News Flash

६३. नम्र वाचा झ्र् २

आपण साधनापंथावर पाऊल टाकलं आहे, त्यामुळे मनाच्या आवेगांनुरूप जगण्याची जी पूर्वीची रीत होती

आपण साधनापंथावर पाऊल टाकलं आहे, त्यामुळे मनाच्या आवेगांनुरूप जगण्याची जी पूर्वीची रीत होती ती बदलण्याचा निर्णयही आपण घेतला आहे. हा निर्णय मनच घेतं आणि त्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही मनंच करतं! जागृत मन क्रोध-दंभ-मत्सरादि विकार आवरून जगायचा अभ्यास करीत असतानाच सुप्त मन त्याविरोधात अनंत विचारांची वावटळ उठवत असतं. सुप्त मनाचं हे जे आक्रंदन आहे तेच समर्थाच्या शब्दांत ‘नीच बोलणे’ आहे! हे आपल्याच सुप्त मनाच्या अत्यंत खालच्या स्तरावरून प्रकट होणारं जे बोलणं आहे ते सोसायला आणि त्याकडे दुर्लक्ष करून जे ठरवलं आहे त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करायला फार मोठं धैर्य लागतं, धारिष्टय़ लागतं. आता नुसतं मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावें। मना बोलणें नीच सोशीत जावें।। एवढं करून थांबायला सांगितलेलं नाही तर त्यापुढे स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें। मना सर्व लोकांसि रे नीववावें।। हेसुद्धा साधायला सांगितलं आहे! आता हे नम्र बोलणं म्हणजे काय? काणे महाराजांनी नामस्मरण म्हणजे नम्र बोलणं असा अगदी चपखल अर्थ सांगितला आहे. अर्थात हे नम्र बोलणं आहे म्हणजे हा वैखरीचा जप नव्हे तर अंतर्मनात सतत सुरू असलेला जप आहे. ‘जपे माळ अंतरीं’सारखा सतत मनात सुरू असलेला नाम आणि स्मरणाचा अभ्यास आहे! म्हणजेच सुप्त मनातून साधनेच्या आणि सकारात्मक जगण्याच्या विरोधात किती का वाईट बोल लावले जात असेनात, हे साधका तुला त्याच सुप्त मनावर नामाची आणि स्मरणाची, उपासनेची, साधनेची संततधार धरायची आहे. त्या सुप्त मनाला फशी पडून दुसऱ्याशी वाईट बोलण्यात तुझी वैखरी कलंकित होऊ द्यायची नाही. तुला नेहमीच नामयुक्त अंत:करणानं जगात वावरायचं आहे. असा जो खरा साधक आहे त्याचा जगातला वावर मोठा प्रेरक असतो. श्रीमंत-गरीब, विद्वान-अडाणी, लहान-थोर, आपला-परका असे सारेच भेद त्याच्या मनातून मावळले असतात. सर्वाशी तो समत्वानं वागतो. माउली म्हणतात ना? ‘नामें तिन्हीं लोक उद्धरती’ नामानं नीच, मध्यम आणि उच्च अशा तिन्ही प्रकारच्या लोकांचा उद्धार होतो. अगदी त्याचप्रमाणे नाममय झालेल्या, साधनामय झालेल्या साधकाच्या सहवासानं लोकांच्या मनाचा तापही निवतो! तर हे साधका, मना सर्व लोकांसि रे नीववावें।। हे साधेल अशी नाममय अवस्था, आंतरिक समत्व-शांती प्राप्त करून घे, असंच समर्थ सांगत आहेत.
समस्त चळवळींना भगवंताचं अधिष्ठान अपेक्षिणाऱ्या समर्थानी साधकाला नामाचं अधिष्ठान मिळवून आंतरिक तापांपासून निवायला सांगणं, हे सुसंगतच आहे. इथं एक मात्र पक्कं लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या साधनेचा हेतू जगाला निववणं, जगाला तापमुक्त करणं, हा नाही. जितकी माणसं नाममय होण्याचा अर्थात अनासक्त होण्याचा प्रयत्न करतील, तितक्या प्रमाणात जगाचा ताप कमीच होईल, नाही का? ती स्थिती दूर आहे, पण तरीही साधकानं काय अभ्यास करावा, हे सांगताना ‘दासबोधा’च्या बाराव्या दशकाच्या दहाव्या समासात समर्थ म्हणतात, ‘‘उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा। शब्द निवडून बोलावा। सावधपणें करीत जावा। संसार आपला।।’’ उत्तम पदार्थ म्हणजे वस्तू किंवा खाद्यपदार्थ नव्हे! परमतत्त्वाशी जोडणारं जे जे काही आहे तेच उत्तम आहे. आपणही अशा उत्तमाच्याच ओढीत जगावं आणि जगालाही त्यापलीकडे दुसरी ओढ लावू नये. जगालाही जे शाश्वत आहे, सत्य आहे तेच सांगावं. द्यावं. तेव्हा आपलं बोलणंही निवडून असावं. अनावश्यक, फोलकट बोलणं टाळण्याचा अभ्यास वाढवत जावं. अनवधानानं नव्हे, तर सद्गुरू बोधाचं अवधान राखून संसार करीत जावा!

-चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2016 3:27 am

Web Title: samarth ramdas philosophy 3
Next Stories
1 ६३. नम्र वाचा..
2 ६१. अंतर्बा त्याग : २
3 ६०. अंतर्बाह्य़ त्याग : १
Just Now!
X