X
X

४९९. ज्याचा त्याचा देव

ज्याला जो देव मोठा वाटतो त्याच्या उपासनेकडे माणूस वळतो.

 

माणसाला चमत्काराची आस असते आणि पुराणकथांमधून देवांच्या कृपेचे चमत्कार वाचून आणि ऐकून त्याला असं सुप्तपणे वाटत असतं की देवाची कृपा झाली, तर आपल्या जीवनातही चमत्कार घडेल. आता आपल्या जीवनातला चमत्कार म्हणजे सारं काही आपल्याच मनासारखं घडत जाईल. त्यासाठी ज्याला जो देव मोठा वाटतो त्याच्या उपासनेकडे माणूस वळतो. सुरुवातीला ही गोष्ट स्वाभाविक असते, पण जसजशी आंतरिक जाण वाढत जाईल, तसतसं आपल्या या ‘भक्ती’चं परीक्षण सुरू झालं पाहिजे. मग खरा देव कोणता, याचाही शोध सुरू झाला पाहिजे. पण असं कुणीच करीत नाही! जगात कोटय़वधी देव नांदत आहेत आणि ज्याला जो देव रुचतो त्याचीच भक्ती खरी मोलाची, असं मतही जो-तो मांडत आहे! याचं अतिशय चपखल वर्णन करताना समर्थ सांगतात : ‘‘जया मानला देव तो पूजिताहे। परी देव शोधूनि कोणी न पाहे। जगीं पाहतां देव कोटय़ानकोटी। जया मानिली भक्ति जे तेचि मोठी।। १७८।।’’ हा खरा देव म्हणजे खरा सद्गुरू! या सृष्टीच्याही आरंभी जे काही तत्त्व होतं आणि या सृष्टीच्या अंतानंतरही जे काही तत्त्व शेष राहाणार आहे ते परमतत्त्व! त्या सद्गुरूचा शोध कुणी घेत नाही. समर्थ स्पष्ट सांगतात : ‘‘तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले। तया देवरायासि कोणी न बोले। जगीं थोरला देव तो चोरलासे। गुरूवीण तो सर्वथाही न दीसे।।’’ जिथून या चराचराचा उगम आहे तिथं जो स्थित आहे त्या देवरायाला कुणी शोधत नाही. तो थोरला म्हणजे खरा देव या जगात चोरून राहातो. म्हणजेच स्वत:चा कोणताही बडेजाव न करता राहतो. तो आपल्या मोठेपणाचं ओझं कधीच बाळगत नाही. तो गुरुशिवाय दिसत नाही. म्हणजेच गुरूच्या रूपातच तो असतो त्यामुळे गुरूशिवाय अन्य आकारात त्याचं दर्शन होत नाही. आता हा गुरू म्हणजे खरा सद्गुरूच. साधकानं खोटय़ा, भोंदू गुरूंमध्ये फसू नये यासाठी समर्थ सावध करताना सांगतात : ‘‘गुरु पाहतां पाहतां लक्ष कोटी। बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी। मनीं कामना चेटकें धातमाता। जनीं व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता।। १८०।।  नव्हे चेटकू चाळकू द्रव्यभोंदू। नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू। नव्हे उन्मत्तू व्यसनी संगबाधू। जनीं ज्ञानिया तोचि साधु अगाधु।। १८१।।  नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी।। क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी। मुखें बोलिल्यासारखें चालताहे। मना सदगुरू तोचि शोधूनि पाहे।।’’ या जगात पाहू जाता कोटय़ानुकोटी गुरू आहेत. मंत्रही कोटय़ानुकोटी आहेत. कित्येकजण अद्भुत शक्ती दाखवून लोकांना भुलवणारे आहेत. त्यांच्या मनात कामना असतात आणि काही आकर्षक काल्पनिक गोष्टी (धात) आणि काही खऱ्या गोष्टी (मात) सांगून ते साधकाच्या मनावर गारूड करून त्याला मोहभ्रमात फसवतात. या अशा गुरुचा संग व्यर्थ आहे. त्यानं खरी मुक्ती मिळणार नाही. भुलवणारे, फसवणारे, पैसा हडप करणारे भोंदू, दुसऱ्याची निंदा करणारे, मत्सर करणारे आणि स्वत: भक्तीमध्ये मंद असणरे, उन्मादात आणि व्यसनात अडकलेले तसंच ज्यांचा नुसता सहवासदेखील आपल्या आंतरिक स्थितीला बाधक ठरू शकतो, असे स्वयंघोषित गुरू हे सद्गुरू नव्हेत. समर्थ म्हणतात, हे साधका, संतजनांमध्ये वावरत असताही जो आपल्या स्वरूपाबद्दल पूर्ण जागृत आहे, तोच अगाध असा सद्गुरू आहे! ज्याच्या पोटात केवळ कामना आहेत आणि जो वावगं आणि देहबुद्धी जोपासणारं बोलण्यातच रमतो तो कामाचा नाही. तो एकीकडे शुद्ध ज्ञान तर सांगतो, पण तशी क्रिया करीत नाही. जो बोलल्याप्रमाणे वागतो, अशा सद्गुरूचा, हे मना तू शोध घे! आता हा शोध घ्यायचा म्हणजे काय? तर संतजनांमध्ये जो सद्गुरू भासत आहे त्याची खूण समर्थबोधाशी पटवायची आहे!

24
Just Now!
X