18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

४४३. शिव आणि काम

भगवान महादेव ध्यानात निमग्न होते तेव्हा कामदेवानं त्यांचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला.

चैतन्य प्रेम | Updated: October 2, 2017 4:33 AM

भगवान महादेव ध्यानात निमग्न होते तेव्हा कामदेवानं त्यांचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानं सर्वप्रथम अप्सरांना पाठवलं. त्यांच्या नृत्यानंही शिवांची अनन्यता, एकरूपता अविचल राहिली. तेव्हा कामदेवानं पुष्पबाण सोडून त्यांचं तप मोडण्याचा प्रयत्न केला. या बाणाचा स्पर्श होताच जागृत झालेल्या शिवानं तृतीय नेत्र उघडून कामदेवाला भस्मसात केलं. हा दाखला समर्थ रामदास ‘मनोबोधा’च्या १२९ व्या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणांत देतात आणि हा रूपकात्मक दाखला मोठा अर्थपूर्ण आहे. नावापासूनच पाहा! कामदेव आणि महादेव!! एक कामनांचा अधिष्ठाता तर दुसरा देवांचाही देव. पण तो देवांचाही देव का ठरला? तर देवांनाही कामनांचा प्रभाव कधी कधी उल्लंघता आला नाही, हे सत्य अनेक पुराणकथांनी लख्खपणे मांडलंय. शिवाच्या वज्ररूप अंत:करणाला मात्र त्या कामनामोहाचा स्पर्शही कधी झाला नाही. शिव म्हणजे जो ‘स: इव’ झाला आहे.. जो मूळ परम तत्त्वाशीच अनन्य एकरूप झाला आहे तो! त्याची ही एकरूपता भंग करण्याची धडपड कामदेवानं चालविली. मनही हीच तर धडपड करतं. एकाशी एकरूप होऊन आत्मसुख भोगण्याऐवजी द्वैतात अडकवून भरडून घेतं! तर आधी ‘अप्सरा’ आल्या.. या ‘अप्सरा’ म्हणजे अंतर्मनात उत्पन्न होणाऱ्या अनंत इच्छा, कामना, वासना. वरकरणी मोहक दिसणाऱ्या, चित्त आकर्षून घेणाऱ्या, पण क्षणात सरणाऱ्या.. चंचल! त्या कामना शिवाच्या अंतर्मनात शिरून नाचण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण तो सफल झाला नाही. अखेर कामदेवानं आपला पुष्पबाण सोडला. साधा फुलांचा बाण तो. तो लागल्यानं शिवानं कशाला क्रुद्ध व्हावं? फुलं ती फुलंच हे खरं, पण फुलांइतकी सजीव कोमल भावग्राही वस्तू सृष्टीत नाही. वाहणाऱ्याच्या अंतर्मनाचा भावदेखील त्याच्या स्पर्शातून ही फुलं ग्रहण करतात आणि पोहोचवतात! सद्गुरूंच्या पूजेतलं फूल जेव्हा आपल्या हाती परत येतं तेव्हा ते प्रसादरूप होतं. त्याआधी परडीतल्या त्या साध्या फुलानं मनातला दिव्यभाव जागा झालेला नसतो. सद्गुरू स्पर्शानं ते साधं फूलही त्यांच्या कृपेचं, करुणेचं वाहक ठरतं. तसं कामदेवाच्या मनातल्या कपटभावानं भारलेल्या त्या पुष्पबाणानं शिवातला क्रोधच जागा झाला. शिवाचा स्वभावच दोन टोकांचा आहे.. भोळा तर इतका भोळा की सर्वस्वाचंही दान करून टाकेल आणि क्रोधी तर इतका क्रोधी की सर्वस्वाचा नाश करून टाकेल! पण या क्रोध आणि भोळेपणात एकच सूत्र आहे ते आहे विरक्तीचं! तपानं प्रसन्न होताच तो तपाच्या प्रमाणात दान देत नाही. तो कैकपटीनं भरभरून देतो. आनंदून देतो. त्याला वाटतं की हा जीव आणखी तपमग्न होईल! पण हाच जीव मायामोहात गुंतू लागला की त्याच्या जीवनात तांडव करून जे जे भ्रामक आहे त्याचा नाश करायला हाच शिव मागेपुढे पाहत नाही. म्हणूनच तर तो ‘आदिनाथ गुरू’ आहे! तेव्हा तुम्हाला पात्रतेपेक्षा अधिक काही देताना आणि पात्रता असूनही तुमच्याकडून ते हिरावून घेताना त्याला फरक पडत नाही. या दोन्हीत तुमचं आत्महित हेच त्याच्यासाठी सर्वतोपरी असतं! तेव्हा कामप्रेरित बाणानं क्रोधित शिवानं तिसरा डोळा म्हणजे ज्ञानचक्षू उघडले आणि त्या तेजदृष्टीत कामाचे सारे भ्रमविभ्रम खाक झाले! म्हणून ध्यानोत्सुक साधकाला समर्थ बजावतात की, ‘‘रतीनायकाचा पती नष्ट आहे। म्हणोनी मनातीत होऊनि राहे।।’’ कामनांचा पती म्हणजे कामनांचा आधार असं जे मन आहे ते सद्गुरूपुढे टिकणारं नाही. म्हणून आधीच त्या मनावर विसंबणं सोड. त्या मनापलीकडे जा!

 

First Published on October 2, 2017 4:32 am

Web Title: samarth ramdas philosophy 310