21 November 2017

News Flash

४२८. उडणं-बुडणं : १

समर्थ रामदास यांच्या ‘मनोबोध’ अर्थात ‘श्रीमनाचे श्लोका’तील १२७वा श्लोक आपण जाणून घेत आहोत.

चैतन्य प्रेम | Updated: September 11, 2017 4:04 AM

समर्थ रामदास यांच्या ‘मनोबोध’ अर्थात ‘श्रीमनाचे श्लोका’तील १२७वा श्लोक आपण जाणून घेत आहोत. हा श्लोक परत एकदा वाचू. समर्थ म्हणतात, ‘‘जगीं धन्य तो रामसूखें निवाला। कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला। देहेभावना रामबोधें उडाली। मनोवासना रामरूपीं बुडाली।।’’ यातल्या दुसऱ्या चरणातल्या तल्लीनतेपाशी आपण पोहोचलो आहोत.. आणि या तल्लीनतेच्या आड नेमकं काय येतं, हेच या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणांत सांगितलं आहे. गेल्या काही भागांत असं म्हटलं होतं की, सद्गुरू बोधाशी एकरूप होण्याच्या आड, तल्लीनतेनं.. समरसतेनं त्यांचा बोध ग्रहण करण्याच्या आड आणि तो आचरणात उतरविण्याच्या आड आपण स्वत:च येतो. समर्थ रामदास स्वामी त्याचाच संकेत करतात! या बोधाशी तल्लीनता का साधत नाही? हा बोध आचरणात उतरवणं, हे जीवनध्येय का बनत नाही? कारण देहभावना आणि मनोवासना! देहभावना उडाली आणि मनोवासना बुडाली तर ही एकरूपता येईल. हे उडणं आणि बुडणं फार अर्थगर्भ आहे. देहभावना या एकाच शब्दाच्या कित्येक अर्थछटा आहेत.

पहिला आहे तो देहभाव. देह हा खरं पाहता जगात वावरण्यासाठीचं एक सक्षम आणि स्वयंपरिपूर्ण उपकरण मात्र आहे. जसं कॅमेरा छायाचित्रं टिपतो किंवा एखादी घटना चित्रित करतो, तसे डोळे हे बा जगत टिपणारे साधनमात्र आहेत. ध्वनिमुद्रक यंत्र जसं बा  जगातले ध्वनी, गाणं, बोलणं ध्वनिमुद्रित करतं त्याप्रमाणे कान म्हणजे बा जगातले ध्वनी ग्रहण करणारं साधन आहे.. पण यंत्राला, उपकरणांना जी जोड नसते ती मनुष्यदेह नामक उपकरणाला आहे.. ही जोड आहे मनाची! खरं पाहता या देहाला भावना नाहीत, वासना नाहीत, कल्पना नाहीत.. पण मनाला आहेत. आपल्या भावनांच्या, वासनांच्या, इच्छांच्या पूर्तीसाठी मन देहाचा पुरेपूर वापर तेवढं करून घेत असतं. तेव्हा देहभावना उडाली पाहिजे, याचा अर्थ देहाला चिकटलेली भावना उडाली पाहिजे.. देहभाव उडाला पाहिजे. आता हा देहभाव आहे कसा? तर मी म्हणजे केवळ देहच आहे, त्यामुळे मला सुख हवं असेल, तर माझ्या देहाला सदोदित सुख मिळालं पाहिजे. माझ्या देहाला अनुकूल तेच घडलं पाहिजे, ही मनाची धारणाच देहभाव आहे. देहालाच सुखाचा आणि दु:खाचा आधार आपण मानतो आणि त्यामुळे आपले सगळे आधार, सगळी नाती, सगळे संबंध हे देहाचेच देहाशीच आणि देहापुरतेच असतात. काही देह पाहूनच आपण आनंदतो आणि काही देह पाहूनच दु:खी होतो, काही देहांनाच आधार मानतो आणि काही देहांनाच धोक्याचं कारण मानतो.

देहाच्याच जन्मानं आनंदतो आणि देहाच्याच वियोगानं कोसळतो. या देहापलीकडे आपल्याला जाताच येत नाही. श्रीनिसर्गदत्त महाराज यांना एका साधकानं विचारलं की, ‘‘तुम्ही आणि रमण महर्षी एकमेकांसमोर आलात, तर एकमेकांना ज्ञानी म्हणून ओळखाल का?’’

महाराज म्हणाले, ‘‘हो!’’ आता एवढय़ावर समाधान मानेल तो साधक कसला! त्यानं वर विचारलं, ‘‘कसं? म्हणजे कोणताही पूर्वपरिचय नसताना एकमेकांना ज्ञानी म्हणून तुम्ही कसं काय ओळखाल?’’ तर महाराज म्हणाले, ‘‘रस्त्यानं जाताना समोरून येत असलेल्या माणसाला तुम्ही जसं माणूस म्हणूनच ओळखता, तसा एक ज्ञानी दुसऱ्या ज्ञान्याला ज्ञानी म्हणूनच ओळखतो!’’ म्हणजे काय असेल बघा! तेव्हा देहावरूनच आपण दुसऱ्याला ओळखतो. देहापलीकडे आपण काही जाणत नाही. ती देहभावना ‘उडाली’ पाहिजे, असं समर्थ सांगतात. प्रत्यक्षात आपलं मन दशदिशांना उडत असतं आणि देह वासनाडोहात बुडून असतो!

 

First Published on September 11, 2017 4:04 am

Web Title: samarth ramdas philosophy 296