योग्य-अयोग्यतेची, हित-अनहिताची पर्वा न करता मुलाची प्रत्येक मागणी पूर्ण करीत राहणारी आई खरी कर्तव्यदक्ष आई नव्हे. अगदी त्याचप्रमाणे शिष्याची भौतिकासाठीची प्रत्येक मागणी पूर्ण करीत राहणारा गुरूही कर्तव्यदक्ष सद्गुरू नव्हे! खऱ्या सद्गुरूला सदोदित शिष्याच्या आत्महिताचीच चिंता असते.. आणि हे सर्व करीत असतानाच तो योगी म्हणजे परमतत्त्वाशी सतत ऐक्य पावलेला असतो. तो असा असतो म्हणूनच तर तो समर्थाच्या शब्दात सांगायचं, तर ‘नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा,’ असा असतो! ज्याला शिष्याकडून काही लालसा आहे,  भौतिकातलंच काही तरी मिळवायचं आहे आणि त्यामुळेच जो शिष्याला कधी दुखवू इच्छित नाही त्याच्यातच लोभ, क्षोभ आणि दैन्यता म्हणजे लाचारी असते!

क्षोभ म्हणजे नुसता राग नव्हे, तर चित्तातली खळबळ म्हणजेही क्षोभ आहे. जर शिष्याकडून भौतिकातलं काही तरी मिळवण्याचा लोभ म्हणजेच लालसा असेल, तर हा गुरूही त्याच्या तालावर नाचणार! मग असा शिष्य नाराज होऊ  नये म्हणूनच तो धडपडणार. यामुळे त्याच्या चित्तात सदैव अस्थिरता, खळबळ राहणार. मग त्याच्या वागण्यात दैन्य अर्थात लाचारी आल्याशिवाय राहत नाही. साधा प्रश्न आहे.. शिष्य सांगतो त्यानुसार गुरूनं चालावं की गुरू सांगतो त्याप्रमाणे शिष्यांनी चालावं? कुणीही म्हणेल की गुरू सांगतो त्याप्रमाणे शिष्यांनी चाललं पाहिजे. प्रत्यक्षात आज काय दिसतं? गुरूनं कुठं, कधी ‘सत्संग मेळावे’ घ्यायचे, कुणाला भेटायचं, हेसुद्धा शिष्यच ठरवतात आणि गुरू त्यांच्या सांगण्यानुसार जातो! खरा सद्गुरू मात्र शिष्याला आपल्या मार्गावर चालायला लावतो. आत्महिताच्या मार्गात जो शिष्य कुचराई करतो त्याला फटकारताना त्या शिष्याचा भौतिकातला नावलौकिक, त्याची श्रीमंती, त्याचा आपल्या भौतिक सुखसोयींसाठी होऊ  शकणारा उपयोग; या कशाचाही ते तिळमात्रदेखील विचार करीत नाहीत. म्हणूनच समर्थ त्यांचं वर्णन करताना म्हणतात, ‘नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा!’ आणि त्यांच्या या स्वरूपस्थ स्थितीचं रहस्य त्यांच्या ‘योगी’ असण्यातच दडलं आहे. समर्थ त्यांचं वर्णन ‘तर योगीराणा’ या शब्दात करतात. योग म्हणजे जोडलं जाणं, एकरूप असणं. सद्गुरू हे योगीराज आहेत. म्हणजेच समस्त योगातला जो श्रेष्ठ योग त्याचे ते सम्राट आहेत. हा परमयोग म्हणजे शाश्वत परम तत्त्वाशी अभिन्नता! परमतत्त्वाशी ते सदैव एकरूप असतात तर आपण संकुचित स्वार्थबुद्धीशी सदैव एकरूप असतो. त्यायोगे आपण ‘मी’च्या सुखाच्या इच्छेनं जगात गुरफटतो आणि दु:खाच्या भीतीनं व्याप्त होऊ  शकतो. सद्गुरू मात्र सदैव व्यापक, शाश्वत तत्त्वाशी जोडले गेले असल्यानं सदैव व्यापक आणि शाश्वत स्थितीपासून कधीच ढळत नाहीत. मात्र खऱ्या सद्गुरूची प्राप्ती काही सोपी गोष्ट नाही. आजही खरे सद्गुरू आहेत आणि त्यांचं परमार्थ जागृतीचं कार्य नि:स्पृहपणे सुरू आहे. त्यातले बहुतांश जत्रेपासून दूर राहून मूकपणानं कार्यरत आहेत. काही प्रसिद्धही आहेत आणि त्यांचा शिष्यवर्गही मोठा आहे, पण मूळ आध्यात्मिक हेतूपासून ते लेशमात्रही ढळत नाहीत. तरी हे अपवाद वगळले तर स्थिती दारुण आहे. अध्यात्माच्या नावावर भरलेल्या रंगीबेरंगी बाजारात ‘सद्गुरू’ म्हणवून घेणाऱ्या अनेकांनी आपापली दुकानं थाटली आहेत. वलयांकित लोकांचा आणि राजकारण्यांचा आश्रय मिळवून आपलं प्रभावक्षेत्र वाढविण्याच्या लालसेनं अनेक स्वयंघोषित ‘गुरूं’ना पछाडलं आहे. समर्थ जी लक्षणं सांगतात ती तर त्यांच्यात पुसटशीदेखील दिसत नाहीत. या वास्तवाची इतकी किळस यावी की अध्यात्मावरचा लोकांचा विश्वासच उडावा. वैराग्य, सर्वात्मभाव, त्याग आणि तपश्चर्या हे शब्दही खोटे वाटावेत! तरीही खरे सद्गुरू आहेतच. त्यांची प्राप्ती  सोपी नाही. अर्थात ती अशक्य मात्र नाही!

10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?