विवेक जागृत झाला, तरी त्या विवेकानुसार प्रत्येक पाऊल पडेलच, याची शाश्वती मनाला वाटत नाही. याचं कारण आंतरिक आणि बाह्य़ अशा दोन्हीमध्ये असतं. आंतरिक म्हणजे मनाच्या ओढीविरुद्ध जाऊन जे योग्य आहे, श्रेयस आहे त्यावरच ठाम राहाणं यासाठी प्रारंभिक धैर्य, चिकाटी आणि ध्येयावर निष्ठा असावी लागते. बाह्य़ कारण म्हणजे दुसऱ्याच्या मनाच्या ओढीला न दुखावण्याच्या इच्छेनं, दडपणानंही अनेकदा जे योग्य आहे त्याच्याशी ठाम राहणं कठीण वाटतं. तर निदान योग्य काय याबाबत मनाची गफलत तरी होऊ नये. ते आचरणात कधी आणि कसं येईल, हे नंतर दिसत जाईल, पण कधीकधी असं होतं की जे तत्त्व ऐकायला, वाचायला, बोलायला योग्य वाटतं ते जगताना साधलं नाही तर मग ते तत्त्वच हळूहळू अव्यवहार्य आणि म्हणूनच खोटं वाटण्याचा मोठा धोका असतो. तेव्हा मनाच्या या खेळाबाबत साधकानं सावध राहावं आणि जोवर खऱ्या सदगुरूपर्यंत पोहोचत नाही तोवर तत्त्वविचारानुसार आपलं जीवन घडवण्याचा अभ्यास करावा. तर विवेक विचारानं स्वरूपाची उकल एवढय़ात होणार नाही. पण निदान आपण आपली जी ओळख मानत आहोत, ‘मी’ म्हणून आपली आपल्या मनात जी प्रतिमा आहे तिचा ठिसूळपणा तरी तपासत जायला हवं. जन्मापासून मृत्यूपर्यंत माझ्या ओळखीत भर पडत जाते आणि बदलही होत जातात. जन्मत:च मी मूल होतो, त्यानंतर हट्टी किंवा गुणी, शांत किंवा दांडगाई करणारा अशी ओळख चिकटली. नंतर हुशार किंवा मध्यम बुद्धीचा अशी ओळख चिकटली.. तर मूल, मुलगा, तरुण, प्रौढ, वृद्ध या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यानुसार माझी माझ्या मनातली आणि जगाच्या मनातली प्रतिमा वेगवेगळी होती आणि कल्पना, आकलन, विचार अशा अनेक अंगांनी मी आणि जग त्या ओळखीच्या साच्याला धरून जगत होतो. तेव्हा या ओळखीपलीकडेही मी काहीतरी आहे.. माझी जी प्रतिमा जगानं आणि मी निश्चित केली आहे ते लेप खरवडून मी खरा कोण आहे, याचा शोध संथपणे का होईना, पण सुरू झाला पाहिजे. जे असमाधान, जी अशांती, अस्थिरता, तगमग माझ्यात आहे तिचं मूळ कशात आहे, याचा शोध त्यायोगे लागत जाईल. समर्थ म्हणतात, विवेकानं जर सदैव स्वस्वरूपाचं भान जागृत राहिलं तर मग जीव त्याच्या मूळस्थितीपर्यंत पोहोचेल आणि त्या उगमाशी दु:खाचं बीज नाही, दु:खाचा जन्म नाही, हे लक्षात येईल.  (विवेकें सदा स्वस्वरूपीं भरावें। जिवा ऊगमीं जन्म नाहीं स्वभावे।। ) माणसाचा जो खरा स्व-भाव आहे तो परमानंदमय आहे. जेव्हापासून त्याच्या मनात अहंभाव आला तेव्हापासून त्याचा स्व-भावही अहंयुक्त झाला. मग तो खरा मूळ  शुद्ध स्व-भाव न उरता अशुद्ध स्वार्थभावच झाला. या उगमापर्यंत पोहोचणं माणसाला कठीण वाटतं, अशक्य वाटतं एवढंच नाही तर हे काल्पनिकसुद्धा वाटतं! मग निदान आताचं आपलं जगणं, त्या जगण्यातली अशाश्वती, जगाची अशाश्वती इकडे तरी माणसानं लक्ष द्यावं, असं समर्थ सुचवतात. ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १४६व्या श्लोकात हेच विवरण आहे. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. हा श्लोक असा आहे:

दिसे लोचनीं तें नसे कल्पकोडी।

अकस्मात आकारलें काळ मोडी।

पुढें सर्व जाईल कांहीं न राहे।

मना संत आनंत शोधूनि पाहें।। १४६।।

प्रचलित अर्थ : जे डोळ्यांना दिसते ते कायम टिकणारे नसते. जेवढे म्हणून आकाराला येते तेवढे काळ मोडून टाकतो. प्रलयकाळी तर सर्वच नामरूप ओसरणार आहे. म्हणून हे मना तू यापलीकडे जे शाश्वत आणि अनंत आहे त्याचा शोध घे.