09 August 2020

News Flash

४१३. अज्ञान-कपारी

काणे महाराज द्रौपदीचा रूपकार्थ उलगडताना म्हणतात

काणे महाराज द्रौपदीचा रूपकार्थ उलगडताना म्हणतात की, “हे मना वासनांनी युक्त व द्रुतगतीने म्हणजे तलबुद्धीने प्रभू आत्मारामाचा चटकन निश्चय करून तो दृढ धारण करणारी अशी ही बुद्धिरूपी द्रौपदी भगवान कृष्णस्वरूप आत्मारामाची मानीव व प्रेमळ बहीण (आहे).” आता इथं ही बुद्धी वासनांनी युक्त असल्याचं का म्हटलं आहे? तर द्रौपदी ही जशी पाच पांडवांची पत्नी आहे तशीच साधकाची बुद्धी ही पंचमहाभूतांनी घडलेल्या देहात पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं यांच्या योगानं आसक्तीच्या प्रपंचात प्रथम अडकली आहे. प्रपंचात अडकलेली ही बुद्धी प्रपंचातही तल म्हणजेच द्रुत होतीच, फरक इतकाच की आसक्तीचा प्रपंच जोपासण्यासाठीच ती राबविली जात होती. जगानं जेव्हा या बुद्धीवर हल्ला चढविला तेव्हा प्रथम तिनं या प्रपंचाचाच आधार घेण्याचा प्रयत्न केला. जसं द्रौपदीनं वस्त्रहरणप्रसंगी प्रथम जगाचाच आधार घ्यायचा प्रयत्न केला होता. मात्र जेव्हा कृष्णाशिवाय कुणीही तारणहार नाही, हे उमगलं तेव्हा तळमळून तिनं केवळ कृष्णाचा धावा केला. त्याप्रमाणे प्रपंचातली कोणतीही गोष्ट आपल्याला शाश्वत आधार देऊ शकत नाही, हे जेव्हा या तल बुद्धीला पूर्ण जाणवलं तेव्हा तिनं प्रपंचाच्या आसक्तीचा त्याग करून एका आत्मारामालाच प्राप्त करण्याचा दृढ निश्चय केला. हा निश्चय होताच अंतस्थ आत्मारामानं तात्काळ धाव घेतली. काणे महाराज म्हणतात की, ‘अशा या प्रेमळ द्रौपदीसाठी म्हणजे शुद्ध बुद्धीकरिता सर्व इंद्रिये म्हणजे गायी यांचे लालनपालन करणारा गोपालकृष्ण, सर्व इंद्रियरूप गोपींच्या कळपात राहूनही त्यात न रमणारा आत्माराम शुद्ध बुद्धिरूप द्रौपदीच्या नामस्मरणाला भुलला व भावाचा भुकेला असा तो सर्व इंद्रियरूपी गोप-गोपी, गायी, देवांना मागे टाकून त्या तेजस्वी दिव्य अशा बुद्धीपाशी अखंड राहिला. त्यामुळे तिनं इच्छिलेल्या सर्व गोष्टी आपोआप झाल्या.’ आता जोवर ही तलबुद्धी प्रपंचातच होती तेव्हाही आत्मशक्ती हीच साधकाच्या सर्व जीवन व्यवहाराला कारणीभूत होती. थोडक्यात चतन्य शक्ती नसेल, आत्मशक्तीचं पाठबळ नसेल तर क्षणभरही माणूस जगू शकत नाही. मात्र जसं अग्नीच्या योगे उत्तम स्वयंपाक करून भुकेलेल्यांना तृप्त करता येतं त्याच अग्नीनं जाळपोळ करून संसारांची राखरांगोळीही करता येते. अगदी त्याचप्रमाणे चतन्यशक्तीच्या आधारावर जगताना आसक्तीच्या प्रपंचात रुतून जसं राहाता येतं त्याचप्रमाणे याच शक्तीच्या जोरावर साधनारत राहून निरासक्तही होता येतं. तेव्हा सर्व इंद्रियांच्या व्यवहारांना शक्ती पुरविणारा आणि वरकरणी  त्या इंद्रियव्यवहारांत गुंतलेला दिसत असूनही त्यापासून पूर्ण अलिप्त असलेला आत्माराम तलबुद्धी जेव्हा शाश्वताच्या प्राप्तीचा निश्चय करते तेव्हा तात्काळ तिच्या पाठीशी उभा राहातो. मग बुद्ध अवताराबाबत काणे महाराज म्हणतात की, “या कळिकाळात तोच आत्माराम असत् वृत्ती वाढल्यामुळे, ती फोफावल्याच्या योगाने, गुप्त रूपाने, बोध हेच ज्याचे स्वरूप म्हणजे ज्ञानरूप होऊन, या अंतकरणाच्या अनंत कपारीत, गुहेत राहिला आहे. म्हणून हे मना तू त्या बोधरूप आत्मारामचे स्मरण कर. तो भक्ताची कधीच उपेक्षा करीत नाही. इथं ‘तोच आत्माराम’ या शब्दांना फार महत्त्व आहे. हे दहाही अवतार एकाच परमात्म्याचे आहेत म्हणून शुद्ध बुद्धी शाश्वताशी एकरूप झाली की जो आत्मारामरूपी कृष्ण प्रकट होतो, असं गेल्या चरणांच्या अर्थविवरणात सांगितलं तोच आत्माराम आता बुद्ध रूपानं, बोध रूपानं प्रकटल्याचं काणे महाराज नमूद करतात. इथं त्यांनी ‘अंतकरणाच्या अनंत कपारीत,’ असा चित्रदर्शी आणि अत्यंत अर्थगर्भ असा शब्द वापरला आहे. याचं कारण आपण चांगला विचार करतो, सत् मार्गी आहोत, असं साधक कितीही समजत असला तरी त्याच्या अंतकरणाच्या अनंत कपारींमध्ये म्हणजे फटींमध्ये अनेक असत् वासना तरंग उमटत असतात. तिथपर्यंत पोहोचून मनाला निर्वासन करायचं तर सूक्ष्म ज्ञानबोधच प्रकटला पाहिजे!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2017 3:18 am

Web Title: samarth ramdas philosophy 285
Next Stories
1 ४१२. बोधचंद्र
2 ४११ (अ). अहिल्या व आत्मोद्धार!
3 ४११. दशावतार : ९
Just Now!
X