मुळात काळाचा प्रवाह सतत वाहता आहे. प्रत्येक क्षण हा ‘आहे’ म्हणता म्हणता ‘होता’ ठरतो आणि पुढचा क्षण आपल्या वाटय़ाला येईलच, याची कोणतीही शाश्वती नसताना तो भविष्यकाळ म्हणून क्षणार्धात येईलच, असं आपण गृहीत धरीत असतो. तेव्हा वेगानं वाहत असलेल्या कालप्रवाहातला प्रत्येक क्षण नित्यनूतन असताना, गेलेल्या अनंत क्षणांना आपणच जेव्हा स्मृतीच्या पकडीत घट्ट धरून ठेवतो तेव्हा तोच भूतकाळ म्हणून कायम होतो. त्या स्मृतीच्या आधारावर आपण येणाऱ्या क्षणांचा जेव्हा विचार करतो तेव्हा तोच भविष्यकाळ असतो. या दोहोंच्या पकडीत वर्तमानकाळ मात्र बराचसा अनवधानानं सरत असतो. खरं तर ‘भूतकाळा’तल्या स्मृती प्रेरकही असू शकतात, आपल्या वर्तन /आकलनातील चुकांची जाणीव करून देणाऱ्या – म्हणूनच स्वसुधारणेला वाव देणाऱ्याही असू शकतात. त्यातून भविष्यकाळाचंही योग्य नियोजन होऊ  शकतं.. पण माणूस सहसा सकारात्मकतेशी दृढ राहात नाही. नकारात्मकतेच्या जाळ्यात तो पटकन सापडतो. त्यामुळे भूतकाळातल्या वेदनादायक, दु:खदायक आठवणींचं ओझं कालप्रवाहात टाकून देऊन तो मोकळा होत नाही. ती दु:खं आणि त्यायोगे स्वयंपीडाकारक अशी नकारात्मकता तो बराच काळ जोपासत राहतो. त्याच भयाच्या आधारानं भविष्यकाळाविषयीही तो अनेकदा नकारात्मकच विचार करतो. खरा सज्जन संग जेव्हा मिळतो तेव्हाच खऱ्या सद्गुरूच्या प्राप्तीचा मार्ग सुकर होत जातो. त्यानंतरच मनात भूतकाळ आणि भविष्यकाळाविषयी जी नकारात्मकता आहे, जे भय आहे त्याचा निरास होत असतो. वर्तमानातील क्षणही अनवधानानं नव्हे, तर पूर्ण अवधानपूर्वक जगायची कला सद्गुरूंच्या सहवासातच शिकता येते. त्याच्याशिवाय अवधान, निर्भयता, नि:शंकता अन्य कुणाकडूनही अप्राप्य आहे. का? याचं कारण ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १३६व्या श्लोकात समर्थ रामदास सांगत आहेत. प्रथम हा मूळ श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे :

भयें व्यापिलें सर्व ब्रह्मांड आहे।

भयातीत तें संत आनंत पाहें।

जया पाहतां द्वैत कांहीं दिसेना।

भय मानसीं सर्वथा ही असेना।।१३६।।

प्रचलित अर्थ : या ब्रह्मांडातील प्रत्येक प्राणिमात्र भयाने व्यापलेले आहेत. पण केवळ त्रिगुणातीत शाश्वत परमात्म्याशी जोडले गेलेले संतच अनंताशी एकरूप असल्याने भयातीत आहेत. त्या अनंत निर्गुणाचा विचार करू जावे, तर तेथे द्वैत काही नाही. त्यामुळे भयही नाहीच.

भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे! या ब्रह्मांडातील प्रत्येक जीवमात्र हा भयानं ग्रासलेला आहे. हे कसलं भय आहे हो? वरवर पाहता भय अनंत प्रकारचं दिसत असलं तरी ते मूलत: मरणभय आहे. लहानशा मुंगीपासून ते अजस्र प्राण्यापर्यंत प्रत्येक जणात आपला जीव वाचविण्याची बुद्धी उपजत प्रविष्ट आहे. माणसाची मात्र गोष्ट थोडी वेगळी आहे. त्याच्यात मरणभय आहेच, पण जीवनभयही आहे! त्याला मरणाची भीती वाटतेच, पण काहीवेळा तेवढीच किंवा त्यापेक्षाही अधिक जगण्याची भीती वाटते. त्यामुळे निराशेनं खचत नकारात्मकतेच्या पूर्ण आहारी गेलेला माणूस जगणं त्यागून मृत्यूला कवटाळतो. स्वत:चं जीवन असं संपवणं हा वेडेपणा असला, तरी त्यासाठीही धाडस लागतं, पण प्रतिकूलतेशी धीरानं झगडत जगण्याला सामोरं जायला खरं धाडस लागतं. तेवढं धाडस प्रत्येकात असतंच, पण आपणच भयगंडानं पछाडून तो स्वत:हून गमावतो. या भयाचा सामना नेमका कसा करायचा, हे मात्र माणसाला उमगत नाही. मग भले तो प्रतिकूलतेशी झुंजत जगण्याचा प्रयत्न नेटानं का करीत असेना!