18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

४४४. अल्प आणि शाश्वत

आता मननार्थाकडे वळू. इथं ‘अल्पसंकल्प’ आणि ‘सत्यसंकल्प’ असे दोन शब्द आले आहेत.

चैतन्य प्रेम | Updated: October 3, 2017 2:43 AM

समर्थ रामदास ‘मनोबोधा’च्या १२९ व्या श्लोकाच्या अखेरच्या चरणात मनालाच मनातीत होण्याचा बोध करतात. मनालाच स्वत:पलीकडे जायला सांगतात.. पण ते शक्य आहे का? उलट साधनापथावर येतानाच मन खूप खळबळ उडवू पाहातं, विकल्पांची वावटळ उठवू पाहातं. याचं कारण या मार्गावरील वाटचालीची अखेर ही आपल्याच मावळण्यात होणार, हे मनाला माहीत असतं! त्यामुळे या मनाला चुचकारत, तुझ्या मनाजोगत्याच गोष्टी घडतील, असं समजावत हळूहळू त्याला व्यापक होण्याची प्रेरणा देत, त्याची जडणघडण करत एक-एक पाऊल टाकावं लागतं. म्हणूनच समर्थही मनातीत होण्याचा सल्ला देतात आणि अचानक, त्यावर काहीच भाष्य न करता पुढील श्लोकाकडे वळतात.  ‘मनोबोधा’च्या १३० व्या श्लोकाकडे आता वळू. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ वाचू, मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे :

मना अल्पसंकल्प तोही नसावा।

सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा।

जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा।

रमाकांत येकांतकाळीं भजावा।। १३०।।

प्रचलित अर्थ : हे मना, विषयाची अल्प कल्पनाही मनात उठू देऊ  नकोस. उलट ब्रह्माचा संकल्प चित्तात वाहत जा. स्वरूपानुसंधान निरंतर ठेवीत जा. हे मना, वादविवादाचा संपर्क ठेवू नकोस आणि विकल्प म्हणजे संशय तर्कटांच्या मार्गात पडू नकोस. यासाठी प्राकृत जनसंबंधांपासून दूर एकांतात जाऊन सीतापती रामाचे भजन करीत जा.

आता मननार्थाकडे वळू. इथं ‘अल्पसंकल्प’ आणि ‘सत्यसंकल्प’ असे दोन शब्द आले आहेत. ‘अल्प’ म्हणजे अगदी थोडं, संकुचित, अतिशय थोडा काळ टिकणारं, अशाश्वत असं. तर ‘सत्य’ म्हणजे व्यापक, स्थिर, शाश्वत, कायमचं टिकणारं असं. थोडक्यात, जे मन अल्प सुखासाठी अविश्रांत परिश्रम करीत आहे त्या मनाला व्यापक सुख म्हणजे काय, याचा विचार करायला समर्थ प्रेरणा देत आहेत. माणूस या घडीला ज्या सुखाची इच्छा धरीत असतो, ते त्याच्या दृष्टीनं मोठंच सुख असतं, ते कायमचं टिकणारं आहे, असंच त्याचं प्रामाणिक मत असतं. त्याच्या कल्पनेनुसारचं ते ‘सुख’ एकदाचं मिळालं तरी मग आयुष्यात आता काही मिळवायचं राहिलं नाही, अशी निश्चिंत भावना मात्र होत नाही! एक तर त्या ‘सुखा’तलं अपुरेपण खुपू लागतं नाही तर जे आपण सुखाचं मानत होतो, ते प्रत्यक्षात दु:खाचं आहे, ही जाणीव होते. जे हिताचं मानत होतो, ते अहिताचंच आहे, ही जाणीव होऊ लागते. या जाणिवेनं क्लेश होतात आणि त्याच वेळी त्यापलीकडील नवं ‘सुख’ खुणावू लागतं. मग मन नव्या उमेदीनं, ‘आता एवढं साधलं तरी सुख मिळेल’, या आशेनं पुन्हा धडपडू लागतं. महाराज म्हणत ना? की, काळ आपल्याला सतत आशेत गुंतवतो आणि अखेर आयुष्य संपवतो! कितीही धडपड केली, तरी अखेपर्यंत मनासारखं सुख काही मिळत नाही. साधं उदाहरण पाहा, लग्न समारंभात पंचपक्वान्नांचं जेवण असतं तरी कुणी तरी म्हणतंच की, ‘‘सगळं उत्तम होतं, पण त्या कोशिंबिरीत थोडं मीठ कमी होतं बघा!’’ म्हणजे सगळं असूनही जे नाही तेच बोचत असतं! तर अशा अनंत अल्प सुखाच्या आशेत गुंतलेल्या मनाला त्या सुखाचं खरं स्वरूप समजणं आणि प्रयत्न करतानाही मनानं आशा-निराशेच्या हिंदोळ्यात कसं अडकू नये, हे उकलणं सोपं नसतंच. म्हणून अल्प सुखाच्या संकल्पात अडकलेल्या मनाला समर्थ सांगत आहेत की सुखाचा संकल्प अवश्य कर, पण ते सुख सत्यात येईल, असंच असू दे. सदा टिकेल, असंच असू दे. निसर्गदत्त महाराजही म्हणत की, इच्छा असण्यात काहीच चुकीचं नाही, फक्त त्यांचा संकुचितपणा चुकीचा आहे!

First Published on October 3, 2017 2:43 am

Web Title: samarth ramdas philosophy 311