17 December 2017

News Flash

४३७. कामसंगी

समर्थ रामदासविरचित ‘मनोबोधा’च्या १२८व्या श्लोकाचे पहिले दोन चरण आहेत

चैतन्य प्रेम | Updated: September 22, 2017 2:57 AM

समर्थ रामदासविरचित ‘मनोबोधा’च्या १२८व्या श्लोकाचे पहिले दोन चरण आहेत : ‘‘मना वासना वासुदेवीं वसों दे,’’ आणि ‘‘मना कामना कामसंगीं नसों दे.’’ यातला पहिला चरण काय कर, हे सांगतो तर दुसरा चरण काय करू नकोस, ते सांगतो. अगदी त्याचप्रमाणे तिसरा चरणही (मना कल्पना वाउगी ते न कीजे) काय ‘न कीजे,’ ते सांगतो तर चौथा चरण (मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे) काय ‘कीजे’ म्हणजे काय कर, ते सांगतो.

यातल्या पहिल्या चरणाचा मागोवा घेऊन आपण दुसऱ्या चरणाकडे वळत आहोत. या चरणाचा सर्वसाधारण अर्थ काय केला जातो ते पाहू. एक अर्थ असा मांडला जातो की, ‘हे मना कामनांना कामाचा वारा लागू देऊ  नकोस म्हणजेच त्या निष्काम असू देत’ (समर्थभक्त ल. रा. पांगारकर). एक अर्थ असा मांडला गेला आहे की, ‘‘हे मना कामवासना तृप्त करण्याची इच्छा तू ठेवू नकोस’’ (पू. बाबा बेलसरे). आणखी एक अर्थ असा की, ‘‘हे मना नाशिवंत अशा विषय वासनेच्या ठिकाणी रमणारी तुझी कामना, असत् वृत्ती ही या विकारी रिपूंच्या संगतीत न राहता नामस्मरणातच अखंड रमू दे’’ ( पू. काणे महाराज). आता अधिक खोलवर विचार केला तर ‘कामसंगी’ या शब्दाची अगदी वेगळीच अशी अर्थच्छटा प्रकट होते आणि पहिल्या चरणाशी हा चरण किती घट्ट जोडलेला आहे, ते लक्षात येतं. ‘कामसंगी’ या शब्दाचा अर्थ आहे कामनांमध्ये बुडालेला, कामनापूर्तीपलीकडे ज्याच्या जगण्याला दुसरा कोणताही हेतू नाही, असा माणूस.

जसा ‘सत्संगी’ म्हणजे सत्संगात, सद्विचारात रमणारा माणूस तसाच ‘कामसंगी’ म्हणजे कुसंगात, कुविचारात रमणारा माणूस! तर समर्थ सांगतात की, हे मना तुझ्या सर्व इच्छा भगवंताच्या चरणी अर्पण कर, पण जो कामनांमध्ये बद्ध आहे अशाच्या संगतीत त्या कामनांसह रमू नकोस! कारण दुर्गुणानं जेवढा घात होणार नाही त्यापेक्षा दुर्जनाच्या संगतीनं कैकपटीनं अधिक घात होईल. कारण अभ्यासानं आणि बोधानं जसजशी अंतर्मुखता वाढेल, जाण वाढेल तसतसा तो दुर्गुण मावळू लागेल, पण दुर्जनाची जी संगत आहे तिनं आधीच वाईटाकडे असलेला आपला ओढा अधिक वाढेल! असलेले दुर्गुण तर बळकट होतीलच, पण नसलेलेही चिकटतील. समर्थानी ‘राजकारण’विषयक ओव्यांत म्हटलं आहे की, ‘‘संगतीसारिखे होती। नाना लोक भूमंडळीं। सुबुद्धी संगतीयोगें। कुबुद्धी संगतीगुणें।।’’ (ओवी क्र. १२). सत्संगतीचा योग लाभून माणसाची सुबुद्धी जागी होते आणि कुसंगात असलो तर त्या कुसंगाचा गुणच असा आहे की तो माणसाची बुद्धी नासवून ती कुबुद्धीत परिवर्तित करतो.

आता सत्संगाला योग म्हटलं आहे. योग शब्दाचे दोन प्रमुख अर्थ आहेत. पहिला अर्थ म्हणजे युक्ती आणि दुसरा अर्थ आहे संधी. म्हणजे एक तर प्रयत्नपूर्वक सत्संग साधला किंवा सत्संगाची संधी लाभली तर सुबुद्धी जागी होते. परिस्थितीमुळे शिक्षणाची आबाळ झालेला एक पोरसवदा तरुण एका ट्रकचालकाबरोबर क्लीनर म्हणजेच त्याचा मदतनीस म्हणून कामाला लागला. काम नसलं की मुंबईत एका मैदानवजा जागेत ते ट्रक उभा करीत. त्या तरुणाला समजलं की जवळच्या चाळीत एक महाराज राहतात. तो सहज म्हणून गेला आणि निसर्गदत्त महाराजांच्या त्या पहिल्याच दर्शनानं मुग्ध झाला. इतकं विशुद्ध प्रेम लाभलं की त्यांच्या सहवासात जणू ज्ञानचक्षू उघडले गेले! तेव्हा सत्संगाचा योग असा नकळत, सहज लाभू शकतो. समर्थ म्हणतात, ‘‘..यालागी संग भाग्याचा। प्रत्यक्ष भाग्य भोगवी!!’’ असा संग फार भाग्याचा कारण तो परमभाग्य भोगण्याची संधी देतो.. पण भाग्यात असूनही कुसंगातच रमलो, तर? समर्थ म्हणतात, ‘‘कितेक लोक भाग्याचे। करंटें होतसे पुढें। बुद्धिचा भ्रंश होताहे। यालागी भाग्य जातसे!!’’

 

First Published on September 22, 2017 2:54 am

Web Title: samarth ramdas philosophy 304