एक कथा तर अनेकांनी वाचलीच असेल. एक म्हातारी होती. घराबाहेर अंधारात ती काहीतरी शोधत होती. संध्याकाळची वेळ झालेली. त्यात रस्त्यावरच्या दिव्यांच्या झगमगाटात ती जमेल तितकं रस्त्यावर वाकून वाकून बघत होती. एका वाटसरूनं तिची ती धडपड पाहिली. त्याला तिची कीव आली आणि तो तिच्या जवळ जात म्हणाला, ‘‘आजीबाई, काय शोधताय? मी मदत करू का काही?’’ म्हातारीनं त्याच्याकडे थोडी कौतुकभरली नजर टाकली आणि थकलेल्या स्वरात म्हणाली, ‘‘बाबा रे, माझी सुई शोधत्ये केव्हापासून!’’ तो वाटसरूही मग रस्त्यात बारकाईनं पाहू लागला. थोडा वेळ गेला तसं त्यानं विचारलं, ‘‘आजी, नेमकी कुठं पडली होती सुई?’’  म्हातारी म्हणाली, ‘‘बाबा, ती पडली होती आतल्या खोलीत.’’ वाटसरूनं आश्चर्यानं विचारलं, ‘‘मग तुम्ही रस्त्यात का शोधता आहात ती?’’ आजी त्याची कीव आल्यागतचे भाव चेहऱ्यावर आणून म्हणाली, ‘‘बाबा, आत आहे अंधार. इथं बघ कसा उजेड पडला आहे. म्हणून इथं शोधत्ये!’’  तशी गत आहे आपली. जिथं खरं आत्मसुख आहे तिथं अज्ञानाचा अंधार आहे. सारी धाव बाह्य़ाकडे आहे. तिथं जो फसवा झगमगाट आहे त्यालाच सुख मानून धावणं सुरू आहे. जिथं खरं सुख नाहीच, तिथं त्याचा शोध सुरू आहे. त्या शोधानंच नुसता थकवा आलाय, उमेद ओसरत आहे, काळ निसटून चालला आहे. अशा जिवाला सत्पुरुष स्पष्ट सांगतात की, ‘‘बाबा रे, जिथं तू सुख शोधत आहेस तिथं खरं सुख नाही. तो सुखाचा आभास मात्र आहे. कारण ज्या जगाला सुखाचा आधार मानत आहेस त्या जगाचा स्वभाव नीट लक्षात घे. जग म्हणजे तरी काय? जगातली माणसं.. आणि ती माणसं कशी आहेत, हे स्वत:वरूनच लक्षात घे! तर माणूस खऱ्या अर्थानं कुणाचाही नाही. तो फक्त स्वत:चा आहे. स्वत:पुरता विचार करणारा आणि येनकेणप्रकारेण स्वार्थ कसा साधला जाईल, हेच पाहून वागणारा आहे. त्यामुळे जर सुख हवं असेल तर या जगावरचं अवलंबणं सुटलं पाहिजे. आधार आपल्या आतच आहे. आपल्या मनानंच खंबीर होऊन येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनुकूलता आली तरी बेसावध राहून रममाण होता कामा नये आणि प्रतिकूलता आली तरी बेसावध होऊन खचून जाऊन नकारात्मकतेत बुडून जाता कामा नये. तर ज्या क्षमता मिळाल्या आहेत, जे अनमोल आयुष्य मिळालं आहे, जो अनमोल काळ लाभला आहे त्याचा यथायोग्य वापर करून मनानं व्यापक व्हायचा अभ्यास केला पाहिजे. जे सुख कारणावर अवलंबून असतं ते सुख कारण संपताच ओसरूही शकतं. त्यामुळे असा अशाश्वत कारणावर अवलंबून असलेला आनंद मिळवण्यापेक्षा शाश्वत अशा भगवंताचा आधार घेतला पाहिजे. जे सुख त्याच्यापाशी आहे ते कुणापाशीच नाही. कारण भगवंताला स्वार्थ नाही. त्याच्याकडे सौदेबाजी नाही, पण हा भगवंत खरा वाटत नाही, ही मोठी अडचण आहे! कारण जग खरं वाटतं. जे सतत बदलतं आहे, स्वार्थप्रेरित आहे, संकुचित हेतूंशी जखडलेलं आहे ते जग खरं वाटतं, पण भगवंत खरा वाटत नाही. मग तो खरा कसा वाटावा? त्याचं अस्तित्व कसं जाणवावं? तर जगाची आसक्ती जसजशी कमी होईल, तसतसं भगवंताचं अस्तित्व खऱ्या अर्थानं जाणवू लागेल. त्यासाठी संतसत्पुरुषांच्या विचारांचा संग आवश्यक आहे. व्यायामाचं वेड असलेल्या माणसाच्या संगतीत जसं आपल्यालाही व्यायामाची गोडी निर्माण होऊ शकते, त्याप्रमाणे भगवंताच्या प्रेमानं भरून गेलेल्या भक्ताच्या संगतीत भगवंताविषयीचा विश्वास निर्माण होऊ शकतो. तसं होऊ लागलं की खरा आनंद कोणता आणि तो आपल्यातच कसा भरून आहे, तो आपलंच खरं स्वरूप कसा आहे, हे आकळू लागतं!’’