News Flash

४५७. सज्जन संग

धरीं रे मना संगती सज्जनाची।

खरा सद्गुरू प्राप्त होणं सहज नसलं तरी अशक्य नाही. त्यासाठीचा उपाय समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १३५व्या श्लोकात सांगत आहेत. प्रथम तो श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे :

धरीं रे मना संगती सज्जनाची।

जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची।

बळें भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे।

महा क्रूर तो काळ विक्राळ भंगे॥१३५॥

प्रचलित अर्थ : हे मना! अशा समस्त लक्षणांनी युक्त सज्जनांची संगती धर. सत्संगतीने दुर्जनांचीही बुद्धी पालटते. सद्भाव, सद्बुद्धी आणि सन्मार्गाचा अनायास लाभ होतो. महाक्रूर अशा यमराजाचीही भीती उरत नाही अशी निर्भयता प्राप्त होते.

आता मननार्थाकडे वळू. गेल्या श्लोकात सद्गुरूची लक्षणं समर्थानी सांगितली आहेत. या श्लोकात अशा लक्षणांनी युक्त सज्जनाची संगत धरायला समर्थ सांगत आहेत. आता प्रश्न असा की या सर्व लक्षणांनी युक्त सज्जन म्हणजेच सद्गुरू सापडणं सोपं नाहीच. पण अध्यात्म्याच्या मार्गावर आल्यावर सद्गुरूचा शोध आपण घेऊ लागतो तो घेताना ही लक्षणं लक्षात ठेवली तरी गुरूपदाचे ढोंग करणाऱ्यांपासून बचाव करून घेता येईल. खरं पाहता आपल्या बुद्धीनं सद्गुरूचा शोध घेण्याचा प्रयत्न माणूस करतो आणि त्याच्या बौद्धिक पातळीनुसारच गुरू भेटतो! माणसाची बुद्धी ही ‘मी’ आणि ‘माझे’लाच चिकटली असते. त्यामुळे या ‘मी’ आणि ‘माझे’पणाची जो भलामण करतो, त्याच्या जोपासनेसाठीच जो प्रोत्साहित करीत राहतो तोच गुरू माणसाला खऱ्या ताकदीचा वाटतो आणि आवडतो. खरा गुरू हा ‘मी’ आणि ‘माझे’पणाच्या सीमा तोडणारा असतो. त्याच्यात समर्थ सांगतात ती आणि त्याहूनही अनंत लक्षणं असतात. असा सद्गुरू सहजी सापडत नाही, पण ज्यांच्यात ही लक्षणं काही प्रमाणात का होईना जाणवतात अशा सज्जनांचा सहवास मिळवण्याचा प्रयत्न मात्र करता येतो. तो प्रयत्न केला पाहिजे. कारण त्या सहवासानेच कदाचित खऱ्या सद्गुरूंपर्यंत पोहोचता येईल. मात्र त्याच वेळी आचरणाची काही पथ्येही पाळली पाहिजेत. या सहवासाचा किंवा संगतीचा मुख्य हेतू मात्र विसरता कामा नये. जीवनाचं जे वास्तविक सत्य आहे त्याचा शोध घेणं, ही या मार्गावर येण्यामागची प्रेरणा असते. एखाद्या भावनिक आघातामुळे आपण या मार्गाकडे आलो आहोत, असं काही जण मानतात. मात्र जीवनातलं दु:खं किंवा आघात हा निमित्तमात्र असतो. त्या आघातानं अंतर्मुख होण्याची संधीही माणसाला मिळते. असं अंतर्मुख होऊ लागताच मनात प्रश्न उमटतात की, जीवनाचं वास्तविक सत्य स्वरूप तरी काय आहे? माझं सत्य स्वरूप काय आहे? ‘कोऽहं’? हा मूळ प्रश्न आहे आणि ‘सोऽहं’ हे त्याचं उत्तर अनुभवानं गवसेपर्यंत खरं समाधान नाही. त्यामुळे या आत्मस्वरूपाची जाण करून देणाऱ्या सद्गुरूच्या शोधात असताना परमात्म कृपेनं सज्जनांचा संग लाभतो. त्या संगाचं मुख्य कारण दुर्लक्षित झालं, तर नुसत्या सहवासाचंच स्वार्थप्रेरित प्रेम जडतं. तेव्हा ‘धरीं रे मना संगती सज्जनाची जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची,’ हा या संगतीचा मुख्य प्रारंभिक हेतू आहे. हा दुर्जन कुठे बाहेर नाही. तो आपल्या अंत:करणातच आहे. आपल्यात वृत्तीपालट घडावा, ही इच्छा या संगतीनं निर्माण होते. आपल्यातल्या दोषांची जाणीव होते.  या भक्तांमधली त्यागबुद्धी, सद्गुरू भक्तीमुळे आलेली निर्भयता, भगवंतावरील प्रेम आणि वागण्या-बोलण्यातील सहजता, माधुर्य आणि नि:स्वार्थ भाव याचा परिणाम साधकावर झाल्याशिवाय राहात नाही. त्यायोगे भगवंतापासून दूर करीत राहणारी दुर्बुद्धी ओसरू लागते आणि आपल्या वृत्तीतला दुर्भाव सलू लागतो. पुढे समर्थ सांगतात, ‘बळें भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे!’ म्हणजे या संगतीनं भाव आणि सद्बुद्धी बळावते आणि साधक सन्मार्गाला लागतो!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 3:26 am

Web Title: samarth ramdas philosophy 323
Next Stories
1 ४५६. योगीराज
2 ४५५. दयादक्ष
3 ४५४. दिव्य लक्षण
Just Now!
X