11 December 2017

News Flash

४५०. शब्द-बाण

जन्मभर आपल्याला प्रारब्धानुसार अनंत र्कम करावीच लागतात.

चैतन्य प्रेम | Updated: October 11, 2017 2:30 AM

 

या अशाश्वत जगाच्या शाश्वत आधाराचं भान बाळगून जगात वावरायचं, दृश्य जगामागील अदृश्य तत्त्व जाणण्याचा प्रयत्न करायचा, स्थूल जगामागील सूक्ष्म तत्त्व उकलण्याचा प्रयत्न करायचा आणि ज्ञात जीवनप्रवाहामागील अज्ञात कारणप्रवाह शोधण्याचा अभ्यास करायचा म्हणजे खरी आंतरिक वाटचाल करणं आहे. या वाटचालीत अशाश्वतामागील शाश्वत तत्त्व हाच राम आहे, जो सर्वत्र रमण करतो, सर्वत्र रम्यमान आहे त्यालाच राम म्हणतात, हे उमगतं तेव्हा खरं ‘रामदर्शन’ आणि ‘रामभक्ती’ सुरू होते. जगातलं प्रत्येक दृश्य-अदृश्य रूप शाश्वत रामाकडे वळवत आहे, हे जाणवतं तेव्हा खरी रामभक्ती सुरू होते. मग? समर्थ म्हणतात, ‘‘करीं बाण येकू मुखीं शब्द येकू!’’ आधीच सांगितल्याप्रमाणे ‘कर’ म्हणजे कर्तृत्वक्षमता वा कृती. ‘करीं बाण येकू,’ म्हणजे कृती एकाचीच बाणली पाहिजे. एक म्हणजे एक राम अर्थात एकमेव असं शाश्वत तत्त्व. बाणणं म्हणजे भिनणं. म्हणजेच माझी प्रत्येक कृती ही शाश्वताचं भान बाळगून झाली पाहिजे. त्याचबरोबर ‘मुखीं शब्द येकू’ म्हणजे मुखानंही एका रामाचाच उच्चार झाला पाहिजे. अर्थात निस्सार, असार, अशाश्वता, निर्थक जे आहे ते बोलण्यात गोडी न उरता जे शाश्वता आहे, सारभूत आहे, सार्थक आहे त्याच्या उच्चारातच आनंद वाटला पाहिजे. जन्मभर आपल्याला प्रारब्धानुसार अनंत र्कम करावीच लागतात. त्यातली अनेक निर्थकही असतात, पण अटळही असतात. पण त्याचबरोबर गरज नसताना मनाच्या ओढीनुसार आपण अनंत निर्थक र्कम करतो ती गोष्ट वेगळीच! अगदी त्याचप्रमाणे प्रारब्धानुसार आपल्याला जन्मभर कुणा ना कुणाशी बोलावं लागतंच. त्यातलं बरंचसं बोलणं निर्थक, पण अटळही असतं. पण त्याचबरोबर आपण मनाच्या ओढीनुसारही बरंचसं निर्थक बोलण्यात वेळ वाया घालवत असतोच. तेव्हा ‘करीं बाण येकू मुखीं शब्द येकू,’ ही स्थिती साधण्याचा अभ्यास हा हे जे मनाच्या ओढीनं निर्थक वागणं व बोलणं आहे ते कमी करण्यापासून सुरू झाला पाहिजे. थोडक्यात, जगातलं पाहणं, वागणं आणि बोलणं या तिन्ही गोष्टींमधला जो निर्थकपणाचा भाग आहे तो घटत गेला पाहिजे. निर्थक पाहण्यात, वागण्यात वा  बोलण्यात आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ वाया जात नाही ना, याबाबत आपण सजग आणि सावध राहिलं पाहिजे. ‘दासबोधा’च्या पाचव्या दशकाच्या नवव्या समासात समर्थ म्हणतात, ‘‘सावध दक्ष तो साधक। पाहे नित्यानित्य विवेक। संग त्यागूनि येक। सत्संग धरी।।’’ आपल्या जगण्यात काही निस्सार आहे का, निर्थक आहे का आणि त्याची आपल्या अंत:करणात ओढ आहे का, याबाबत जो सावध आणि दक्ष असतो तोच खरा साधक असतो. तो नित्य काय आणि अनित्य काय, शाश्वत काय आणि अशाश्वत काय, याचा नेहमीच निवाडा अर्थात विवेक करतो. जे जे अशाश्वता आहे त्याचा मनातला संग सोडून एका शाश्वताचाच संग दृढपणे धरतो! तेव्हा अशाश्वत जीवनातही एका शाश्वताचीच निवड करणं म्हणजे रामाची निवड करणं आहे. ‘मनोबोधा’च्या १३१ व्या श्लोकाच्या अखेरच्या चरणात समर्थही हाच नित्याचा विवेक करण्यास सांगतात (धरा जानकीनायकाचा विवेकू।।). आणि जेव्हा साधकाचं जीवन असं सर्वार्थानं एका शाश्वताशीच एकरूप होईल तेव्हा त्याच्या संपर्कात येणाऱ्या तिन्ही प्रकारच्या लोकांचा उद्धार होईल! हीन, मध्यम आणि उच्च असे तिन्ही लोक आपल्या अंतरंगातही असतात! आपल्या काही भावना या हीन असतात. त्या आपल्याला मनुष्यत्वापासून खाली खेचत असतात. काही मध्यम असतात, पण त्या कधी हीनत्वाकडे झुकतील, हेही सांगता येत नाही. काही भावना या उच्च असतात, पण त्या सात्त्विक अहंकारालाही बळ देऊ  शकतात आणि म्हणूनच धोकादायक ठरू शकतात! एका शाश्वतनिष्ठ आधारावरच त्या योग्य दिशेनं वळतात आणि आपलाही उद्धार करतात.

First Published on October 11, 2017 2:30 am

Web Title: samarth ramdas philosophy 316