18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

४३९. कल्पना वास्तव

माणसाच्या मानसिक, भावनिक आणि वैचारिक घडणीत कल्पनेचा वाटा मोठा आहे.

चैतन्य प्रेम | Updated: September 26, 2017 2:45 AM

समर्थ रामदास ‘दासबोधा’त म्हणतात, ‘‘कल्पना जन्माचे मूळ’’! कल्पनेतच माणसाचा जन्म आहे. म्हणजे कसं? तर माणूस हा कल्पनाप्रधान प्राणी आहे. ‘आज ना उद्या पूर्ण सुख मिळेलच,’ या कल्पनेमुळेच तर तो अनंत वेळा वासनेच्या पोटी जन्मतो आणि अतृप्तीच्या अग्नीदाहातच मरतो, पण ‘या जगातच सुख मिळेल,’ ही त्याची कल्पना काही मरत नाही. त्या कल्पनेनुसार सुख मिळवण्यासाठी या जगातली त्याची ये-जा काही संपत नाही. त्या कल्पनेतूनच त्याचे विचार, त्याच्या कामना-वासना घडत असतात.

म्हणजेच माणसाच्या मानसिक, भावनिक आणि वैचारिक घडणीत कल्पनेचा वाटा मोठा आहे. माणूस कल्पनेची जोड दिल्याशिवाय विचार करू शकत नाही. उदाहरणार्थ ‘पुढे काय घडेल,’ याचा विचार माणूस कल्पनेनंच करतो. विपरीत कल्पनांनी माणसाचं मन नकारात्मक विचारांमागे वाहावत जातं तर उदात्त कल्पनांनी माणसाचं मन सकारात्मक विचारांनी भरून जातं. एखादा माणूस मनातल्या भीषण कल्पनेनं जेव्हा भारला जातो तेव्हा ती कल्पना इतरांना धोका उत्पन्न करते. जसं, ‘दुसऱ्याला मारून मी सुखी होईन,’ या कल्पनेनं एखादा भारून जातो तेव्हा परघात करण्यात तो मागचापुढचा विचारही करीत नाही. एखाद्या माणसाच्या मनातल्या अशा भीषण कल्पनेला जेव्हा आणखी काही लोकांची साथ मिळते तेव्हा समूहाच्या जगण्यालाही धोका उत्पन्न होतो.

कल्पनेतून असा विध्वंस जसा ओढवला त्याचप्रमाणे वैचारिक, भावनिक, ऐहिक संपन्नतादेखील लाभली. जगातले उत्तमोत्तम शोध, तरल काव्य, श्रेष्ठ वास्तू-शिल्पं आणि चित्रं प्रत्यक्षात साकारतात तेव्हा त्यांचं मूळ कुणा एकाच्या मनातल्या कल्पनाबीजातच तर असतं! तेव्हा नकारात्मक कल्पनांनी माणूस आपलं व इतरांचं जीवन बिघडवू शकतो तसंच सकारात्मक कल्पनांनी स्वत:चं जीवन घडवू शकतो आणि इतरांना प्रेरकही ठरू शकतो. थोडक्यात माणसाच्या जीवनावर कल्पनेचा असा पगडा आहे.

कल्पनेनुसार केला जाणारा विचार आणि त्याद्वारे होणारी कृती यातूनच माणसाचं भौतिक जीवन सुखप्रद वा दु:खप्रद होतं. अध्यात्म साधनेच्या पथावरही माणूस असंच कल्पनेचं बोट पकडून आलेला असतो. साधना पथावर येण्यामागची त्याची कल्पना बहुतांश निव्वळ भौतिक असते. आपल्या भौतिक जीवनातल्या अडचणी कायमच्या दूर व्हाव्यात आणि गोष्टी मनाजोग्या आजन्म घडाव्यात, हाच हेतू मुख्य असतो. साधनेनं खरं काय मिळतं किंवा मिळवायचं आहे, याबाबतची त्याची कल्पना चुकीची असू शकते.. आणि साधना करून आपल्या कल्पनेनुसार कामनापूर्ती होते की नाही या तपासणीत गुंतून तो निराशही होऊ शकतो.

त्यामुळेच ‘मनोबोधा’च्या १२८व्या श्लोकाच्या पहिल्या तीन चरणांत समर्थ म्हणतात की, हे मना.. कामना योग्य की अयोग्य याचा काहीही विचार न करता सर्व कामना भगवंताकडे मांड. त्यांच्या पूर्ती-अपूर्तीचा निर्णयही भगवंतावर सोडून दे. कामना भगवंताकडे सुपूर्द करताना मनात विकल्प येऊ नयेत आणि भगवंतापासून दूर नेणाऱ्या कल्पनांनी मन भारू नये यासाठी कामनाबद्धांची संगत सोड.. चुकीच्या कल्पना चुकीचे विचार मनात आणतात आणि चुकीच्या विचारातून चुकीची कृती घडते. म्हणून माणसानं प्रयत्नपूर्वक चुकीच्या कल्पनांपासून दूर राहायचा प्रयत्न केला पाहिजे, हे सुचविताना समर्थ म्हणतात, ‘‘मना कल्पना वाउगी ते न कीजे’’! अंतरंगात चुकीच्या कल्पनांना थारा देऊ नकोस, असं समर्थ बजावतात. पण हे सर्व साधण्यासाठी काय केलं पाहिजे? तर.. ‘‘मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे’’!!

First Published on September 26, 2017 2:28 am

Web Title: samarth ramdas philosophy 306