News Flash

४२३. सर्वग्राही

आपलं आजवरचं आयुष्य आपलीच रडकथा गाण्यात आणि दुसऱ्याची रडकथा ऐकण्यातच सरलं.

आपलं आजवरचं आयुष्य आपलीच रडकथा गाण्यात आणि दुसऱ्याची रडकथा ऐकण्यातच सरलं. आता मनात संताच्या चरित्रातील प्रसंग ऐकण्यात क्षीण का होईना, गोडी वाटू लागते. पण समर्थाना इतपत गोडी लागण्याचं कौतुक नाही. त्यांना अभिप्रेत असलेला साधक हा भावरसतन्मय आहे. त्याची अवस्था कशी आहे? तर, कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला! इथं जो ‘सर्व’ शब्द आहे ना तो मोठा विलक्षण आहे. एक तर तो साधक कथा ऐकतो ती ‘सर्व’ म्हणजे पूर्ण ऐकतो आणि दुसरा अर्थ म्हणजे जो ‘सर्व’ आहे त्याची कथा ऐकताना तो तल्लीन होतो. आता या दोन्ही अंगांनी थोडा विचार करू. आता सर्व किंवा पूर्ण कथा ऐकणं म्हणजे काय हो? बरेचदा संतांची चरित्रं किंवा पोथ्या आपण कशी  ऐकतो म्हणजेच वाचतो? तर जर ती काही भौतिक कामनापूर्तीच्या हेतूनं वाचत असू तर त्या भौतिकाची तळमळ आणि त्या जोडीला काही प्रमाणात श्रद्धा आणि बऱ्याच प्रमाणात अविश्वास याची भेसळ, असं आपलं वाचणं म्हणजेच ऐकणं असतं. आता वाचणं म्हणजे ऐकणं, असा दोनदा उल्लेख झाला. त्याबद्दलही काहीजणांना शंका येईल की वाचणं आणि ऐकणं हे एकच कसं असेल? तर आपण मोठय़ानं वाचतो तेव्हा आपल्याच कानांनी ऐकतही असतोच आणि जेव्हा मनातल्या मनात वाचतो तेव्हा मनाच्या कानांनी ऐकतो. तर आपलं वाचणं म्हणजेच ऐकणं असं भेसळयुक्त असतं. कधी कधी तर त्या बोधाचा खरा रोखच आपण नजरेआड करतो आणि आपल्या देहबुद्धीला सोयीचा तेवढा अर्थ आपण लावतो. मागे सांगितलं होतं ना? की काहीजण एकत्र पोथी वाचायला बसतात आणि त्यात समजा असं वाक्य वा चरण आले की,‘देवानं आपल्यासाठी एवढं केलंय.. ही सृष्टी उत्पन्न केली, आपल्याला मनुष्याचा जन्म दिला त्याची परतफेड आपण करतो का?’ तर लगेच पोथीचं बोट सोडून काही जण आपल्या जीवनडोहात पटापट उडय़ा मारतात आणि अर्थनिष्पत्ती करू लागतात. कुणी म्हणतो, ‘मी पोराला जन्म दिला, मी होतो म्हणून त्याच्या जीवनाची घडी बसली. आता तो काय परतफेड करतोय सांगा.. नाथांनी अगदी वस्तुस्थितीवर बोट ठेवलंय बघा!’ मग कुणी मी अमक्यासाठी काय नाही केलं, याचा हिशेब ओकू लागतात आणि त्याची एकानंही कशी जाण ठेवली नाही, हे दु:खं उगाळू लागतात. सोबत संतांनीच माणसाचं दु:ख खरं ओळखल्याचं ‘प्रशस्तीपत्र’ही देतात! ‘पोथीवाचन’ बहुदा तिथंच आटोपतं. तर असं आपलं अपूर्ण वाचन असतं आणि त्यामुळेच आकलनही अपूर्णच होतं. मग खरी रसमयता, खरी तल्लीनता त्यात कशी येणार? जो खरा प्रामाणिक साधक असतो तो मात्र पोथीतून नेमकं काय सांगायचं आहे, याचंच काटेकोर ग्रहण करण्याचा प्रयत्न करीत असतो.. आणि जेव्हा खरा बोध उकलतो तेव्हाच त्याचा अंत:करणावर खरा परिणाम होतो, खरा संस्कार होतो. त्यातूनच मन त्या बोधाशी एकरूप होतं. खरा बोध उकलतो याचाच अर्थ कृती नेमकी काय करायची याचीच जाणीव तो बोध करून देतो. बोध वाचूनही कृती काय करायची हेच समजलं नाही किंवा तो बोध आचरणात उतरलाच नाही तर त्याचा अर्थ बोध खऱ्या अर्थानं वाचलाच अर्थात ऐकलाच गेला नाही, हाच असतो. गोंदवलेकर महाराज एकदा म्हणाले,‘बापानं मुलाला पत्र पाठवलं आणि सर्व ख्यालीखुशाली सांगून अखेरीस लिहिलं की, अमुक एवढय़ा रकमेची गरज आहे, तर ते पाठवावेत. मुलानं पत्र मोठय़ा प्रेमानं वारंवार वाचलं खरं, पण बापानं पैसे पाठवायला सांगितलं आहे, हेच त्याला कळलं नाही, तर त्यानं पत्र वाचलं असं म्हणता येईल का?’ आपलं वाचणं असंच कृतिहीन अर्थात अपूर्ण असतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 2:56 am

Web Title: samarth ramdas philosophy 293
Next Stories
1 ४२२. प्रश्न-ठिणगी
2 ४२१. शेंगदाणे आणि राजगिरा!
3 ४२०.  ध्येय-साधना : २
Just Now!
X