X

५०६. धाराप्रवाह

दक्षिण काशी असा लौकिक असलेल्या नाशिकजवळ टाकळी नावाचं एक स्थान आहे.

दक्षिण काशी असा लौकिक असलेल्या नाशिकजवळ टाकळी नावाचं एक स्थान आहे. समर्थानी एक तप म्हणजे बारा र्वष या स्थानी तपश्चर्या केली. त्या स्थानाचं आजचं स्वरूप कालपरत्वे पालटलं आहे, पण समर्थानी साकारलेली हनुमंताची गोमय मूर्ती तशीच आहे. याच मंदिराच्या लगत समर्थाचं जमिनीखालील विश्रांतीस्थान आहे. शिवरायांच्याही जन्माआधी तिथं समर्थाची आणि शहाजीराजे यांची भेट झाल्याचा उल्लेख तिथं नोंदला आहे. समर्थाच्या काळी त्याचं स्वरूप एखाद्या खंदकासारखं किंवा भुयारासारखं असावं. आता ते नीट बांधलेलं आहे आणि खाली उतरायला पायऱ्याही आहेत. बरोबर दोन वर्षांपूर्वी एका सायंकाळी त्याच भुयारात ‘मनोयोग’ सदराचा श्रीगणेशा झाला. समर्थाची प्रार्थना करून एकटाकी सहा भाग उतरवले गेले आणि सलग दोन र्वष समर्थकृपेनं हा प्रवाह सतत वाहता होता. खरंतर ‘श्रीमनाचे श्लोकां’बाबत अंतरंगात खूप पूर्वीच प्रेम निर्माण झालं होतं. कर्नाटकात बंगळुरूजवळ मी आठेक दिवसांसाठी गेलो होतो. तिथं लेखक, कलावंत यांच्यासाठी सरकारनं उभारलेल्या बंगलीवजा घरांच्या निसर्गरम्य परिसरात वास्तव्य होतं. मी सहसा त्या आवाराबाहेर कधी पडलोच नाही. एक तर तेव्हा कानडीतलं एक अक्षरही समजत नव्हतं आणि शहरात फिरायची फारशी इच्छा नव्हती. बरोबर फक्त ‘श्रीमनाचे श्लोकां’चं लहानसं पुस्तक होतं. त्यामुळे त्या निसर्गरम्य वातावरणात मी रोज ते श्लोक गात असे. न्याहरी, गरम पाणी, भोजन वगैरे आणून देणारी कानडी मुलं काहीशा कुतूहलानं क्षणभर पाहात आणि निघून जात असत. पण त्या वास्तव्यात त्या श्लोकांचा असा आंतरिक संग झाला की बहुतेक श्लोक पाठ झाले. काही श्लोक उच्चारू लागताच अंत:करण हेलावून जात असे. मग त्या श्लोकांच्या शब्दांआड लपलेले गूढार्थही अधेमधे खुणावू लागले. तरीही ते स्पष्टपणे उकलले नव्हते. त्यानंतर काही वर्षांनी सद्गुरूसंगाचा परमयोग आला. त्यांच्यामुळेच ‘श्रीमनाचे श्लोकां’चा खरा अर्थ थोडा थोडा समजू लागला. हे श्लोक कसे जन्माला आले, ते मागे सांगितलं आहेच. शिष्याच्या मनात सद्गुरूंवरील विश्वास दृढ करणं आणि त्यांच्या संगाचं महत्त्व बिंबवणं, हा या श्लोकांचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा,’या पहिल्या श्लोकाच्या पहिल्या चरणापासूनच सद्गुरूंचाच उल्लेख सुरू होतो, हे जाणवलं. समर्थच नव्हे, प्रत्येक संतानं आपल्या ग्रंथारंभी सद्गुरूस्मरणच केलं आहे. मग ‘ज्ञानेश्वरी’तली ‘ॐ नमोजी आद्या’ ही ओवीसुद्धा ओमकारस्वरूप, आद्य अशा सद्गुरूचीच वंदना करणारी आहे, हे लक्षात आलं. तेव्हा सद्गुरू हा केंद्रबिंदू असल्याचं कळताच  सर्वच श्लोकांचा अर्थ त्याच अनुषंगानं सहज समोर येत गेला. कित्येक श्लोकांचे अर्थ तर मलाही नव्यानेच समजले आणि आश्चर्यानंदही झाला. जो अर्थ प्रचलित आहे, तोही त्याच्या जागी योग्यच आहे, पण साधकासाठीचा जो गूढार्थ असावा त्याचाच शोध या सदरातून घेतला गेला. त्यात यश आलं, असा दावा नाही. कारण समर्थकृपेनं लिहिलं गेलं असलं तरी माझ्या आकलनाला मर्यादा आहेत. समर्थ साहित्याचा अभ्यास करणारे आणि समर्थ कार्याचा वारसा निष्ठेनं सांभाळणारे काही तपोवृद्धही या सदराचं वाचन, समर्थावरील प्रेमापोटी करीत. या जाणिवेनं सद्गुरूंना जे अभिप्रेत आहे तेच कागदावर उतरावं, यासाठी चित्त्यैकाग्रतेसाठी त्यांचीच करुणा भाकावी लागली. समर्थाचा स्पर्श लाभलेल्या सातारा आणि नाशिक या जिल्ह्य़ांतही सदराचं बरचंसं लेखन झालं, हा योगही सामान्य नव्हता. गेल्या काही दिवसांत सदराचा समारोप अतिशय वेगानं सुरू होता, पण तीदेखील मी सद्गुरूइच्छाच मानतो. कारण त्यात सद्गुरूंचंच गुणगान होतं आणि असं जाहीर गुणगान त्यांना सहसा आवडत नाहीच!