समर्थ रामदास ‘मनोबोधा’चा मागोवा आपण गेले २२ महिने घेत आहोत आणि आपल्याला जाणवलंच असेल की गेले काही दिवस अतिशय वेगानं आपण हा मागोवा घेत आहोत. याचं कारण असं की आता या सदराचा समारोप व्हायला केवळ ३० दिवस उरले आहेत आणि त्या मुदतीत उरलेल्या ६० श्लोकांचा विचार करायचा आहे. तेव्हा दोन पर्याय असे आहेत की एकतर जेवढय़ा श्लोकांचा मागोवा होईल तेवढय़ांचाच करावा किंवा दुसरा पर्याय असा की अत्यंत महत्त्वाच्या अशा श्लोकांचा मागोवा घ्यावा. जसं होईल ती समर्थाची इच्छा मानून ज्या १४५व्या श्लोकाच्या अनुषंगानं आपण विश्लेषण सुरू केलं होतं ते पुढे सुरू करू. तर इंद्रियांच्या योगानं विषयप्रभावात जीवनातला प्रत्येक क्षण सरत असताना ‘विवेके सदा स्वस्वरूपी भरावे,’ हे साधणं शक्य तरी आहे का? विवेक असता तर अज्ञानपाशात आपण बद्ध तरी झालो असतो का? पण या मार्गावर आल्यापासून हा विवेक निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे ती खरंतर सुरू झाली आहे.  जसं रुग्णालयात गेलो की आजारी माणसं आणि त्यांचे नातेवाईकच भेटणार, पर्यटनस्थळी गेलो की पर्यटकच भेटणार, गिर्यारोहणाला गेलो तर गिर्यारोहकच भेटणार.. त्याचप्रमाणे परमार्थाच्या मार्गावर आलो की साधक आणि संतजनच भेटणार! या संतजनांच्या सहवासातूनच अंत:करणात विवेकाचे सूक्ष्म संस्कार होऊ लागतात. सहवासाचे हे जे संस्कार आहेत, त्यांच्याकडून ऐकण्यात येणारा जो बोध आहे आणि त्यांच्या स्वत:च्या जगण्यातून त्या ज्ञानाचा जो प्रत्यय लाभत आहे; त्यानुसार स्वत:चं जीवन जेव्हा आपण प्रामाणिकपणे घडवू लागतो तेव्हाच खरा विवेक जागा होऊ लागतो. आधी विषयाची ओढ जागी होऊ लागली आणि त्यामुळे अहंभाव पक्का होत गेला, आता विवेकपूर्ण जगण्याची ओढ निर्माण झाली तर सोऽहंभाव जागा होईल, असं संत सांगतात. आता विषयओढीतला धोका मनाला कळू लागला असला तरी विषयाचा प्रभाव आणि विषयातली गोडी काही संपलेली नसते. मग अशावेळी ‘‘ विवेकें सदा स्वस्वरूपीं भरावें।’’  हे जे समर्थ सांगतात त्याचा अर्थ काय घ्यावा? तर एक गोष्ट लक्षात घ्यावी. विषय हे स्वाभाविक आहेत, पण त्यातलं आपलं गुंतणं आणि त्यापायी मनाची फरपट होणं, हे अस्वाभाविक आहे. पण विषयांचा प्रभावच असा असतो की, त्याच्या गोडीपासून मनाला सहजी विरक्त होता येत नाही. उलट त्यासाठी जितका प्रयत्न करावा तितका माणूस त्यातच अडकत जातो. जसं एखादा चिखलात रूतलेला माणूस त्यातून बाहेर पडण्यासाठी जितका जोर लावतो तितका तो त्या चिखलात अधिकच रूतत जातो. मग काय करावं? तर विषय सोडण्यापेक्षा सत्संग जोडण्याचा प्रयत्न करावा.. आणि मागेच सांगितल्याप्रमाणे हा सत्संग आंतरिकच असला पाहिजे. एखाद्या साधकाच्या सहवासाला आपण सत्संग मानू लागलो, तर त्यात धोका असतो. तो साधक आपल्यापेक्षा साधनपथावर पुढे गेलेला भासत असेलही, पण तरीही शेवटी तो साधकच असतो. त्याचाही साधनाभ्यास सुरू असतो आणि त्यामुळे आपल्याप्रमाणेच तोही स्वभावप्रभावात अडकलेला असू शकतो. तेव्हा अशा सत्संगानं पुन्हा मनाचं अवलंबणं वाढू शकतं. तर सत्संग हा आंतरिक हवा.. म्हणजे आत्मजागृती करणाऱ्या बोधाचं चिंतन, मनन आणि तो आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि त्यात अपयश आलं तर पुन्हा पुन्हा त्या आचरणाचा अभ्यास करीत राहणं, हा खरा आंतरिक सत्संग आहे. कारण उच्च तत्त्वानुसार जगणारा माणूस घसरू शकतो, पण तो विचार किंवा ते तत्त्व त्याच उच्च स्थानी राहतं! त्यामुळे एका खऱ्या सद्गुरूला सोडून अध्यात्मातील अन्य कुणाच्याही सहवासाची ओढ न ठेवता तत्त्वाचाच संग करावा.