11 December 2017

News Flash

४४९. एक-राम

जी गोष्ट अशाश्वत आहे तिच्या अशाश्वत स्थितीचं भान जपायचं.

चैतन्य प्रेम | Updated: October 10, 2017 2:43 AM

सर्व जगात एका रामालाच पाहिलं पाहिजे, ‘कर’ म्हणजे ‘हात’ अर्थात कर्तृत्व क्षमता एका कृतीतच बाणली पाहिजे आणि मुखानं एकच शब्द सतत उमटला पाहिजे, असं समर्थ सांगतात. पण इथं या ‘एका’चा खरा अर्थ उलगडला नाही तर फसगत होण्याचीच भीती असते. काय आहे हा ‘एक’? सर्व जगात एका रामालाच पाहायचं, म्हणजे काय? त्याच्या अनेक अर्थछटा आहेत. एका अर्थानुसार, प्रत्येक प्राणीमात्र हा ‘राम’च आहे असं मानायचं का? तर हो, पण कसा? तर सज्जनरूपी राम तुम्हाला भक्तीत अग्रेसर करीत असतो आणि दुर्जनरूपी राम तुमच्या भक्तीची परीक्षा घेत असतो! भक्तीच्या मार्गावर आपण आहोत त्यामागे भौतिक, प्रापंचिक हेतू आहेत का, याची तपासणी करण्याची संधी हा दुर्जनरूपी राम जणू देत असतो. लंकाधिपती रावणानं सर्व देव बंदिवासात टाकले, यज्ञयाग ही त्या काळची सर्व धार्मिक कृत्यं बंद पाडली, अनेक ऋषीमुनींचा संहार केला. जेव्हा राजाच असा वागतो तेव्हा त्याच्याच राज्यात जो अविचल निष्ठेनं आणि दृढपणानं परमात्म भक्ती करीत राहातो तो खरा भक्त! बिभीषण तसा होता. विचार करा, आपण तसे भक्तिपरायण राहू शकतो का? छोटी-मोठी संकटं, मानहानीचे प्रसंग वा मनाविरुद्धच्या गोष्टी घडताच आपल्या मनाचा तोल ढासळतो. मग आत्यंतिक प्रतिकूलता निर्माण झाली तरी मनानं दृढ राहून भक्तीच्या वाटेवर चालणं जमेल? पण जर जे काही घडत आहे त्यात अडकून आपल्या मनाचा तोल आणि सत्त्व हरवून न देता जे उमजलं आहे ते आचरणात आणणं आणि जे घडत आहे त्यामागेही भगवंताची काही इच्छा असलीच पाहिजे हे जाणणं म्हणजे ‘भजाया जनीं पाहतां राम येकू,’ आहे. तसेच राम म्हणजे सत्य स्वरूप, शाश्वत स्वरूप. त्यामुळे सर्वात एक रामच पाहायचा याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती वा वस्तुमात्राचं सत्य स्वरूपच फक्त पाहायचं. म्हणजेच जी गोष्ट अशाश्वत आहे तिच्या अशाश्वत स्थितीचं भान जपायचं. तिला शाश्वत मानून तिच्यात अडकायचं नाही. त्याचबरोबर अशाश्वतदेखील ज्या शाश्वत आधारावर टिकून आहे त्या शाश्वतालाच जाणायचं म्हणजेही ‘भजाया जनीं पाहतां राम येकू,’ आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक व्यक्ती ही काळाच्या अधीन आणि म्हणूनच अशाश्वत आहे. त्या व्यक्तीला शाश्वत मानून आपण तिच्यातच अपेक्षांसह गुंततो, पण ती व्यक्तीच काय आपणही ज्या शाश्वत चतन्य तत्त्वामुळेच मुळात अस्तित्वात आहोत त्याकडे कधीच लक्ष देत नाही. शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे लहान मूल असतो तेव्हा माणूस खेळात आसक्त  असतो, तारुण्यात तरुणीत आसक्त असतो, म्हातारपणी चिंतेत आसक्त असतो, पण कोणत्याही काळी परम तत्त्वात काही आसक्त होऊन तो निरासक्त  होण्याची संधी साधत नाही! म्हणजे प्रत्येक वयोमानानुसार तो खेळण्यांमध्ये अडकून असतो. या खेळाचा कंटाळा त्याला कधी येत नाही. जगाच्या खेळात गुंतलेल्या मनाला म्हणूनच समर्थ एका रामाकडे वळवण्यासाठी त्या खेळण्यांमध्येच प्रथम राम पाहायला सांगत आहेत! जगाचा हा जो पसारा आहे त्याच्या अस्तित्वाचा आधार काय आहे? माणूस स्वकर्तृत्वाच्या बढाया नेहमीच मारतो, मग त्याच्या प्रत्येक प्रयत्नाला यश का येत नाही? चुकीच्या प्रयत्नांमुळे किंवा प्रयत्नांत कमी पडल्यानं तसं झालं, असा पचित्रा तो घेतो, मग अनेकदा प्रयत्नांत कमी पडूनही वा प्रयत्नांची दिशा चुकूनही यशही मिळालं असतं, ते का? याचं सार्थ उत्तर तो देऊ शकत नाही. म्हणजेच आपल्या प्रयत्नांना दृश्य महत्त्व असलं तरी त्या प्रयत्नांना अदृश्याची, अज्ञाताचीही एक बाजू असते. त्या अदृश्याच्या, अज्ञाताच्या आधाराचा शोध म्हणजेच रामाचा शोध आहे, त्या आधाराच्या जाणिवेनं आंतरिक समाधान पावून जगात निमित्तमात्र होऊन कर्तव्यरत राहणं, हे रामाचं भजन आहे!

First Published on October 10, 2017 2:43 am

Web Title: samarth ramdas philosophy 315