11 December 2017

News Flash

४४८. व्यग्र-एकाग्र

भजाया जनीं पाहतां राम येकू।

चैतन्य प्रेम | Updated: October 9, 2017 3:54 AM

जगाची भक्ती करण्यात जर मन रमलं असेल, तर भगवंताची भक्ती होऊच शकत नाही. जे मन जगापासून क्षणभरासाठीही विभक्त होऊ  शकत नाही ते क्षणभरदेखील भगवंताची खरी भक्ती करू शकत नाही. जे मन सदोदित जगात आसक्त आहे ते भगवद्भक्तीत एकाग्र राहूच शकत नाही. रमाकांताचं.. भगवंताचं खरं भजन व्हायला हवं असेल, तर एकांतच साधला पाहिजे. हा एकांत म्हणजे जगातल्या गर्दीपासून दूर जाणं नव्हे, तर मनातल्या गर्दीपासून मोकळं होता आलं पाहिजे! नुसतं लोकांपासून दूर जाऊन एखाद्या निर्जन स्थानी एका खोलीत भले स्वत:ला कोंडून घेतलं, पण मनात उलटसुलट विचार व कल्पना थैमान घालत असतील, तर त्या ‘एकांता’चा काय उपयोग? या एकांताकडे साधकाला वळविण्यासाठी, एकाशीच एकरूप होऊन ऐक्यता, एकरसता हाच अनुभव व्हावा यासाठी समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १३१व्या श्लोकात आता एकत्वाचा त्रिवार उच्चार करीत आहेत. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू.

भजाया जनीं पाहतां राम येकू।

करीं बाण येकू मुखीं शब्द येकू।

क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू।

धरा जानकीनायकाचा विवेकू।।१३१।।

प्रचलित अर्थ : हे मना! तुला भजायला एक राम सर्वोत्तम आहे. तो एकबाणी आणि एकवचनीही आहे. त्या रामाच्या जीवनकार्याच्या नुसत्या दर्शनानं आणि चिंतन-मननानं लोकांचा उद्धार होतो. म्हणून हे मना, त्या रामाचा जो जीवनविवेक आहे त्यानुसार आपलं जीवन घडव.

आता मननार्थाकडे वळू. जे मन एका जगातच अडकून होतं त्या मनाला एका भगवंताच्या भक्तीकडे वळण्याची ठोस प्रेरणा समर्थ देत आहेत. जे मन एका जगालाच आधार मानत होतं त्या मनाला भगवंताच्या परम आधाराकडे समर्थ नेत आहेत. हे वळवणं सोपं नाहीच. आधी प्रापंचिक जनांच्या भजनी लागलेलं मन पारमार्थिक जनांच्या सहवासात आलं असलं तरी जन्मजात प्रपंचासक्त स्वभावानुसार ते भगवंताच्या भजनात न रमता परमार्थाचाही प्रपंचच मांडू पाहात असतं! साधक सत्संगाच्या हेतूनं एकत्र येतात, पण एका रामाकडे लक्ष केंद्रित न करता, एका रामाच्या भजनात एकचित्त न होता ते एकमेकांत लक्ष वळवतात, एकाग्र न होता सामान्य देहभावात व्यग्र होतात आणि पुन्हा नव्यानं जगाच्याच भजनी लागून दुश्चित्त होतात. मनाला या धोक्यापासून समर्थ वाचवू पाहात आहेत आणि तुकारामबुवा म्हणतात ना? त्याप्रमाणे, परमार्थ म्हणजे भातुकलीचा खेळ नाही हो! भ्रामक इच्छांची बोळकी मांडून भक्तीचा पसारा मांडू नका. देवाला तुमच्या भक्तीची गरज नाही. ज्यानं सूक्ष्मदर्शक भिंगातून पाहावं लागणाऱ्या जीवजंतूंपासून ते अजस्र आणि अवाढव्य पशुपक्ष्यांपर्यंतची ही विराट सृष्टी रचली त्याला तुच्छ माणसाच्या अहंकारयुक्त भक्तीची खरंच गरज नाही! ही गरज आपल्याला आहे. कारण जगाच्या मार्गानं अनंत वाटा तुडवूनही खरं सुख काही मिळालेलं नाही. जर ते मिळालं असेल तर मग असमाधान का? अतृप्ती का? हाव का? आणि या हावेला कधीच अंतही नाही आणि त्यामुळेच आहे त्यात समाधानही नाही. हे चित्र पालटायचं तर मुळातच दुरुस्ती झाली पाहिजे. जे जग केवळ स्वार्थपूर्तीतच रममाण आहे त्या जगाची भक्ती म्हणजे आवड सुटली पाहिजे.. आणि एका रामाची म्हणजे शाश्वत तत्त्वांची भक्ती रुजली पाहिजे. ही भक्ती कशी आहे? तर, ‘‘भजाया जनीं पाहतां राम येकू। करीं बाण येकू मुखीं शब्द येकू।’’ सर्व जगात एका रामालाच पाहिलं पाहिजे. कर अर्थात हात म्हणजे कृती ही एकच बाणली पाहिजे आणि मुखानं एकच शब्द निघाला पाहिजे. या ‘एका’चा उलगडा मात्र झाला पाहिजे. नाहीतर पुन्हा घोटाळा आहेच!

 

First Published on October 9, 2017 3:54 am

Web Title: samarth ramdas philosophy 314