माणसाला मृत्यूचंच नाही, तर कधी कधी जगण्याचंही भय वाटतं. जीवनातील प्रतिकूलता, संकटं आणि द्वंद्वात्मकता यांचा धीरानं सामना करण्याऐवजी त्याला मृत्यूचाच स्वीकार करावासा वाटतो. जगणं नाकारून मरण कवटाळण्याचा आत्मघात केवळ मनुष्यप्राणीच करतो. याचं कारण त्याच्या जीवनातील भयाचे प्रकार, स्तर अनेकानेक आहेत आणि मानसिक भयाच्या व्याप्तीचा विस्तार आणि खोलीचा थांग अद्यापही लागलेला नाही. माणसाला हानीचं भय आहे, अपमानाचं भय आहे, वियोगाचं भय आहे, लोकनिंदेचं भय आहे, अपयशाचं आणि अपघाताचं भय आहे.. एवढंच नाही त्याला आपल्या कातडीच्या काळेपणावर मात कशी करावी, याचीही चिंता आहे आणि मृत्यूनंतर आपल्या प्रियजनांच्या निर्वाहाचीही चिंता आहे! या भयाच्या भांडवलावरही किती तरी उद्योग उभे आहेत आणि धर्माचाही बाजार होण्यात याच भीतीचा वाटा मोठा आहे. तेव्हा या भीतीचा सामना कसा  करावा, हा प्रश्न माणसाला नेहमीच सतावतो. संतसत्पुरुषांमध्ये मात्र त्याला या भयाचा अभाव दिसतो.. आणि खरं तर त्या निर्भयतेच्या, नि:शंकतेच्या, निश्चिंतीच्या ओढीनंच माणूस त्यांच्याकडे वळतो. साईबाबा असोत की अक्कलकोट महाराज, गजानन महाराज असोत की गोंदवलेकर महाराज; खरा साक्षात्कारी सत्पुरुष; मग तो कोणत्याही काळातला असो, तो भयातीतच असणार! निर्भयता ही त्यांची पहिली खूण आहे.

समर्थही म्हणतात, ‘भयें व्यापिलें सर्व ब्रह्मांड आहे। भयातीत तें संत आनंत पाहें।’ समस्त ब्रह्मांड भयानं व्यापलेलं आहे आणि केवळ संतच भयातीत आहेत, भयाच्या पलीकडे गेलेले आहेत, भयाची पकड झुगारून दिलेले आहेत. असं का?

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
chaturang article loksatta
‘भय’ भूती : वारसा हक्काने मिळालेली भीती
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

कारण ते अनंताला पाहतात! जे जे व्यापक आहे, अनंत आहे, शाश्वत आहे त्याच्यात जो सदोदित निमग्न आहे, त्यालाच भय शिवू शकत नाही, तोच भयाला झुगारून देऊ  शकतो. कारण जे जे संकुचित आहे, अस्थिर आहे, अशाश्वत आहे त्यालाच नाशाचं, विरण्याचं, संपून जाण्याचं भय आहे! जो अशाश्वतात निमग्न आहे, अशाश्वतालाच जो आधार मानत आहे, त्यालाच तो आधार गमावला जाण्याची भीती आहे! अस्थिराच्याच आधारानं जो स्थैर्य मिळवू पाहात आहे त्यालाच अस्थिरतेची भीती आहे. संत मात्र केवळ एका शाश्वत परमात्म तत्त्वावर सर्व सोडून देऊन कार्य तेवढं करीत राहतात. माणूस मात्र सीमित अशा स्वकर्तृत्वावर विसंबून फलाशेनं कर्म करीत राहतो. म्हणूनच तो कृती सुरू करण्यापूर्वीही साशंक असतो, कृती करतानाही तिच्या अचूकतेबाबत साशंक असतो आणि कृती झाल्यावर फळ काय मिळेल, या भावनेनं साशंक असतो. त्यामुळेच कृती करण्याआधी, कृती करताना आणि कृतीनंतरही तो फलासक्त होऊन तळमळत असतो. संत मात्र सर्व कर्तेपण परमात्म्याकडे सोपवतात आणि आपण निमित्तमात्र राहतात. त्यामुळे कार्य अचूक करूनही त्याच्या फळाबाबत ते निरासक्त आणि निश्चिंत असतात. या निर्भयतेमागचं आणखी एक कारण समर्थ सांगतात, पण ते कळणं आणि पटणं अतिशय कठीण आहे. हे कारण म्हणजे अभेददृष्टी! या सद्गुरूला पाहू जाता त्याच्यात द्वैत काही आढळत नाही. दुजाभाव दिसत नाही. सर्वत्र तो एका परमात्म्यालाच पाहतो. आपल्याच हाताची आपल्याला भीती वाटते का? नाही. कारण तो हात आणि मी, यांच्यात कोणताही दुजाभाव नाही, परकेपणा नाही. तसं समस्त चराचर आणि आपल्यात काही दुजाभावच उरत नाही तेव्हा कशाचीच आणि कुणाचीच भीती वाटत नाही. आता हे आपल्याला अशक्य कोटीतलं आणि म्हणूनच अविश्वसनीय वाटतं. पण निसर्गाच्या सान्निध्यात कार्य करीत असलेल्या एखाद्या समाजसेवकाच्या अवतीभवती हिंस्र प्राणीही गुण्यागोविंदानं वावरताना बघताना ते अविश्वसनीय वाटत नाही!