माणसाच्या मनात अनंत इच्छा उत्पन्न होत असतात.  इच्छा कोणतीही असो, ती तात्काळ संकल्पात जमा होते आणि हा प्रत्येक संकल्प जोवर पूर्ण होत नाही तोवर जन्म-मृत्यूचं चक्र काही थांबत नाही. मग त्यात अनंत जन्म का सरेनात! त्यामुळे माणसाच्या मनात या इच्छा उत्पन्न होणं आटोक्यात यावं आणि मग हळूहळू निरिच्छता यावी, यासाठी सत्पुरुष कार्यरत असतात. या इच्छांच्या भवसागरात गटांगळ्या खात मी बुडू नये, यासाठी ते साधनेचा पोहरा देतात. मी मात्र इच्छा आणि भीतीचा जड पोहरा बांधून वाचण्याची धडपड करीत असतो. त्या मला साधनेचा पोहरा म्हणजे मुक्त, मन मानेल तसं पोहण्यातली मोठी आडकाठीच वाटतो. मग मी मध्येच तो पोहरा सोडून देतो आणि इच्छा-भय यांचा पोहरा पकडून पोहण्याच्या धडपडीत गुंततो. साधनेचा पोहरा तर तरंगतो आहे, पण हा इच्छेचा पोहरा हातातून सुटला आणि बुडाला, तर काय करू? काही झालं तरी तो बुडता कामा नये, या भावनेनं मी त्याचाही भार स्वीकारत हा भवसागर शांत करण्याचा.. अर्थात सर्व इच्छा तृप्त करण्याचा प्रयत्न करीत राहतो. ‘‘बाबारे! हा पोहरा सोडलास तरी बुडण्याची भीती उरणार नाही.. मग साधनेच्या पोहऱ्यानं सहज हात-पाय झाडून पोहायला सुरुवात करता येईल.. तुझ्या मूळ आत्मतृप्त आणि स्वयेच परमानंदमय असलेल्या स्थानी तुला पोहोचता येईल,’’ असं हे सत्पुरुष या जिवाला समजावत आहेत.. कधीपासून? तर, अनंत जन्मापासून! तरी जीव काही सुधारत नाही! हेच सत्य ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १३७व्या श्लोकात समर्थ रामदास सांगत आहेत. प्रथम हा मूळ श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे :

जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले।

परी जीव अज्ञान तैसेचि ठेले।

देहेबुद्धिचें कर्म खोटें टळेना।

जुनें ठेवणें मीपणें आकळेना।।१३७।।

प्रचलित अर्थ : अनंत काळापासून सारे थोर महात्मे जीवांना यथार्थ ज्ञानाचा मार्ग दाखवून गेले आहेत, पण जीव मात्र अज्ञानीच राहिले आहेत. म्हणून त्यांच्या देहबुद्धीमुळे उत्पन्न होणारे खोटे कर्म हटत नाही म्हणजेच शोकमोहमय विकारांपासून हे दूर होत नाहीत. यांच्यातील ‘मी’पणामुळे यांना त्यांचंच निजरूप म्हणजे जुनी ठेव जी आहे ती आकळत नाही.

आता मननार्थाकडे वळू. काय खऱ्या हिताचं आहे, मनुष्य जन्माला येऊन खरं काय साधावं, याबाबत सत्पुरुषांनी सर्वोच्च मार्गदर्शन माणसाला केलं आहे. तरी तो सारा बोध माणसाला मानवत नाही! मनुष्याला आनंदाची स्वाभाविक ओढ आहे. त्याची प्रत्येक हालचाल ही आनंद मिळावा आणि कायमचा टिकावा, यासाठीच आहे. तेव्हा परमानंद हीच माणसाची मूळ स्थिती आहे, असं सत्पुरुष सांगतात. मासोळी जशी पाण्याबाहेर काढताच तडफडते त्याप्रमाणे माणूसही आनंदापासून दुरावल्यानं तळमळत आहे, तडफडत आहे. कारण पाण्यात अखंड राहण्याची मासोळीला जशी सवय आहे तसंच अखंड आनंदात राहण्याची सवय असलीच पाहिजे. त्या आनंदाचा शोध माणूस अव्याहत घेत आहे. पण हा आनंद देहबुद्धीच्या जोरावर मिळणारा नाही की टिकणारा नाही, असं सत्पुरुष सांगतात. या देहालाच जखडलेली, देहालाच मुख्य आधार आणि माध्यम मानणारी जी बुद्धी आहे ती जे जे देहसुखाचं आहे तेच आनंदाचं मानणार. थोडक्यात आनंदाच्या प्राप्तीसाठी ती कारण शोधणार. मग जोवर ते कारण आहे तोवरच तो ‘आनंद’ टिकणार! त्यामुळे या देहबुद्धीपलीकडे माणसाच्या जाणिवेची कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न सत्पुरुष करतात. देहबुद्धीची भ्रामकता परोपरीनं मांडतात, तरी माणसाची धारणा काही बदलत नाही.. जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले। परी जीव अज्ञान तैसेचि ठेले!!