18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

४४२. अटळ साधना

परमात्म्याशी एकरूप असा जो खरा सज्जन आहे

चैतन्य प्रेम | Updated: September 29, 2017 4:54 AM

परमात्म्याशी एकरूप असा जो खरा सज्जन आहे, सत्पुरुष आहे, त्याचं स्वरूप असीम करुणा आणि जीवहिताच्या कळकळीनं किती व्याप्त असतं, याचाच प्रत्यय सिद्धारूढ स्वामींच्या लीलाप्रसंगात आपण अनुभवला. अशा सत्संगानं भगवंतापासून दुरावलेल्या हन्द्रेय्यासारख्या मद्यधुंद दुर्जनाच्या मतीतही पालट होतो पण त्याच किंवा तशाच सत्संगात वर्षांनुर्वष राहिलेल्यांमध्ये का पालट होत नाही? कारण सज्जनाची संगत केवळ आध्यात्मिक गतीसाठीच आहे, याची जाणीव बरेचदा लोपली असते. जेव्हा एका परमात्म्यावाचून वा सज्जनावाचून कुणाचाच आधार मन घेत नसेल, तेव्हाच जीवनातल्या अडचणी अवश्य त्याच्या पुढय़ात मांडाव्यात. त्यातून मार्ग काढण्याची विनवणी करावी, पण त्यातही आध्यात्मिक जीवनालाच अगक्रम असावा. ही अडचण दूर होऊन साधनेतला व्यत्यय टळावा, एवढाच भाव असावा.. आणि या अडचणी दूर झाल्या नाहीत तरी तुझ्यापासून मनाला दूर जाऊ  देऊ  नकोस, ही भगवंताला प्रार्थना असावी. याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे श्रवणाला मनन आणि चिंतनाचीही जोड असावी. नुसतं सत्संगात राहिलं तरी काम होतं, असं म्हटलं जातं. पण त्यातली मेख लक्षात येत नाही. कारण सत्संगात आपण ‘नुसतं’ राहतो का? नाही! केवळ देह तासन्तास सत्सहवासात असला, पण मन तसूभरही त्यात नसलं तर काहीच लाभ नाही. माता कृष्णाबाईंनी रमण महर्षि यांच्या पुतण्यास दिलेला मोलाचा सल्ला प्रत्येक साधकानं लक्षात ठेवला पाहिजे. महर्षिच्या निर्वाणानंतर वयाची पंचविशी गाठत असलेल्या या तपोत्सुक तरुणाला माता कृष्णाबाई म्हणाल्या की, ‘‘लोक तुला सांगतील की आत्मज्ञानी माणूस ज्या कुळात जन्मतो त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या सात पिढय़ा उद्धरून जातात. पण त्यावर विश्वास ठेवू नकोस. साधनेशिवाय कुणाचाही उद्धार होऊ  शकत नाही आणि साधना ज्याची त्यालाच करावी लागते! महर्षिचा पुतण्या म्हणून लोक तुला मान देतील, भेटवस्तू देतील, दंडवतही घालतील.. पण आंतरिक वाटचालीत यातल्या कशानंही तू एक इंचभरही पुढे सरकणार नाहीस!’’ तेव्हा नुसतं सत्संग लाभून किंवा आपण सत्पुरुषाच्या संगतीत असतो, हा मोठेपणा लाभून काही उपयोग नाही. त्या बोधानुसार वागलं पाहिजे! एकानं निसर्गदत्त महाराजांना मनोमन गुरू मानलं आणि मग म्हणाले, ‘‘नाहं देहो हा त्यांचा जप मी सुरू करतोय,’’ त्यांना म्हटलं, ‘‘असा कोणताही जप महाराजांनी सांगितलेला नाही. मी म्हणजे देह नव्हे, या धारणेत स्थिर व्हायला महाराज सांगतात. पण तसा काही जप नाही.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘पण मला हा जपच आवडला आहे. तो मी सुरू करतोय.’’ त्यांना म्हटलं की, ‘‘आपल्याला आवडतं ते करण्यातच तर अनंत जन्म वाया गेलेत. हाही गेला तर त्याचा काय उपयोग?’’ तेव्हा असं होतं आपलं. निसर्गदत्तांसारख्या पूर्ण ज्ञानी सत्पुरुषाच्या बोधातलंही आपल्या मनाला आवडतं तेवढंच घेऊन काय उपयोग? वाचनातून सत्संग खरा साधलाच नाही, बौद्धिक मनोरंजन तेवढं झालं. नाही का? तेव्हा सत्संग का आहे? तर सज्जन जे सांगतात ते नीट समजून आचरणात आणून आध्यात्मिक गती प्राप्त करून घेण्यासाठी सत्संग आहे. याच्या आड काय येतं? तर आपल्याच मनाच्या सवयी! हे मन साधना पथावरही अनंत कामनांचं वादळ उत्पन्न करतं. पुन्हा मायेत अडकवू पाहतं. या मनापलीकडे गेल्याशिवाय खरा सत्संग नाहीच. म्हणून समर्थ बजावतात, ‘‘रतीनायकाचा पती नष्ट आहे। म्हणोनी मनातीत होऊनि राहे।।’’ रतीचा पती कामदेव यानं शिवाचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिवानं त्याला भस्मसात केलं, हा उल्लेख अर्थपूर्ण आहे.

 

First Published on September 29, 2017 4:49 am

Web Title: samarth ramdas philosophy 309