18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

४४५. व्याप आणि व्यापक

मनात मी कुणीच नाही, मी फक्त एका भगवंताचा आहे

चैतन्य प्रेम | Updated: October 4, 2017 2:14 AM

 

माझ्या गुरुजींचं प्रथम दर्शन झालं तेव्हाचा त्यांचा बोध आठवतो. त्यांनी विचारलं, ‘‘आपण कोण?’’ मी सहजपणे माझं नाव सांगितलं. आपल्या जन्मानंतर दुसऱ्यानं ठेवलेल्या नावाशी आपण किती एकरूप होतो पाहा! ते नाव उच्चारत असताना ‘मी’च्या सर्व ओळखी जणू त्या नावाला चिकटलेल्या असतात, त्या नावात अंतर्भूत असतात. आपण त्या अध्याहृतही धरलेल्या असतात. तेव्हा ‘आपण कोण’, या प्रश्नाचं उत्तर म्हणून आपलं नाव सांगत असतानाच त्या नावाला चिकटलेला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तर आपल्या मनात सुप्तपणे जागा असतो. या स्वाभाविक सवयीनुसार ‘आपण कोण’, या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी माझं नाव सांगितलं. थोडय़ा वेळानं माझं नाव उच्चारत गुरुजींनी विचारलं, ‘‘— जी साठ वर्षांपूर्वी तुम्ही कुठं होतात?’’ मी थोडं गोंधळून म्हणालो, ‘‘माहीत नाही!’’ मग त्यांनी विचारलं, ‘‘ —जी साठ वर्षांनंतर तुम्ही कुठं असाल?’’ मी अधिकच गोंधळून म्हणालो, ‘‘तेही माहीत नाही!’’ मग हसून गुरुजी म्हणाले, ‘‘मग या मधल्या साठ वर्षांत ‘मी’ म्हणजे अमुक हे जे तुम्ही दृढपणे धरून बसला आहात ते विसरायचं एवढंच अध्यात्म आहे!’’ मग म्हणाले, ‘‘हे स्वत:साठी स्वत:पुरतं विसरायचं आहे, बरं  का.. जगासमोर नव्हे! जगात ही ओळख ठेवावीच लागेल, पण मनात मी कुणीच नाही, मी फक्त एका भगवंताचा आहे, हीच जाणीव उरली पाहिजे!’’ तेव्हा जो अल्प, खंडित, अशाश्वत अशा ‘मी’च्या खोडय़ात अडकला आहे, जो या देहनामाला चिकटलेल्या संकुचित ‘मी’ला जणू अमर मानून जगत आहे, त्याला या संकुचित ‘मी’तून बाहेर काढणं, ही काही सोपी गोष्ट नाही.. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हे जे संकुचिताला व्यापक करणं आहे ना, ते मानसिक पातळीवरचंच आहे बरं का! कारण संकल्प हा अल्पाचा असो की सत्याचा असो, तो मनातच उत्पन्न होतो. मग जे मन अहोरात्र अल्प ‘मी’शी जखडलेल्या संकल्पांत रमत आहे त्याचे संकल्प आधी व्यापक करावे लागतात आणि ही शिकवण, हा हेतू पूर्वापार आहे. म्हणूनच तर ‘सर्वे सुखिन: भवन्तु सर्वे सन्तु निरामया:।’ ही प्राचीन वैदिक प्रार्थना आहे. नुसता ‘मी’ सुखी व्हावा, ‘मी’ निरोगी राहावा.. ही इच्छा नाही तर सर्वाना सुखी होता यावं, सर्वाना निरोगी राहाता यावं, आर्थिक, सामाजिक, मानसिकदृष्टय़ा संपन्न होता यावं, ही इच्छा आहे.. त्या प्रार्थनेला सुसंगत अशा कृतीची जोड लागते. भले ती कृती परिपूर्ण नसू दे, पण त्या तोडक्यामोडक्या कृतीची सुरुवातही प्रार्थनेमागचा प्रामाणिकपणा प्रकट करते. जे. कृष्णमूर्ती मुंबईत आले होते आणि त्यांच्या भेटीला तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी येणार म्हणून कृष्णाजी जिथं उतरले होते तिथं बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यानंच एक प्रसंग सांगितला आहे. या अधिकाऱ्याला तीव्र इच्छा होती की, कृष्णमूर्तीचं एकांतात एकदा तरी दर्शन व्हावं. एके दुपारी तशी संधी अनपेक्षितपणे मिळाली.  हा अधिकारी त्यांच्यासमोर उभा राहिला. कृष्णाजींनी त्यांच्याकडे पाहत विचारलं, ‘‘आपल्याला काय हवंय?’’ यांना काहीच सुचेना तरी पटकन बोलून गेले, ‘‘आत्मशांती!’’ कृष्णाजींनी बसायची खूण केली आणि या अधिकाऱ्याच्या डोळ्यांत एकाग्र नजरेनं पाहत विचारलं, ‘‘दुसऱ्याची मन:शांती ढळण्यासाठी जो जबाबदार आहे त्याला आत्मशांती कशी मिळेल?’’ कृष्णाजी एकटक पाहात असताना या अधिकाऱ्याला अनेक प्रसंग आठवले जेव्हा काही कैद्यांना त्यानं कर्तव्याची सीमारेषा ओलांडून हकनाक छळलं होतं, अहंकारानं हकनाक अडकवलं व जाचलं होतं. जसजसा त्या कैद्यांचा, त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश त्यांना आठवू लागला तसतसं त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. खूप रडून मन हलकं झालं. कृष्णमूर्ती एकटक पाहात किंचित स्मित करीत म्हणाले, ‘‘तुमचं काम झालंय..’’

First Published on October 4, 2017 2:14 am

Web Title: samarth ramdas philosophy 312