सद्गुरू हाच परब्रह्मस्वरूप कसा आहे, याची  चर्चा याआधीही गुरूगीतेच्या अनुषंगानं आपण केली आहे. ‘गुरूविना न ब्रह्म अन्यत् सत्यं सत्यं वरानने,’ असं शिवजी स्पष्टच सांगतात. आता हे परब्रह्म म्हणजे नेमकं काय, याचं वर्णन करता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे जो खरा सद्गुरू आहे त्याचं खरं स्वरूप कसं आहे, हे शब्दांत वर्णन करता येत नाही. तो अमुक नाही, तमुक नाही, एवढंच सांगता येतं. ‘दासबोधा’च्या  पहिल्या दशकाचा चौथा समास हा सद्गुरू स्तवनाचा आहे. त्यात समर्थ रामदास हेच स्पष्ट करताना सांगतात की, ‘‘आतां सद्गुरू वर्णवेना। जेथें माया स्पर्शो शकेना। ते स्वरूप मज अज्ञाना। काय कळें।।’’ आपण जे काही वर्णन करतो ते खरंतर मायेतलंच असतं. आपल्या आकलनानुसार आपण एखाद्याची स्तुती करतो किंवा निंदा करतो. त्या आकलनावर मायेचाच तर प्रभाव असतो. पण सद्गुरूला माया स्पर्शूच शकत नाही. त्यामुळे त्याचं वर्णन शब्दांनी करता येत नाही. त्या सद्गुरूचं वर्णन करताना वेददेखील मौनावले. त्यांनाही सद्गुरूचं अचूक आणि पूर्ण वर्णन साधलंच नाही. मनोबोधाचा जो १४८वा श्लोक आपण पाहात आहोत त्याचा दुसरा चरणही सांगतो की, ‘‘जया सांगतां सीणली वेदवाचा।” आणि दासबोधाच्या या सद्गुरू स्तवनाच्या दशकातही समर्थ म्हणतात की, ‘‘नकळे नकळे नेति नेति। ऐसें बोलतसे श्रुती। तेथें मज मूर्खाची मती। पवाडेल कोठें।।’’ वेद जेव्हा ऐकले गेले तेव्हा त्यांच्या त्या श्राव्य रूपातून श्रुती प्रकटल्या. तर श्रुतींनाही म्हणजेच वेदांनाही त्याचं वर्णन करता आलं नाही किंवा ‘तो अमुक नाही, तमुक नाही,’ असंच करता आलं, असं समर्थ म्हणतात. या स्तवनात सद्गुरूंची महती गाताना समर्थ सांगतात की, ‘‘हरीहर ब्रह्मादिक। नाश पावती सकळिक। सर्वदा अविनाश येक। सद्गुरूपद।। तयासी उपमा काय द्यावी। नाशिवंत सृष्टी आघवी। पंचभूतिक उठाठेवी। न चलें तेथें।। म्हणौनि सद्गुरू वर्णवेना। हे गे हेचि माझी वर्णना। अंतरस्थितीचिया खुणा। अंतर्निष्ठ जाणती।।’’ ब्रह्मा, विष्णु आणि महादेव यांना आपण सृष्टीचे प्रमुख देव मानतो. निर्मिती (ब्रह्मा), पालन (विष्णु) आणि नाश (शिव) या तीन प्रमुख तत्त्वांवर ही सृष्टी कार्यान्वित राहाते आहे. निर्मिती जितकी महत्त्वाची तितकंच पालन आणि तितकाच त्या निर्मितीचा नाशही आवश्यक आहे. त्या नाशामुळेच नव्याने निर्मितीला चालना मिळते. तर या तीन तत्त्वांचे जे अधिपती आहेत ते ब्रह्मा, विष्णु आणि महेश एवढंच नाही तर ‘हरीहर ब्रह्मादिक’ म्हणजे ब्रह्मा, विष्णु, महेश आणि इतरही सर्व देव हे समर्थ स्पष्टच सांगतात की, ‘नाश पावती सकळिक’! या सर्वानाही अंत आहेच.. मग भले तो कित्येक युगांचा किंवा कल्पाचा का असेना.. पण जे नष्ट होत नाही, ज्याचा नाश होत नाही, असं एकच तत्त्व आहे ते आहे सद्गुरूपद! ही संपूर्ण सृष्टी नाशवंत आहे, पण ज्या पंचमहाभूतांच्या जोरावर या सृष्टीची उत्त्पत्ति, स्थिती आणि लय होतो त्या पंचमहाभूतांना त्या सद्गुरूतत्त्वात कोणतीही उठाठेव करता येत नाही. समर्थ म्हणतात, ज्यांच्या अंतरंगात सद्गुरूप्रेमाचा अंकुर उत्पन्न झाला आहे, त्यांनाच माझ्या म्हणण्यातलं तथ्य कळेल!  खऱ्या सद्गुरूचं वर्णन कसं करता येत नाही, याची खूण पटेल! (अंतरस्थितीचिया खुणा। अंतर्निष्ठ जाणती।।) मग असा सद्गुरू कसा आहे, हे शोधण्यापेक्षा विवेकपूर्वक ‘तदाकार’ व्हायला समर्थ सांगत आहेत. म्हणजेच त्यानं सांगितलेला जो बोध आहे त्या बोधाच्या साच्यात स्वत:ला मन:पूर्वक ओतून घेतलं पाहिजे! तदाकार होणं म्हणजे त्यांच्यासारखं बाह्य़रूपानं होण्याची धडपड करणं नव्हे, तर त्यांच्या विचारांसारखं वागू लागणं आहे. त्यांच्या विचारांप्रमाणे जीवन घडवायचं तर विवेकानं जगण्याचा अभ्यास अनिवार्यच आहे. हा विवेक शिकायचा, त्यानुसार जगण्याचा अभ्यास करायचा तर समर्थ सांगतात त्याप्रमाणे अनंताशी एकरूप अशा संताचाच शोध घ्यायला हवा.