मनोबोधाच्या २७व्या श्लोकाची सुरुवातच जोरकस सवालानं आहे.. भवाच्या भयें काय भीतोस लंडी। हे भित्र्या, भवभयानं गांगरून कशाला जातोस? आणि पुढे समर्थ सांगतात.. धरीं रे मना धीर धाकासि सांडीं। धीर धर आणि धाक सोडून दे! भवाचं भय! भव म्हणजे आपल्याला जे भावतं ते. आज आपल्याला भौतिक अधिक भावतं. पण हे भौतिक कसं आहे? तर ते सदोदित बदलणारं आहे. अर्थातच अस्थिर आणि अशाश्वत आहे. या भौतिकाशी आपला संयोग आणि वियोग ठरलेला आहे. बरं हे भौतिक भौतिक म्हणजे तरी काय? तर आपल्या भोवतालचं जग.. हे जग वस्तू आणि व्यक्तींनी बनलेलं आहे. यातल्या ज्या वस्तू आणि ज्या व्यक्ती आपली अपूर्णता दूर करून आपल्याला पूर्णत्व देतात, अतृप्ती दूर करून तृप्त करतात, अस्वस्थता दूर करून स्वस्थता देतात असं आपल्याला वाटत असतं त्या त्या वस्तू आणि व्यक्तींचा सदोदित संयोगच राहावा, वियोग कधीच घडू नये, असं आपल्याला वाटत असतं. बरं आपलं जगणं जसं काळाच्या पकडीतलं आहे तसंच या वस्तू आणि व्यक्तिंचं अस्तित्व आणि जगणंही काळाच्याच पकडीतलं आहे. त्यामुळे आपल्यासकट या समस्त भौतिकात काळाच्या प्रभावामुळे घट, बदल आणि नाश  होतच असतो. तरीही हे अशाश्वत आणि अस्थिर भौतिक मिळवून त्यातून स्थिर आणि शाश्वत सुख शोधण्याची आपली धडपड आजन्म सुरू राहाते.  तिच्यात कधीही यश मात्र येत नाही. त्यामुळेच हे जे आपल्याला भावणारं भौतिक आहे तेच आपल्याला भोवत असतं! त्यातही गंमत म्हणजे या भौतिकातल्या काही गोष्टी आपल्याला हव्याशा वाटत असतात तर काही गोष्टी आपल्याला नकोशा वाटत असतात. त्यामुळेच या भौतिकातल्या चढउतारांचं आपल्याला सदोदित भय वाटतं.. ज्या गोष्टी, ज्या व्यक्ती नकोशा आहेत त्याच तर वाटय़ाला येणार नाहीत ना, हे भय असतं. तसंच ज्या व्यक्ती हव्याशा वाटत आहेत त्या दुरावणार तर नाहीत ना, हे भय वाटत असतं. त्यामुळेच भव हे भयच उत्पन्न करीत असतं. या भवाला सामोरं जाताना म्हणूनच आपण गांगरून जातो. मग या भौतिकातलं पाऊल उचलून अध्यात्माच्या पथावर पाऊल टाकताना ही भीती मनात वाढणारच ना? कारण अध्यात्म म्हणजे नेमकं काय, याचं ना आपल्याला ठोस आकलन असतं ना आपल्या भवतालच्या जगातल्या ‘आपल्या’ माणसांना आकलन असतं. त्यामुळे आपण मनातून गांगरतोच आणि हे जगही ही भीती वाढविण्यातच हातभार लावतं. पू. बाबा म्हणत ना? लहान मुलाला टाळ्या वाजवून ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणायला आपण कौतुकानं सांगतो, पण तोच मुलगा मोठा होऊन ‘विठ्ठल विठ्ठल’ करू लागला तर त्याच्या घरच्यांना चिंता वाटते! आपल्यालाही वाटतं की अध्यात्म म्हणजे आजवर जे जे सारं आधारवत वाटत होतं त्याची तमा बाळगायची नाही, आजवर ज्या ज्या गोष्टी सुखाच्या वाटत होत्या, त्यांच्याबद्दल अलिप्त भाव जोपासायचा. आपल्याला याचीही भीती वाटते. मग आध्यात्मिक प्रगतीची उत्तुंग इमारतही हवी, पण ‘मी’पणाचं झोपडंही हवं, अशा धडपडीत आपली साधना सुरू असते! त्यामुळेच समर्थ खडसावतात की, अरे! या भवभयानं कसला गांगरून जातोस? तुकाराम महाराजांनी एका अभंगात झाडाला मिठी मारून बसलेल्या माणसाचं रूपक वापरलंय. लोक त्याला म्हणतात, अरे कशाला झाडाला धरलं आहेस? तर तो म्हणतो, अहो या झाडानंच मला धरून ठेवलंय, सोडतच नाही ते! तसं या भवाला आम्हीच घट्ट धरलंय आणि या भवतालावर नाचून नाचून दमलो असूनही त्या भवाची खरी किंमत उमगून त्या भवाबाबत अलिप्तता येत नाही. कारण आमचं खरं प्रेम, खरा भाव, खरा विश्वास या भवावरच आहे!

चैतन्य प्रेम

Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
gondwana supercontinent overview interesting facts about gondwana supercontinent
भूगोलाचा इतिहास : गोंडवाना के भुईया मा..
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड