ब्रह्मा-विष्णु आणि महेश हे या सृष्टीचे तीन प्रमुख घटक आहेत. उत्त्पत्ति, स्थिती आणि लय या तीन गोष्टींचे ते अधिपती आहेत. या तीन गोष्टींमुळेच सृष्टी निर्माण होते, तिचं पालनपोषण होतं आणि ती नष्ट होते. उत्पन्न होणं जितकं महत्त्वाचं असतं तितकाच नाशही महत्त्वाचा असतो. तर या तीन प्रमुख घटकांपलीकडेही परमतत्त्व आहे, सद्गुरू तत्त्व आहे. या चराचरात जे व्यक्त आहे, जे अव्यक्त आहे आणि या व्यक्त-अव्यक्तापलीकडे जे काही आहे त्याहीपलीकडे ते परम सद्गुरूतत्त्व आहे. आता हे सारं शब्दांनी सांगितलं आणि आपणही शब्दांनीच ग्रहण केलंत. जिथं नुसते शब्द आहेत तिथं विश्वास कसा बसावा? विश्वासासाठी अनुभव हवा ना? तो अनुभव नाही म्हणून हे सारं शाब्दिक वाटणं साहजिक आहे, पण यावरही थोडा विचार करू. ब्रह्मा-विष्णु-महेश यापलीकडे काही असू शकतं का? ज्यानं सृष्टीची उत्त्पत्ति केली त्याच्यापलीकडे काही असेल, तर ते आधीपासूनच विद्यमान हवं ना? मग असं काही तत्त्व खरंच असेल? तर याला संतांच्याच एका प्रश्नाचा पुन्हा आधार आहे. संत विचारतात, ब्रह्मानं सृष्टी निर्माण केली खरी, पण ब्रह्माची निर्मिती कोणी केली? विष्णु जगताचं पालन करतो खरं, पण विष्णुचं पालन कोण करतो? रूद्र या सृष्टीचा लय साधतो, पण त्या शिवाचा लय कोण साधतो? तेव्हा ज्यांना आपण मूलभूत घटक म्हणतो त्याआधीही, ते मूलभूत घटक ज्यातून उत्पन्न झाले किंवा जिथून आले असं तत्त्व असलंच पाहिजे. आता तेच तत्त्व खऱ्या सद्गुरूत व्याप्त आहे, असंही संत सांगतात. अशा सद्गुरूवर विश्वास ठेवला, तर मुक्ती लाभते, असं समर्थ सांगतात. ते म्हणतात, ‘‘म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे।  मना संत आनंत शोधूनि पाहें।।’’  हे मना, सद्गुरूवर विश्वास ठेवलास तरच मुक्ती लाभेल. संतांमध्येही जो अनंत आहे, साक्षात परमतत्त्वाचं साकार रूप आहे त्याचा शोध घे! आता या चरणात काही शब्द आणि एक मुद्दा आला आहे ज्यावरून मनात अनेक शंका आणि तर्क निर्माण होतील. हा मुद्दा म्हणजे, ‘खऱ्या सद्गुरूवर विश्वास ठेवला की मुक्ती मिळेल.’ तर विश्वास आणि मुक्ती  हे ते दोन शब्द आहेत. आजच्या आध्यात्मिक विश्वात पाहिलं तर काय दिसतं? सद्गुरू म्हणून बिनदिक्कत वावरणारे काहीजण असे आहेत की, त्यांच्यावर विश्वास ठेवला तर मुक्ती सोडाच माणूस अधिकच बांधला जाईल. त्यामुळे हा सद्गुरू खरा पाहिजे, हे इथं अध्याहृत आहे. आता मुक्ती म्हणजे काय? मृत्यूनंतर मिळणाऱ्या मोक्षाला किंवा मुक्तीला काही अर्थ नाही. मुक्ती ही जगत असतानाच प्राप्त होऊ शकणारी स्थिती आहे. जगण्यातील मुक्तीची प्रमुख खूण म्हणजे जगात वावरत असतानाही, जगातली आपल्या वाटय़ाची कर्तव्यं करीत असतानाही त्या जगाचा प्रभाव मनावर न पडणं आणि स्वतंत्र मनानं निर्भयपणे, नि:शंकपणे आणि सहजतेनं जीवन व्यतीत करणं. हे स्वबळावर शक्य नाही. कारण माणसाचं मन जन्मापासून देहभावालाच चिकटलेलं आहे. देहभाव हा सदोदित देहसुखाच्याच चिंतेनं व्यापला असतो. त्यामुळे आपलं मन कधीच निश्चिंत, नि:शंक आणि निर्भय राहात नाही. ते या घडीला निर्भय भासेल, पण परिस्थिती पालटण्याची किंचितही चिन्हं दिसू देत, ते लगेच भयानं ग्रासेल. तेव्हा जो खरा निर्भय, नि:शंक, निश्चिंत आहे त्याच्याच आधारावर जगताना स्वतंत्र होणं माणसाला साधू शकेल. त्यासाठी संतांच्या संगतीत असतानाच त्या संतांमध्येही जो अनंत आहे, जो परमतत्त्वाशी मूलत:च अभिन्न आहे, त्याचा शोध घ्यायला समर्थ सांगत आहेत. संत आणि सद्गुरू यांच्यात एक अत्यंत सूक्ष्म भेद आहे. तो इतकाच की संत हे भक्तीयोगानं त्या परमतत्त्वाशी योग पावत असतात, तर ते परमतत्त्व आणि सद्गुरू मूलत:च अभिन्न असतात.

 

narayan rane marathi news, deepak kesarkar marathi news
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला
balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत