News Flash

४३४. वासना-लय :१

सद्वासना म्हणजे भगवंताविषयीच्या वासना नाहीत.

शाश्वताच्या बोधानं देहभाव नष्ट व्हावा आणि मनाच्या सर्व इच्छांचा सद्गुरुमयतेत लय व्हावा.. त्यांच्या लीलामय चरित्राशी एकरूपता येऊन शाश्वत सुखाची प्राप्ती व्हावी, असं जर ध्येय असेल, तर काय काय करायला हवं, याचं मार्गदर्शन आता समर्थ रामदास ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १२८व्या  श्लोकापासून सुरू करणार आहेत. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू, मग मननार्थाकडे वळू.

मना वासना वासुदेवीं वसों दे।

मना कामना कामसंगीं नसों दे।

मना कल्पना वाउगी ते न कीजे।

मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे।। १२८।।

प्रचलित अर्थ : हे मना, वासुदेवाच्या म्हणजे हरीच्या ठिकाणी सर्व वासना ठेव. कामनांना कामाचा वारा लागू देऊ  नकोस. म्हणजे त्या निष्काम असू देत. हे मना, उगीच विषयासंबंधी कल्पनांची जाळी विणत बसू नकोस. त्याउलट सज्जनांच्या संगतीत रमून जा.

आता मननार्थाकडे वळू. राममयतेचं लक्ष्य साधण्यासाठी पहिला उपाय समर्थ सांगत आहेत तो आहे सज्जनसंगतीचा! या १२८व्या  श्लोकाचे पहिले तिन्ही चरण हे तीन गोष्टी करायला सांगतात आणि या तिन्ही गोष्टी ज्या एका गोष्टीतच अंतर्भूत आहेत त्या सज्जन संगतीचा निर्देश अखेरच्या चरणात करतात. आता प्रथम काय सांगतात? ‘मना वासना वासुदेवी वसो दे!’ म्हणजे हे मना, तुझ्या ज्या काही वासना आहेत, ज्या काही इच्छा आहेत त्या एका वासुदेवाच्याच चरणी एकवटून टाक! ११६ ते १२५ या १० श्लोकांत समर्थानी परमात्मा कसा भक्तांचा सांभाळ करतो ते सांगितलं. त्या परमतत्त्वात सदोदित लीन सद्गुरूला ओळखायला हवं, हे १२६व्या श्लोकात सांगितलं. केवळ त्याच्याशीच एकरूप होऊन पूर्ण आत्मतृप्ती लाभते आणि जीवन धन्य होतं, हे १२७व्या श्लोकात सांगितलं. ती स्थिती लाभावी, यासाठी काय करायला हवं हे आता १२८व्या श्लोकात सांगत आहेत; पण हे सारं सांगणं साधना मार्गावर वाटचाल सुरू केलेल्या आणि मनाच्याच ताब्यातून न सुटलेल्या सर्वसामान्य साधकाला सुरू आहे, हे विसरू नका! त्यामुळे पुन्हा आपल्या पातळीवर येऊन समर्थ सांगत आहेत की, ज्या काही इच्छा मनात येतील त्या एका भगवंतापाशीच ठेवा. या सद्वासना म्हणजे भगवंताविषयीच्या वासना नाहीत. त्या बहुतांश भौतिकच आहेत. तेव्हा मनात उद्भवणाऱ्या सर्व इच्छा या एका भगवंताकडेच सोपवाव्यात, त्यांच्या पूर्तीची मागणी परमात्म्याकडेच करावी, असाच अर्थ यातून ध्वनित होतो. या वासना मारून टाकायला वा दडपून टाकायला सांगितलेलं नाही, तर उलट त्या थेट वासुदेवाकडे मांडायला सांगितलं आहे.. आणि गंमत अशी की ‘वासुदेव’ हा शब्दही अकारण आलेला नाही! या शब्दातही एक रहस्य दडलं आहे. सांसारिक सोडाच, आध्यात्मिक इच्छासुद्धा कशी फसवणारी असते, हे ‘वासुदेव’ शब्दच सांगतो. आपल्या इच्छेतला फोलपणा तो व्यक्त करतोच, पण नेमकं काय मागावं, हे अगदी तप:सिद्ध होऊनही कळत नाही, हे सत्यही उघड करतो. वासुदेव हे नाव ज्या वसुदेवामुळे लाभलं त्यांच्याकडे महर्षी नारद एकदा आले. वसुदेवानं  यथासांग स्वागत करून नारदांना  विनवलं, ‘‘हे ऋषीवर, मला काही ज्ञान द्या!’’ नारद म्हणाले, ‘‘तुम्ही साक्षात कृष्णाचे वडील. तुम्हाला मी काय ज्ञान देणार?’’ वसुदेव खिन्नपणे म्हणाले, ‘‘हीच तर मोठी अडचण आहे! मी दीर्घ तप केल्यावर भगवंत प्रसन्न झाले, मला वर माग म्हणाले. मी क्षणार्धात मायेत पुन्हा गुरफटलो आणि हे भगवंता, मला तुझ्यासारखा पुत्र दे, असा वर मागून बसलो! त्यामुळे आज जगाला ज्ञानयोग सांगणाऱ्या कृष्णाकडे मी ज्ञानाची प्रार्थना करावी, तर तोच हात जोडून म्हणतो, मुलानं बापाला ज्ञान ते काय द्यावं! मला सेवा सांगा. माझं तेच कर्तव्य आहे!!’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2017 2:29 am

Web Title: samarth ramdas philosophy 301
Next Stories
1 ४३२. आत्मभान
2 ४३१. आनंदडोह
3 ४३०. उडणं-बुडणं : ३
Just Now!
X