जे खरं समाधान आहे ते स्थूल जगाचं कितीही ज्ञान कमावलं तेवढय़ानं प्राप्त होत नाही की सूक्ष्म तत्त्वाचं कितीही ज्ञान कमावलं तरी होत नाही. समाधान काही अनुमानानं, तानमानानं प्राप्त होऊ शकत नाही. हे समाधान योगयागानंही लाभत नाही. आता योगयाग म्हणजे योग आणि यज्ञ. योग हे एकरूपतेचं प्रतीक आहे तर यज्ञ हे तपस्येचं प्रतीक आहे. योग अनेक प्रकारचा आहे. भक्तीयोग, ज्ञानयोग, कर्मयोग वगैरे. तर निव्वळ भक्ती अंगी बाणवणाऱ्या उपायांनी समाधान लाभत नाही की ज्ञानानं किंवा नुसत्या कर्मानं समाधान लाभत नाही. देवाधर्माचं करून, उपासतापास करून, व्रतवैकल्यं करून भक्ती निर्माण होईल, असं वाटून त्या गोष्टींची खूप आटाआटी केली. पण तेवढय़ानं भक्तीचाच संस्कार होईल, असं नाही. उलट सात्त्विक अहंकाराचं बीजही रोवलं जाईल! ज्ञान खूप कमावलं की रामाचा जन्म कसा झाला, कधी झाला, कुठे झाला, त्यानं लंकेपर्यंतचा प्रवास कसा केला.. सगळं रामायण अगदी तोंडपाठ झालं.. तेवढय़ानं रामाची भक्ती अंत:करणात रुजेल, असं नाही. र्कम अनंत केली, पण त्यानं अहंकारच वाढला, तर तो कर्मयोगही लौकिकाच्या अपेक्षेत अडकतो आणि अपेक्षाभंगाच्या दु:खात भरडला जातो. मग त्या कर्मयोगानं समाधान कुठून लाभणार? याग म्हणजे यज्ञ. अर्थात तपानं देह, मन दग्ध करणं, समर्पित करणं.. पण त्या यागानंही ‘खरा भक्त मी,’ हा भाव नष्ट होईलच, असं नाही. तेव्हा योग-यागानंही समाधान लाभण्याची शाश्वती नाही. त्यापुढे दोन महत्त्वाच्या गोष्टी समर्थ सांगतात त्या अशा की, समाधान ना नुसत्या भोगानं लाभेल ना त्यागानं लाभेल! आता हे भोग किंवा भोगणं कुठलं? नेहमीच्या जगण्यातला आपला अनुभव किंवा आपली कल्पना अशी की मनाजोग्या ज्या ज्या गोष्टी वाटतात त्या प्राप्त होणं आणि त्यांचा भोग घेता येणं, आनंद घेता येणं, यासारखं समाधान दुसरं कोणतंही नाही. गोड खायला आवडतं, तर खूप गोड खायला सतत मिळणं म्हणजे समाधान, असंच आपण मानतो. चांगले कपडे घालायला आवडतात, तर खूप कपडे सतत घेता येणं किंवा मिळणं, यासारखं समाधान नाही, असं आपण मानतो. कमी कामात जास्त मोबदला मिळणं, हे समाधान वाटतं आणि तसं झालं की आपल्याला वाटतं, हे समाधान असंच टिकून राहावं! तर भौतिक जगण्यात, नित्याच्या जगण्यात आपण भोगातून समाधान मिळवण्याचा प्रयत्न सतत करतो, पण ते समाधान मिळतंच असं नाही. मिळालं तरी टिकतंच असं नाही आणि ते टिकलं नाही की ‘न होता मनासारिखे दु:ख मोठे,’ हा अनुभवच येतो. आता जेव्हा आध्यात्मिक वाटेवर पाऊल ठेवतो तेव्हा भोगांचं रूप बदलू लागतं. मग गोड आवडतं तर ते इच्छा होताच खायला मिळणं ही भगवंताची कृपा वाटते! म्हणजे भोग नष्ट झाला नसतो, पण त्याला ‘भगवंताची कृपा’ ही भावना चिकटली असते. मनासारख्या गोष्टी व्हाव्यात, ही भोगेच्छेची सुप्त भूमिका नष्ट झाली नसते तर मनासारख्या गोष्टी होण्यात ‘भगवंताची कृपा’ जोखली जात असते! प्रत्यक्ष भोगापेक्षा ही गोष्ट अधिक धोकादायक असते. तेव्हा हा भोग प्राप्त होणंही तितकंच घातक असतं. कारण त्यातून भोगेच्छा नष्ट होत नाही उलट तिला भक्तीचा मुलामा देऊन ती पक्की केली जाते. तेव्हा मनात कोणतीही इच्छा नकोच, अमुक एक व्हावं, हे वाटणं नको किंवा वाटलं तरी ते होणं ही भगवंताची कृपा वाटणं नको! तर भोग मग तो भौतिक असो की आध्यात्मिक प्रगतीमुळे साधला गेल्यासारखा असो, तो काही खरं शाश्वत समाधान देऊ शकत नाही.  भोगाचं दुसरं टोक आहे त्याग. दुसऱ्यासाठी त्याग करणाऱ्या माणसाचं अंत:करण व्यापक, विशाल असतं  असंच आपण मानतो. पण हा त्यागही खरं समाधान देत नाही, असं समर्थ स्पष्टपणे सांगतात!