समर्थ रामदास ‘मनोबोधा’च्या १४७व्या श्लोकात सांगतात की, ‘तया येकरूपासि दुजें न साहे।’ परमात्म तत्त्वाशी एकरूप झालेलं जे तत्त्व आहे त्याला कोणत्याही प्रकारचा दुजेपणा सहन होत नाही. कोणत्याही प्रकारचा दुजेपणा तिथे टिकत नाही. तशा एकरूपतेची आपल्याला कल्पना नाही. पण एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपण काय करतो? आपण आपलं मन एकाग्र करायचा प्रयत्न करतो. म्हणजेच मनातून दुसरे विचार त्या क्षणापुरते दूर सारतो. तर एखाद्या विचाराला जेव्हा आत्मसात करायचं असतं तेव्हा त्या विचाराशी आपण जेवढं समरस, एकरूप होऊ शकतो तेवढं त्याचं आकलन होऊ शकतं. हे समरस होणं म्हणजे स्वत:ला तात्पुरतं विसरणं! जोवर ‘मी’चं भान आहे तोवर समरसता ‘मी’पाशीच असणार. तेव्हा आपण स्वत:ला विसरतो तेव्हाच एखाद्या गाण्यात, एखाद्या चित्रपटात, एखाद्या कथेत हरवून जातो. देहभान हरपून जातं म्हणतात ना? तर हे जे परमतत्त्व आहे ते परमानंदात इतकं एकरूप असतं की त्याला स्वतंत्र भान उरतच नाही. या तत्त्वाचं जितंजागतं परिपूर्ण साकार रूप म्हणजे सद्गुरू! या सद्गुरूंचं सूचक वर्णन ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १४८व्या श्लोकात समर्थानी केलं आहे. हा श्लोक असा आहे:

निराकार आधार ब्रह्मादिकांचा।

जया सांगतां सीणली वेदवाचा।

विवेकें तदाकार होऊनि राहें।

मना संत आनंत शोधूनि पाहें।। १४८।।

प्रचलित अर्थ : परब्रह्म स्वत: निराकार असून ब्रह्मादिदेवांना व अनंत ब्रह्मांडांना आधारभूत आहे. निर्गुण निराकाराच्या अधिष्ठानावर सर्व सृष्टी उभारली आहे. त्याचे वर्णन करता करता मति कुंठीत होऊन वेद मौनावले. ‘नेति नेति’ म्हणजे हे ते नव्हे, हे ते नव्हे, असे वर्णन करत ते थबकले. स्वरूपवर्णन काही वेदांना करवले नाही. तेव्हा हे मना अशा तत्त्वाशी सारासारविवेक करून तद्रूप होऊन रहा आणि शाश्वत ब्रह्म शोधून पहा.

आता मननार्थाकडे वळू. हे संपूर्ण सद्गुरूमहतीचं वर्णन आहे. काहीजणांना वाटतं की समर्थानी सगुण रूपातले गुरू केले नव्हते. प्रभु रामचंद्र हेच त्यांचे गुरू होते. त्यामुळे या श्लोकांमध्ये सद्गुरूच अभिप्रेत आहेत, असा अर्थ ओढूनताणून केला जातो का? तर या सदराच्या अगदी प्रारंभिक भागांतच स्पष्ट केलं होतं की या श्लोकांचा जो प्रचलित अर्थ आहे तो सर्वसामान्यांसाठी तितकाच प्रेरक आणि उपयुक्त आहेच. पण साधकांसाठी म्हणून निश्चितच काही अर्थ गूढार्थ आहे. हे श्लोक लिहिले जाण्याचं कारणच सद्गुरूंचं महत्त्व शिष्यांच्या मनावर बिंबावं, हे आहे. हा श्लोक वाचताना तर ‘दासबोधा’त समर्थानी जे सद्गुरूस्तवन केलं आहे त्याची पदोपदी आठवण येते. त्याकडे वळण्याआधी या श्लोकात सद्गुरू वर्णन कसं आहे, ते पाहू. हा सद्गुरू निराकार अशा परमतत्त्वातून साकार रूपात आला आहे आणि तो ब्रह्मादि देवांचा आधार आहे, असं पहिला चरण सांगतो. आणि त्याची उकल व्हावी यासाठी परत एकदा ‘गुरूगीते’चा आधार घ्यायला हवा. काहींना ही पुनरूक्ती वाटेल, पण ती आवश्यक आहे. पार्वती मातेनं भगवान शिवजींना एकदा विचारलं की, ‘‘हे स्वामी हा देहधारी जो जीव आहे त्याला ब्रह्ममय होण्याचा काही उपाय आहे का? काही मार्ग आहे का?’’ त्यावर शिवजी म्हणतात की, ‘‘हा प्रश्न मोठा लोकोपकारी आहे.. आजवर कुणीच विचारलेला नाही.. पण जीव ब्रह्ममय कसा होईल, हे विचारताना हे ब्रह्म म्हणजे परब्रह्म म्हणजे नेमकं आहे काय, ते तर जाणलं पाहिजे?’’ मग म्हणतात, ‘‘सद्गुरूशिवाय ब्रह्म अन्य कुणी नाहीच.. हे वरानने हे त्रिवार सत्य मी सांगतो!’’