13 July 2020

News Flash

४९५. भोजन

सृष्टीच्या आधीपासून त्या हरीबरोबर हा शेष होता.

मनोबोधाच्या १५८व्या श्लोकात शेषाचा उल्लेख आहे. समर्थ म्हणतात, ‘‘स्वयें शेष मौनावला स्थीर राहे।’’ आधीचे सर्व चरण हे शास्त्र धुंडाळूनही परमतत्त्वाचं ज्ञान कसं होत नाही, हे सांगणारे आहेत. त्या अनुषंगानं शेषाच्या मौनाचा अर्थ पाहावा लागेल. मुळात शेष कोण आहे? पुराणकथा सांगतात त्यानुसार महाविष्णु त्या शेषावर विराजमान आहे आणि लक्ष्मी त्या महाविष्णुची चरणसेवा करीत आहे. या शेषाला हजारो जिव्हा आहेत आणि त्याचं नाव अनंतशेष आहे. शेष म्हणजे शिल्लक! या अर्थानं पाहाता हा जो अनंतशेष आहे तो या सृष्टीच्या अंतानंतरही तसाच राहातो, या पुराणमतांचा संदर्भ लागतो. म्हणजेच सृष्टीच्या आधीपासून त्या हरीबरोबर हा शेष होता. आता हरीचा अर्थ आपण सद्गुरू घेत आहोत त्यानुसार जो या सृष्टीच्या आधीपासूनही सद्गुरूला जाणत आहे त्यालाही सद्गुरूतत्त्व काय आहे, हे पूर्णपणे उमगलं नाही आणि म्हणून तो मौनच आहे! नुसता मौन नाही तो स्तब्ध आहे.. स्थिर आहे!! आपण मात्र अस्थिर आहोत आणि तसे का आहोत, याचं कारण  समर्थ याच १५८व्या श्लोकाच्या अखेरच्या चरणात सांगतात. हे कारण म्हणजे, आपण मीपणाची जाणीव सांडलेली नाही. ती जोवर सांडली जात नाही तोवर मीपणानं जगातलं रूतणं थांबत नाही. समर्थ म्हणतात :

जेणें मक्षिका भक्षिली जाणिवेची।

तया भोजनाची रुची प्राप्त कैंची।

अहंभाव ज्या मानसीचा विरेना।

तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।।

ज्यानं मीपणाच्या जाणिवेची माशी खाऊन टाकली आहे त्याला भोजनाची गोडी कुठून उरणार! जगाच्या ओढीनं जगाला अंतरंगात सामावून घेण्याचा सर्व इंद्रियांची धडपड हेच ते भोजन आहे! केवळ ‘मीपणा’च्या जाणिवेनं ते क्षणोक्षणी सुरू आहे . या जाणिवेची ती माशी आहे! माशी जशी चेहऱ्याभोवती घोंगावत राहाते तेव्हा दुसरं काही सुचत नाही. अगदी त्याप्रमाणे ही मीपणाच्या जाणिवेची माशी आपल्या अंत:करणात सतत घोंगावत असते तेव्हा सतत जगाला चिकटण्याचीच धडपड मन करीत असतं. ती भुणभुणणारी, घोंगावणारी माशीच जो खाऊन टाकतो म्हणजेच जो मीपणाची जाणीव नष्ट करतो त्याला मग जगातल्या अशाश्वत सुखाची ओढ उरत नाही. ज्याच्या मनातला हा अहंभाव विरत नाही त्याच्या पोटी शुद्ध तत्त्वज्ञानाचा आहार जिरत नाही आणि पचत नाही! त्यामुळे ‘मनोबोधा’च्या १६० ते १६२ या तीन श्लोकांत समर्थ अहंकाराचा निरास करण्याची गरज मांडतात. या अहंकारातूनच नाना वाद आणि भेद निर्माण होतात. त्यातून जो जाणता आहे त्याच्याशीही हुज्जत घालण्याची सवय जडते. त्यातून अहंभाव मनात अधिक घट्ट होतो. (नको रे मना वाद हा खेदकारी। नको रे मना भेद नानाविकारी। नको रे मना सीकऊं पूढिलांसी। अहंभाव जो राहिला तूजपासीं।। १६०।।). या अहंकारानं केवळ दु:खच वाटय़ाला येतं. आपल्या तोंडचं शाब्दिक ज्ञानही वाया जातं. या अहंभावातून मुक्त झाल्याशिवाय सुख नाही आणि त्यायोगे खऱ्या अर्थानं सुखी राहिल्याशिवाय अखंड सुखही नाही. त्यामुळे हे मना तुझ्यात अहंता कुठे कुठे भरून आहे, याचा शोध घे. (अहंतागुणें सर्वही दुख होतें। मुखें बोलिलें ज्ञान तें व्यर्थ जातें। सुखी राहतां सर्वही सूख  आहे। अहंता तुझी तूंचि शोधूनि पाहें।। १६१।।).  १६२व्या श्लोकात समर्थ सांगतात की, अहंतेमुळे नीती, विवेक सांडला जातो. अनीतीचं बळ वाढतं. तरी शाब्दिक ज्ञानापायी लोक मान देत असतात. त्याच्या अंतरंगात डोकावलं तर मात्र खरी स्थिती काय ते उमगतं.  तरीही तो आपल्या वागण्याचं समर्थन करण्यासाठी मनाला येईल ती प्रमाणं देत जातो. या घसरणीमुळे त्याची सद्सदविवेकबुद्धी त्याला सोडून जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2017 1:33 am

Web Title: samarth ramdas philosophy 356
Next Stories
1 ४९४. जाणता मूर्ख!
2 ४९३. तया सांडुनि!
3 ४९२. अंतरीची खूण
Just Now!
X