21 November 2017

News Flash

४२७. बोध-प्रचीती

सद्गुरूंचा बोध ऐकताना मनावरचं चिंतास्मरणाचं ओझं कमी होऊ लागलं की, मनाला एक प्रकारची विश्रांती

चैतन्य प्रेम | Updated: September 8, 2017 3:38 AM

सद्गुरूंचा बोध ऐकताना मनावरचं चिंतास्मरणाचं ओझं कमी होऊ लागलं की, मनाला एक प्रकारची विश्रांती मिळू लागते. पण जोवर हा बोध आचरणात उतरवण्याचा प्रामाणिक अभ्यास सुरू होत नाही तोवर मनाला कायमची विश्रांती काही मिळू शकत नाही. हा बोध आचरणात आणण्यात अडचण जर कुठली असेल तर आपली स्वत:चीच आहे! आपल्याच मनातला विकल्पांचा गोंधळ आपल्याला आडकाठी करीत असतो. तो बोध आचरणात आणताना बाधक ठरत असतो. जोवर सदगुरू जे सांगत आहेत ते मी पूर्ण स्वीकारत नाही तोवर त्यांच्या आणि माझ्यात एक अंतराय आहे, आंतरिक विरोध आहे, यात शंका नाही. माझं त्यांनी ऐकावं म्हणजे माझ्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडवाव्यात, हीच माझी सुप्त इच्छा असते. त्यामुळे माझं मन एकाग्रतेनं त्या बोधाचं आकलन आणि अनुसरण करू शकत नाही. ते मन सदोदित व्यग्र असतं, साशंक आणि संभ्रमित असतं. ‘आत्माराम’ या लघुग्रंथात समर्थ रामदास म्हणतात की, ‘‘जो शिष्य स्वामीस शरण गेला। आणि संदेहा वेगळा झाला। तेणें जन्म सार्थक केला। जो देवांसी दुल्लभु।।’’ (स्वानुभव निरूपण- ओवी २६). जो शिष्य खऱ्या अर्थानं स्वामीस शरण गेला तोच संदेहावेगळा  झाला.. त्याचाच संदेह नष्ट झाला. त्याचाच जन्म खऱ्या अर्थानं सार्थक झाला. जन्माचं असं सार्थक होणं देवांच्याही नशिबी नाही! आता देवांच्या नशिबी ते का आणि कसं नाही, हा अतिशय वेगळा आणि व्यापक विषय आहे. त्याचा ऊहापोह इथं अप्रस्तुत आहे. आता संदेहावेगळं होण्याचं एवढं काय महत्त्व आहे? ‘आत्मारामा’तच समर्थ म्हणतात की, ‘‘संदेह हेंचि बंधन। निशेष तुटला तेंचि ज्ञान। नि:संदेही समाधान। होये आपैसें॥’’ (स्वानुभव निरूपण- १५). संदेह हेच बंधन आहे. साशंकता हीच बाधा आहे. तो सुटल्याशिवाय, तुटल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. म्हणजे वास्तवाचा अनुभव येऊ  शकत नाही.

ही साशंकता म्हणजे कतूहल किंवा प्रामाणिक शंका नव्हे. उलट शंकेतूनच तर ज्ञानाचा शोध सुरू होतो. प्रश्न उत्पन्न होतो म्हणूनच उत्तर शोधण्याची परंपरा निर्माण होते. ‘कोऽहं’ या प्रश्नातूनच तर सनातन तत्त्वज्ञानाचा उदय झाला आहे. तेव्हा विरोध शंकेला नाही, पण शंकेचं बोट न सोडता, आचरणसिद्ध अनुभवाच्या प्रांतात पाऊलही न टाकण्याच्या सवयीला आहे. शंकेच्या निरसनाचे किंवा वास्तवाच्या प्रचीतीचे तीन मार्ग आहेत. शास्त्रप्रचीती, गुरुप्रचीती आणि आत्मप्रचीती. ‘आगीला हात लावला तर हात भाजतो,’ हे ग्रंथात नमूद आहे. ते स्वीकारून ग्राह्य मानून आगीला हात न लावणं, ही झाली शास्त्रप्रचीती. हेच ज्ञान गुरूनं सांगितलं तर ते स्वीकारून आगीपासून दूर राहणं, ही झाली गुरुप्रचीती आणि स्वत: आगीला हात लावून अनुभव घेऊन आगीला पुन्हा हात न लावणं, ही झाली आत्मप्रचीती. आत्मप्रचीती ही प्रभावी खरी, पण जे सदगुरू सांगत आहेत तेच खरं आहे, हे आत्मप्रचीतीनं वारंवार सिद्ध होत असेल, तर ते जे सांगतात ते नि:शंकपणे स्वीकारणं, हेच वेळ आणि श्रम वाचविणारं नाही का? मात्र हेसुद्धा कळलं आणि वळलं पाहिजे.

श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत की, ‘‘कळतं, पण वळत नाही तेच अज्ञान!’’ तेव्हा जे माझ्या खऱ्या हिताचं आहे तेच सद्गुरू सांगत आहेत, हे कळणं आणि त्यांच्या सांगण्यानुरूप आचरणाचा प्रयत्न सुरू होणं, हेदेखील आत्महिताचं ज्ञान आहे. हे ज्ञान मिळालं तरी बंधनमुक्तीच्या दिशेनं पाऊल पडतं! समर्थच ‘आत्मारामा’त म्हणतात, ‘‘जयाचें दैव उदेलें। तयास ज्ञान प्राप्त झालें। तयाचें बंधन तुटलें। नि:संगपणें।।’’ (स्वानुभव निरूपण-१८).

First Published on September 8, 2017 3:38 am

Web Title: samarth ramdas philosophy 295