अशाश्वताला शाश्वत मानलं आणि ते शाश्वत राहत नाही, या अनुभवानं दु:ख झालं. तरीही अशाश्वतात पुन:पुन्हा गुरफटण्याची आणि त्यावर विसंबण्याची सवय काही सुटली नाही. अशाश्वतात गुंतताना ते शाश्वतच राहावं, अशी धडपड आणि ते शाश्वत राहील का, ही भीतीही कायमची पाठीस लागली. त्यामुळे अशाश्वतात शाश्वत काय आहे, अनित्यात नित्य काय आहे, मिथ्या ज्या आधारावर जाणवतं ते सत्य अस्तित्व कोणतं आहे, याचा शोध घ्यावा लागेल. कारण समस्त द्वैताचा पसारा या मिथ्यत्वाला सत्यत्व दिल्यानंच विस्तारला आणि बळकट झाला आहे. जोवर या द्वैतमय स्थितीलाच आपण सत्यत्व देत आहोत तोवर संतसज्जनांचा सहवास लाभूनही अद्वैताचं खरं आकलन होणार नाही. जे मिथ्या आहे तेच सत्य मानण्याची सवय मोडणार नाही आणि संतजन जे जे सत्य म्हणून सांगतात ते ते सारं मिथ्याच वाटल्यावाचून राहणार नाही! मग ‘‘जया पाहतां द्वैत कांहीं दिसेना। भय मानसीं सर्वथा ही असेना।।’’ हा समर्थ सांगतात तो अनुभव काही आपल्याला येणार नाही. कारण जिथं ‘जया पाहतां’ म्हणजेच ज्यांना पाहता, ही स्थितीच साधली नाही, तर द्वैताचा पूर्ण निरास कसा साधणार? संतांना आम्ही खरं पाहतच नाही. समर्थ कधी लंगोट घालतात, कधी भगवी कफनी घालतात.. साईबाबा पांढरी कफनी घालतात आणि डोक्याला पांढरं वस्त्र लपेटतात.. गाडगेबाबा कधी जाडंभरडं, तर कधी चिंध्या शिवलेलं कापड घालतात आणि डोक्यावर खापरेचा तुकडा ठेवतात.. असं आमचं पाहणं! जीवमात्राच्या उद्धारासाठी मनुष्यरूपात साकार प्रकटलेली कळकळ, हे त्यांचं खरं रूप आम्ही कुठं जाणतो? कुठं पाहतो? तेव्हा त्यांना पाहायचं म्हणजे समस्त अशाश्वताला पाहण्याची ओढच संपणं! हे खरं पाहणं आहे.. त्यांचा बोध आपल्या अंतरंगात प्रकाशित होणं हे त्यांचं त्यातल्या त्यात खरं आणि पूर्ण दर्शन आहे. त्या बोधानुरूप जीवन घडवणं हे त्यांचं नित्य दर्शन आहे. त्यांचं असं नित्य दर्शन जेव्हा साधेल तेव्हाच द्वैत संपेल.. द्वंद्व ओसरेल.. मनावरचा भवाचा प्रभाव संपला की ते भव भावणार नाही आणि म्हणूनच भोवणारही नाही! मग भवापाठोपाठ भयही पूर्णपणे ओसरेल. ‘भय मानसीं सर्वथा ही असेना,’ ही स्थिती साधेल. आता हे भव म्हणजे तरी काय हो? ‘भव’ म्हणजे ‘होवो’! अर्थात अमुक व्हावं, ही मनातली इच्छा म्हणजेच ‘भव’ आहे. अशा अनंत इच्छा मनात क्षणोक्षणी उत्पन्न होत असतात. मनात मळमळ, जळजळ निर्माण करीत असतात. या इच्छांचा सागर हाच भवसागर! तो ओलांडणं म्हणजे आपल्या इच्छांचंच उल्लंघन! आणि ते माणसाला अत्यंत कठीण वाटतं. म्हणूनच या भवसागरात तो भयाचा पोहरा बांधून हात-पाय मारत पोहायचा आणि तरायचा प्रयत्न करतो.. पण माणसाच्या इच्छा आणि भीतीचं वजन इतकं वाढत असतं की त्या पोहऱ्यामुळेच माणूस गटांगळ्या खात बुडू लागतो! संतसज्जन या बुडत्या जिवाला वाचविण्यासाठी त्याच भवसागरात उडी घेतात! हृदयातल्या अनंत इच्छांच्या या भवसागरात आणखी एका इच्छेच्या रूपातून ते प्रवेश करतात. ही इच्छा म्हणजे, ‘त्यांची अखंड कृपा व्हावी आणि राहावी’! का? तर हृदयातल्या सर्वच इच्छांची पूर्ती व्हावी! तशी पूर्ती होत जाणं, हेच त्या कृपेचं मोजमाप. त्यांच्या कृपेनं भौतिक जीवनात सगळं काही चांगलं म्हणजे अगदी मनासारखं होणं हेच खरं सुख, हे सुखाचं आकलन. दु:खाचा अभाव म्हणजे सुख, ही सुखाची व्याख्या! मनासारखं होणं हे नेहमीच हिताचं नसतं.. कधी कधी तर फार धोक्याचं असतं, हे केवळ सत्पुरुष जाणतात. ही जाणीव माणसाला व्हावी म्हणून.. तो भवसागरात बुडू नये म्हणून साधनेचा पोहरा ते देतात.. पण पोहताना नेमक्या त्याच पोहऱ्याची माणसाला अडचण वाटत असते!