21 November 2017

News Flash

४३०. उडणं-बुडणं : ३

सद्गुरूही भौतिक जीवनातल्या सुख-दुखांपासून चर्चा सुरू करतात

चैतन्य प्रेम | Updated: September 13, 2017 2:22 AM

देहभाव आणि मनोवासनेच्या खोडय़ातून सुटल्याशिवाय देह आणि मनाच्या क्षमतांचा खरा सुयोग्य वापर सुरू होणार नाही. त्यासाठी समर्थ म्हणतात त्याप्रमाणे देहभाव हा रामबोधानं उडाला पाहिजे आणि मनोवासना रामरूपात बुडाली पाहिजे. राम म्हणजे सद्गुरू. राम म्हणजे जे शाश्वत आहे, अखंड आहे, व्यापक आणि आनंदमय आहे ते. आज माझं मन जे जे अशाश्वत आहे, खंडित आहे, संकुचित आहे आणि म्हणूनच जे सदोदित सुखाचं किंवा दुखाचं असं मिश्रित आहे त्यात अडकून आहे. म्हणूनच ते शेवटच्या श्वासापर्यंतही अतृप्तच आहे आणि त्यायोगे त्या वासनातृप्तीसाठी, त्या इच्छापूर्तीसाठी पुन्हा जन्माला घालत आहे! जन्माचं हे मूळ कारण जोवर उकलत नाही तोवर आपल्या अतृप्तीचं मूळ भीषण स्वरूप लक्षात येत नाही. देह जन्मतो आणि मरतो, पण अतृप्ती सदा अमर राहते, हे उमगत नाही. हे चित्र पालटण्यासाठी आधी रामबोध म्हणजे सद्गुरू बोध अर्थात शाश्वताचा बोध आधी ऐकला पाहिजे. खरंखुरं ऐकणं ही सामान्य क्रिया नाही. कानावर पडत असलेला प्रत्येक ध्वनी, प्रत्येक बोलणं आपण ऐकतो थोडीच! आपल्याला जे ऐकावंसं वाटतं तेच आपण ऐकतो! तेव्हा शाश्वताचा बोध ऐकायची तरी आधी इच्छा पाहिजे!

गोंदवल्यात महाराज सकाळी त्यांच्या लाकडी सोफ्यावर येऊन बसत आणि काय चर्चा सुरू होई? तर आज स्वयंपाक काय काय करायचा. वीस-तीस बायाबापडी माणसं गोळा झाली असत. आज काय खायचं किंवा काय खायला मिळणार, हे ‘ऐकायला’ कुणाला आवडणार नाही? तर सुरुवात अशी व्हायची मग हळूहळू जीवनात एवढं दुख का इथपासून ते सृष्टीची निर्मिती कशी झाली इथवर बोलणं व्हायचं. तर सांगायचा मुद्दा हा की आपणही सद्गुरूकडे जातो तेव्हा जे आपल्याला ऐकायला आवडेल तेच त्यांनी बोलावं अशी आपली इच्छा असते. सद्गुरूही भौतिक जीवनातल्या सुख-दुखांपासून चर्चा सुरू करतात आणि अखेर दुख आणि दुखवेष्टित सुखाचं जे मूळ जन्मकारण आहे तिथवर घेऊन जातात. भौतिकाचीही भलामण आधी करतात. जीवनात दुख नको असेल आणि अखंड सुखच हवं असेल तर आधी स्वत सर्वार्थानं चांगला माणूस झालं पाहिजे, सर्व संकुचितपणा सुटला पाहिजे, हे मनावर बिंबवतात. दुसरा ‘वाईट’ असतानाही ‘चांगलं’ राहण्याचं आव्हान पेलायला लावतात आणि अखेरीस जगाची ओढ आणि जगाचा प्रभावच पुसून टाकून मनच व्यापक बनवून टाकतात.

या अत्यंत प्रदीर्घ प्रक्रियेनं घडणारं जे मन आहे त्याचं आणि त्या प्रक्रियेचंच सूचन तीन शब्दांत गेल्या भागात केलं. ते शब्द मांडणारं वाक्य असं होतं, ‘‘संकुचित आणि व्यापक मनापलीकडे प्रथम ‘नमन’ मग ‘सुमन’ आणि अखेरीस ‘अमन’ होणारं अध्यात्मलीन असं मनही असतं!’’ शिष्याचं मन असं परम भावतन्मय विराट व्हावं, हीच सद्गुरूची इच्छा असते. कारण जोवर मनाचं परिवर्तन होत नाही तोवर मनाचं ‘सु-मन’ नव्हे तर ‘कु-मन’च होत राहतं. या संकुचित मनाचा डोहच महासागराइतका विराट होतो. अनंत उग्र वासनांच्या लाटांमध्ये गटांगळ्या खायला लावतो. यालाच भवसागर म्हणतात! जिथं भावणं आहे तिथंच भोवणं, गोवणं आणि बुडवणं आहे! आपल्या छोटय़ाशा अंत:करणातच सामावलेला अत्यंत विराट आणि खडतर असा हा भवसागर तरून जाता आलं तरच जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटका आहे! समर्थही म्हणतात, ‘‘तरी मनाचा थारा तुटला। म्हणिजे भवसिंधु आटला। प्राणी निश्चितार्थे सुटला। पुनरावृत्ती पासुनी? ’’(आत्माराम/ ब्रह्मनिरूपण- ओवी २८). हा मनाचा थारा तुटायला हवा असेल, तर संकुचित देहभाव उडाला पाहिजे आणि शाश्वतात बुडालं पाहिजे!

First Published on September 13, 2017 2:22 am

Web Title: samarth ramdas philosophy 298