13 December 2018

News Flash

४८९. सज्जनयोग

आपलं परमात्म्यावर, अध्यात्मावर किंवा त्या सत्यावरही खरं प्रेम नसतं.

जीवनातील सत्याचा, शाश्वताचा जो शोध घेत असतो त्याचा शोध ते शाश्वत सत्यच पूर्ण करतं! जो खरा बोध आत्मसात करू पाहात असतो त्याला आतूनच तो बोध आपसूक सुरू होतो! पण हे सारं घडायचं असेल तर सज्जनांचा योग घडला पाहिजे. समर्थ  म्हणतात, ‘‘परी सर्व ही सज्जनाचेनि योगे!’’ म्हणजे ही सर्व प्रक्रिया सज्जनाचा योग घडला तरच साधते. आता हा सज्जनाचा योग म्हणजे काय? तर सज्जनाच्या सहवासात नुसतं राहणं म्हणजे त्याचा योग होणं नव्हे. तर तो ज्या भावनिक, वैचारिक, आध्यात्मिक पातळीवर वावरत असतो त्या पातळीवर जाण्याची इच्छा होणं आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची तयारी असणं, म्हणजे त्याचा योग साधू लागणं आहे. पुढे समर्थ म्हणतात, ‘‘बरा निश्चयो पाविजे सानुरागे।।’’ म्हणजे असा योग जोवर घडत नाही, असा सहवास जोवर घडत नाही, तोवर शाश्वत सत्य प्राप्त करून घेण्याचा जो निश्चय आहे तो टिकत नाही. तो ‘सानुरागे’ टिकतो! म्हणजे काय? अनुराग म्हणजे प्रेम. सानुराग म्हणजे प्रेमपूर्वक. म्हणजे तो निश्चय नुसता कोरडा नसतो. त्यात जे प्राप्त करून घ्यायचं आहे त्याचं कमालीचं प्रेमही असतं. इतकंच नाही, तर हे प्रेमसुद्धा त्या सज्जनाच्याच सहवासातून लागतं. आपलं परमात्म्यावर, अध्यात्मावर किंवा त्या सत्यावरही खरं प्रेम नसतं. मात्र त्या परमतत्त्वाशी एकरूप झालेल्या सज्जनाच्या सहवासात त्या प्रेमाचे संस्कार सूक्ष्मपणे होऊ लागतात. परमात्म्याच्या भक्तीप्रेमानं सज्जनांचे अष्टसात्त्विक भाव ज्या सहजतेनं जागे होत असतात ते पाहून आपल्यालाही वाटतं की आपल्या मनाला त्या प्रेमाचा स्पर्श का होत नाही? भौतिक जगातल्या मानापमानानं, लाभहानीनं आपलं काळीज पिळवटतं, पण परमात्म्यासाठी डोळ्यांत थेंबभरही पाणी का येत नाही? असं वाटू लागणं, हेच ते प्रेमसंस्कार सुरू झाल्याचं लक्षण असतं.  याच प्रक्रियेतून साधक खऱ्या सद्गुरूपर्यंतही अवचित पोहोचतो. पण गंमत अशी की त्या सद्गुरूचं वेगळेपण त्याला पटकन समजत नाही. पुन्हा पुन्हा सांगतो आणि हे सांगावं लागणं ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की, माझ्याकडून होणाऱ्या सर्व विवरणात जिथं जिथं सद्गुरू असा उल्लेख येतो तिथं तिथं खरा सद्गुरूच अभिप्रेत असतो. त्या खऱ्या सद्गुरूचं वर्णन, त्या सद्गुरूशी एकरूप येण्याच्या आड येत असलेली आपली देहबुद्धी, त्यानं होणारी आपली परमहानी आणि अखेर त्या सद्गुरूशी एकरूप होण्याचं महत्त्व; समर्थ आता मांडणार आहेत. त्यामुळे इथून पुढे प्रचलित अर्थाचं बोट सोडून आपण थेट मननार्थाशीच लय साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मनोबोधाच्या विवरणाचा हा अखेरचा वेगवान प्रवाह आहे.. अगदी चित्त एकाग्र करून त्या प्रवाहाबरोबर आपण वाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.. तर गंमत अशी की खऱ्या सद्गुरूपर्यंत पोहोचूनही प्रथम तो इतरांसारखाच भासतो. कारण तो अगदी साधेपणानं राहात असतो. साधेपणानं वावरत असतो. स्वत:चा कोणताही बडेजाव करत नसतो. त्यामुळे त्याच्यापाशी पोहोचूनही आपण त्याच्याशी इतरांशी करतो तसाच तत्त्वझाडा करू लागतो! ज्या समाधानाच्या शोधात आपण अनंत जन्म आहोत त्या समाधानाचा अखंड योग घडण्याची परमसंधी समोर आली आहे, हे आपल्याला जाणवतही नसतं. समर्थ सांगतात..

बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा।

परी अंतरीं पाहिजे तो निवाडा।

मना सार साचार तें वेगळें रे।

समस्तांमधें येक तें आगळें रे।। १५२।।

बाबारे, आजवर बरीच तत्त्वचर्चा केलीस, शाब्दिक तत्त्वज्ञान खूप जमा केलंस, पण जीवनातलं सार काय, श्रेय काय, आचरण नेमकं कसं असावं, याचा निवाडा अंतरंगात साधला का?

First Published on December 5, 2017 1:39 am

Web Title: samarth ramdas philosophy 351