18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

४४०. आत-बाहेर

कामनाबद्धांचा संग प्रथम सोडायचा आहे.

चैतन्य प्रेम | Updated: September 27, 2017 2:36 AM

कामसंगी म्हणजे ज्यांचं मन अनंत कामनांमध्ये आसक्त आहे आणि ज्यांच्या सहवासानं आपलं मनही कामनापूर्तीच्या ओढीत आबद्ध होतं, ते! तर अशांची संगत सोडून सत्संगात राहा, असं समर्थ सांगतात. पण ते काय म्हणतात? तर, ‘‘मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे!’’  बघा हं.. नुसतं ‘सज्जनीं वस्ति कीजे,’ असं म्हणत नाहीत आणि यातच मोठी शिकवण दडलेली आहे. ती जाणून घेण्याआधी या चरणाचा जो सर्वसाधारण अर्थ लक्षात येतो आणि त्या अर्थाला अनुसरून जी कृती साधकाकडून नकळत घडतही असते तिच्याकडे वळू. तर कामनाबद्धांचा संग प्रथम सोडायचा आहे, पण त्यांना ओळखावं कसं? तर ‘दासबोधा’चा आधार घ्यावा लागेल. जणू पाचांच्या प्रपंचात जो स्वत: बद्ध आहे त्याला सतत या लक्षणांचा आठव राहावा म्हणून ‘दासबोधा’च्या पाचव्या दशकात बद्धलक्षणांचा समास आहे! त्यात दिलेली बद्धांची लक्षणं वाचली की ‘कामसंगी’ कोण, याचा उलगडा होईल. त्यातली २२वी ओवी आहे. ‘‘बहु काम बहु क्रोध। बहु गर्व बहु मद। बहु द्वंद्व बहु खेद। या नांव बद्ध॥’’ म्हणजे ज्याच्या जगण्यात कामनांचा अतिरेक आहे, जे प्राप्त झालेलं नाही त्यानं तो इतका अस्वस्थ असतो की त्या अस्वस्थतेपायी जे काही जवळ आहे त्याचंही सुख त्याला अनुभवता येत नाही. त्यामुळे तो सदैव अतृप्त असतो. कामना अपूर्तीच्या भावनेनं तो क्रोधभारितही होतो आणि कामना पूर्ण झाल्यास गर्व आणि मदानं फुलून जातो. ज्याचं समस्त जगणं असं द्वंद्वमय आहे आणि सदाअतृप्तीमुळे जे मिळालं नाही त्याचा त्याला खेद आहेच, पण जे मिळालं तेही कमीच आहे, या भावनेनं जे मिळालंय त्याच्या स्वप्रमाणित अपुरेपणाचाही खेद आहे!

तर अशा बद्धाचा संग सोडला पाहिजे. असा बद्ध जसा बाहेर आहे तसाच तो आतही आहे! तो कबीरांचा दोहा आहे ना? ‘‘बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय। जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय॥’’ अगदी त्याचप्रमाणे जगात कोण सर्वात बद्ध आहे, हे पाहू लागलो तर आपणच सर्वाधिक बद्ध आहोत, हे कळेल! आणि त्यामुळे बद्धांचा संग का टाळला पाहिजे, त्यामागची निकडही तीव्रतेनं उमगेल. कारण एखाद्या मुलाला दंगामस्ती करायला आवडत असलं तरी दंगामस्ती करणाऱ्या मुलांची जोड मिळाल्याशिवाय त्याला वाव मिळत नाही ना? तसंच आहे हे. म्हणून माझ्या अंतरंगातील कामबद्धतेला, कामना ओढीला उधाण येऊ नये म्हणून बद्धांचा संग टाळायचा आहे. एक लक्षात घ्या.. संग हा आंतरिकच असतो. परिस्थितीमुळे बद्धांच्या सोबत आपल्याला राहावे वा वावरावे लागेलही, पण त्यांना म्हणजे त्यांच्या विचाराला, जीवनशैलीला आपल्या अंतरंगात स्थान न देण्याचा अभ्यास करावाच लागेल.. आणि त्यासोबतच सज्जनांचा सहवासही प्रयत्नपूर्वक वाढवावाच लागेल.

पण असा सहवासही सतत शक्य नसतो म्हणूनच समर्थ चपखल शब्द योजून सांगतात की, हे मना ‘‘सज्जना सज्जनी’’ वस्ती कर.. म्हणजे सज्जनांचा जो विचार आहे, जे तत्त्व आहे, जे आकलन आहे आणि जे ध्येय आहे.. त्यांनी जे श्रेयस म्हणून सांगितलं आहे त्यात वस्ती कर! त्यात मनानं स्थिर होण्याचा अभ्यास कर! आणि साधकाकडून नकळत एक गोष्ट घडते, असं सुरुवातीला म्हटलं ना? ती गोष्ट अशी की देहानं आपण सत्संगात राहातो, पण मनानं राहात नाही! देह सत्संगात आहे, पण मन कामनांत गुंतलं आहे.. मुख में राम बगल में छुरी.. म्हणजे, मुखी शाश्वताचा जप आहे, पण बगलेत विकल्पाची सुरी आहे! ही अवस्था काय कामाची? त्यामुळे नुसता सज्जनांचा संग पुरेसा नाही ते ज्या विचारांत आहेत त्या विचारांचा आंतरिक संगही घडला आणि मुरला पाहिजे!

First Published on September 27, 2017 2:36 am

Web Title: samarth ramdas philosophy 307