आत्मशोध, आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करीत जगात व्यवहार करण्याची प्रेरणा समर्थ रामदास यांनी ‘मनोबोधा’च्या १३२व्या श्लोकात दिली. मात्र ती स्वबळावर थोडीच साध्य होते? जगात वावरतानाही आत्मभान कसं जपावं, हे जो खरा आत्मस्थ आहे, ‘स्व’मध्ये स्थित आणि स्थिर म्हणूनच स्वस्थ आहे त्याच्याकडूनच शिकता येतं. असा केवळ एक सद्गुरूच असतो आणि त्याचंच सूचन ‘मनोबोधा’च्या पुढील १३३ आणि १३४ या दोन श्लोकांत समर्थ करीत आहेत. तर प्रथम हे दोन्ही श्लोक व त्यांचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. तर हे दोन श्लोक असे :

हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी।

जेणें मानसीं स्थापिलें निश्चयाशीं।

तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे।

तया भाषणें नष्ट संदेह मोडे ॥१३३॥

नसे गर्व आंगीं सदा वीतरागी।

क्षमाशांति भोगी दयादक्ष योगी।

नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा।

इहीं लक्षणीं जाणिजे योगिराणा ॥१३४॥

प्रचलित अर्थ : जो हरीभक्त आहे, विरक्त आहे आणि ज्ञानवंत म्हणजे भक्तीवैराग्यसंपन्न आहे; जो आत्मनिश्चयावर आरूढ आहे, त्याच्या दर्शन-स्पर्शनानंदेखील पुण्य जोडलं जातं. त्याच्या संभाषणाने मनातले सर्व संदेह नष्ट होतात (१३३). त्याच्यात गर्वाचा लवलेश नाही, तो सदासर्वदा वैराग्यसंपन्न आहे, क्षमा व शांती नित्य त्याच्यापाशी आहेत, भूतदयेत तो तत्पर आहे, रामचरणी जो अखंड मनानं जोडलेला आहे, त्याला लोभ नाही, क्षोभ नाही म्हणून दैन्यही नाही. या लक्षणांनी युक्त असा तो योगीश्वरच आहे (१३४).

आता मननार्थाकडे वळू. हा सद्गुरू हरीभक्त आहे. अर्थात परम तत्त्वापासून तो क्षणभरही विभक्त नाही. त्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक बोलण्यात, प्रत्येक व्यवहारात परम तत्त्वाचंच भान क्षणोक्षणी असतं. तो जगात असूनही जगात अनुरक्तनसतो, तर विरक्त असतो.  आध्यात्मिक मान्यतेनुसार ‘विज्ञान’ म्हणजे आत्मानुभव वा सत्यानुभव. अर्थात परम तत्त्वाचा अनुभव. तर या अनुभवाचा तो जणू स्रोतच असतो. त्यानं मनात दृढनिश्चय केला असतो, असं समर्थ म्हणतात. हा दृढनिश्चय आहे प्रत्येक जीवमात्राला शाश्वताकडे वळविण्याचा, अशा शाश्वताच्या जाळ्यातून प्रत्येकाला सोडविण्याचा. अशा दृढसंकल्पी सद्गुरूच्या नुसत्या दर्शनानं आणि स्पर्शनानं पुण्य जोडतं, म्हणजे काय हो? याचे दोन अर्थ आहेत. त्यांना पाहणं म्हणजे त्यांचा जीवनव्यवहार पाहणं. परमात्म्याशी त्यांची असलेली ऐक्यता पाहणं. त्या ऐक्यतेतून त्यांच्या प्रत्येक कृतीत आलेली निर्भयता, नि:शंकता आणि निश्चिन्तता पाहणं. हे झालं नुसतं पाहणं. ती ज्या परमात्म भावानं आली आहे, असं जाणवतं त्या परमात्म्याबद्दल मनात जेव्हा आस्था उत्पन्न होते आणि आपलंही जीवन भक्तिमय असावं, असं वाटून प्रयत्न सुरू होतात तेव्हा खरं सद्गुरू दर्शन झालं, असं मानता येईल. त्यामुळे साधक अधिक व्यापक होत जाईल, त्याच्या अंतरंगातला संकुचितपणा झडू लागेल. मनुष्य जन्माला येऊनही माणुसकीनं न वागण्याचं पाप कमी होऊ लागेल. हेच दर्शनानं जोडलं जाणारं पुण्य आहे! ‘स्पर्शन’ म्हणजे यापुढची लगतची पायरी आहे. पाहणं वेगळं आणि जे पाहिलं ते अनुभवणं वेगळं. पाहण्यापेक्षा स्पर्शानं तात्काळ अनुभव येतो. ‘चहाचा कप गरम आहे,’ असं ऐकलं, तो कप पाहिला तरी गरमपणा सार्थपणे समजूच शकत नाही; पण जेव्हा त्या कपाला आपण स्पर्श करतो तेव्हा तो गरमपणा त्या क्षणीच अनुभवता येतो. तर सद्गुरूंचा जीवनव्यवहार पाहणं वेगळं आणि आपल्या जीवनात तो उतरणं वेगळं. जेव्हा तसे प्रसंग आपल्या जीवनाला स्पर्श करतील आणि त्या वेळी आपण परमभावाशीच दृढ राहू तेव्हाही परमात्म विस्मरणाचं पाप उरणार नाही आणि पुण्यच जोडेल. समर्थ म्हणतात ते, ‘तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे,’ ते पुण्य हे असं आहे.