18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

४४१. तपासणी

गतीकारणें संगती सज्जनाची।

चैतन्य प्रेम | Updated: September 28, 2017 5:14 AM

जर खरी आंतरिक वाटचाल करायची असेल आणि याच जीवनात खरं समाधान मिळवायचं असेल तर जो खऱ्या अर्थानं अंतर्निष्ठ आहे आणि अखंड परम समाधानात निमग्न आहे, अशाचा संग आणि त्याच्या बोधानुरूप आचरण हाच एकमेव उपाय आहे. समर्थ रामदास विरचित ‘मनोबोध’ अर्थात ‘श्रीमनाचे श्लोकां’च्या १२८व्या श्लोकापर्यंतचे आपले चिंतन वर सांगितलेल्या सूत्रापर्यंत आले आहे. आता पुढील म्हणजे १२९व्या श्लोकाकडे वळू. प्रथम हा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ पाहू, मग मननार्थाकडे वळू.  श्लोक असा आहे :

गतीकारणें संगती सज्जनाची।

मती पालटे सूमती दुर्जनाची।

रतीनायकाचा पती नष्ट आहे।

म्हणोनी मनातीत होऊनि राहे।।१२९।।

प्रचलित अर्थ : सज्जनांच्या संगतीने भाविकांना सद् गति मिळते व दुर्जनांचीही बुद्धी पालटून त्यांच्या ठिकाणी सद्बुद्धी उत्पन्न होते. रतिचा नायक अर्थात पती म्हणजे काम हा महादुर्जन असल्याने तू मनातीत होण्याचा प्रयत्न कर.

आता मननार्थाकडे वळू. इथं पहिल्याच चरणात समर्थ खडसावल्यागत सांगतात की, बाबांनो, सज्जनांच्या संगतीत तुम्ही का आहात, याचा कधी विचार करता का? कशासाठी आलात इथं?  काय साधायचंय? पैसा हवा.. नोकरी हवी.. बढती हवी.. लग्नं व्हावं.. मूलबाळ व्हावं.. यासाठी आलात? ज्याच्या संगतीनं दुर्जनाचीही मती पालटते तो संग लाभल्यावर ‘सज्जन’ म्हणवणाऱ्या, सश्रद्ध म्हणून लौकिक असणाऱ्या तुमची मती का घसरते मग? आत्मकल्याणाच्या नावाखाली येता आणि अहंकार, परदोष चिंतन आणि दुराग्रहापायी अधिक संकुचित का होता? तेव्हा हा पहिला चरण सावध करणारा आहे. सत्संगति ही केवळ आध्यात्मिक गतीसाठीच आहे. मुख्य प्रामाणिक हेतू तोच असेल, तर तुमच्या भौतिकाचाही तो नीट सांभाळ करतो.. पण केवळ भौतिकात उत्तम गती लाभावी, हाच हेतू असेल, तर अशाश्वताच्या गुंत्यात तुम्हाला भरडू देतो आणि त्या प्राप्तीतही मनाला निश्चिंत करणारं खरं सुख नाही, ही जाण आणि जाग आणतो! तेव्हा आयुष्याचा बहुमोल वेळ व्यर्थ जाऊ  द्यायचा नसेल, तर वेळीच सावध व्हा आणि आध्यात्मिक गतीसाठीच सत्संगाचा खरा लाभ घ्या, असंच समर्थ बजावत आहेत. तुम्ही दुर्जन म्हणजे भगवंतापासून दूर करणाऱ्या गुणांनी भारला असलात तरी हरकत नाही. कारण सत्संगाचा प्रभावच असा आहे जो तुमची मती पालटल्याशिवाय राहात नाही. सिद्धारूढ स्वामी हुबळीत आले आणि जंगलात राहू लागले. हळूहळू त्यांचा लौकिक पसरला तसं दिवसापुरतं का होईना ते निर्जन जंगल गजबजू लागलं. काही मत्सरी लोकांना हे सहन झालं नाही. सिद्धारूढ रात्री जंगलात एकटेच असत तेव्हा याचा फायदा घेऊन या लोकांनी कट रचला. एके रात्री दारू पाजून हन्द्रैया नावाचा मारेकरी त्यांच्यावर घातला. रात्रभर तो सिद्धांना काठीनं बडवत होता. सिद्ध घायाळ झाले तरी प्रत्येक फटका स्वीकारताना ‘शिवार्पणम्’ असं ते म्हणत होते. सिद्ध बधत नाहीत, असं वाटून अधिकच संतापून तो मारत होता. पहाट झाली. दुरून लोकांची चाहूल लागली तसा  थकलेला हन्द्रैया घाबरून पळून गेला. तेव्हा त्याच्या चपला मागेच राहिल्याचे पाहून त्या हातात घेत सिद्ध त्याच्या मागोमाग धावत ओरडू लागले की, ‘‘हे देवा जंगलातले काटे तुम्हाला बोचतील.. या चपला घाला!’’ आपल्यासारख्या तुच्छ माणसाच्या चपला हाती घेत स्वत: अनवाणी धावत येत असलेल्या जखमी सिद्धांना पाहून हन्द्रैया हेलावून गेला आणि त्यांच्या पायावर कोसळला. तो खरा दुर्जन होता म्हणून त्याची मती पालटली.. आम्ही धड दुर्जनही नाही म्हणून का आमची मती पालटत नाही?

 

First Published on September 28, 2017 5:09 am

Web Title: samarth ramdas philosophy 308