का पोहोचवतो तेव्हा अहंच्या नाशासाठीचं निर्णायक युद्ध सुरू होतं!

 

First Published on August 10, 2017 6:10 am

Web Title: samarth ramdas philosophy 279