समर्थ रामदास स्वामी ‘आत्माराम’ या लघुग्रंथात म्हणतात, ‘तरी मनाचा थारा तुटला। म्हणजे भवसिंधु आटला। प्राणी निश्चितार्थे सुटला। पुनरावृत्ती पासुनी॥’ संतांची प्रत्येक शब्दयोजना किती अचूक आणि चपखल असते पाहा.. या ओवीतले ‘तुटला’, ‘आटला’ आणि ‘सुटला’ हे शब्द  ताल  आणि अर्थाचा तोल अचूक सांभाळणारे आहेत. मनाचा थारा तुटला पाहिजे, म्हणजे मनाला अशाश्वतात रमण्याची, गुंतण्याची आणि त्याला सर्वस्व मानण्याची जी सवय जडली आहे, त्या सवयीतून ज्या अनंत ओढी लागल्या आहेत; त्या सवयींना, त्या ओढींना थारा देण्याची वृत्ती तुटली पाहिजे! त्या सवयींचा, त्या ओढींचा आधार तुटला पाहिजे. पान जसं देठापासून तुटतं तसा! जीवनरस ओसरला की वाळलेलं पान झाडावरून आपोआप ओघळतं, गळून पडतं. ते तोडलं जातं तेव्हा त्यात जीवनरस कायम असतो. तसं मनाच्या सर्व क्षमता कायम असताना ते भ्रामक आधारापासून म्हणजेच अशाश्वताच्या प्राप्तीत, संग्रहात आणि जपणुकीतच जीवनरस आहे, या धारणेपासून तुटलं पाहिजे, विलग झालं पाहिजे, मोकळं झालं पाहिजे.

आता अशाश्वत म्हणजे काय? तर माझं अवघं जगच अशाश्वत आहे. माझं जग म्हणजे  ‘मी’ आणि ‘माझे’पणाचा परीघ..  त्यात माझी माणसं येतात..  माझे आप्त आणि मित्र येतात तसेच माझे ‘शत्रू’ही येतात.. घरादारापासून अनंत निर्जीव वस्तूही येतात. या साऱ्या गोष्टी काळाच्याच पकडीत आहेत. त्यामुळे त्यांच्यात बदल, घट, हानी ही प्रक्रिया सतत होत राहाते. तेव्हा त्यांना सदोदित आपल्या इच्छेनुरूप मनानुकूल राखण्याची जी धडपड आहे ती थांबली पाहिजे. जे कधीच स्थिर राहाणार नाही त्याला सदोदित स्थिर राखण्याच्या धडपडीमुळेच आपण सदोदित अस्थिर असतो. जे सतत सुखाचं कधीच राहू शकत नाही ते सतत सुखकारक राखण्याच्या धडपडीमुळेच आपण अनेकदा अपेक्षाभंगाचं दु:ख भोगतो. जे नेहमीच   अशाश्वत आहे ते शाश्वत राहावं यासाठी सुरू असलेल्या आटापिटय़ामुळेच कशाचीच शाश्वती न वाटून आपण धीर गमावून खचतो. हे थांबण्यासाठी मनाला लागलेली अशाश्वताची ओढ तुटली पाहिजे. या ओढीतूनच तर अंत:करणात दुस्तर असा भवसागर तुडुंब भरला आहे. एकदा अशाश्वताला आधार मानण्याची मनाची सवय नष्ट झाली की अंत:करण सुरक्षित राहील, पण त्यातला भवसागर आटला असेल! अंत:करणात असा पालट झाल्यावर कशी स्थिती होते तिचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं आहे : ‘आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचे।।’ भवसागर आटला तरी मनाचा डोह तोच राहातो, पण तो आता आनंदाचा झाला असतो.. आधी वासनाडोह होता म्हणून त्यात उसळणाऱ्या लाटा अतृप्त वासनांच्याच होत्या.

आता तो आनंदडोह झाल्यानं त्यात आनंदाचेच तरंग उमटत आहेत.. सुखाला दु:खाचं अंग आहे, पण आनंदाला आनंदाचंच अंग आहे! एकदा ही मूळचीच असलेली आंतरिक स्थिती गवसली की मनातली अतृप्तीची आवर्तनं थांबतात आणि मग त्या इच्छातृप्तीसाठी ‘जन्म’ आणि काळाची मुदत संपली की अतृप्तीला कवटाळलेल्या स्थितीत ‘मृत्यू’ मग फिरून ‘जन्म’.. या पुनरावृत्तीच्या जोखडातून जीव निश्चित सुटतो! हे व्हायला हवं असेल, तर आधी रामबोधानं म्हणज ेशाश्वताच्या बोधानं अशाश्वतात गोवणाऱ्या देहभावाचं मनाला चोपडलेलं उग्र अत्तर उडालं पाहिजे! ही प्रक्रिया साधायची असेल, हा शाश्वताचा बोध ऐकायचा असेल, तर जो केवळ शाश्वतातच बुडाला आहे त्याच्याचकडे गेलं पाहिजे आणि तो काय सांगतो ते ऐकलं पाहिजे.. आणि ऐकणं ही साधी क्रिया नाही!