X

३४. दीन-दास : २

दीन-दास या शब्दाची फोड दोन प्रकारे करता येईल.

दीन-दास या शब्दाची फोड दोन प्रकारे करता येईल. एक म्हणजे भगवंताचा दीन असा दास आणि दुसरा अर्थ जो दीन आहे त्याच्यासमोर भगवंताचा दास म्हणून वावरत असलेला सद्गुरू! तसं पाहता सद्गुरूही जिवाचीच सेवा करीत असतात! कुणाला वाटेल, सद्गुरू जिवाची सेवा करतात की जीव त्यांची सेवा करतो? तर एवढंच सांगता येईल की अज्ञान, भ्रम आणि मोहात पूर्ण बुडालेल्या जिवाला त्यातून बाहेर काढून खऱ्या अर्थानं स्वतंत्र करणं, यापेक्षा अधिक मोठी सेवा अन्य कोणतीही नाही आणि ही प्रक्रिया सद्गुरूंशिवाय कुणीही पार पाडत नाही. तर ही पाश्र्वभूमी लक्षात ठेवत, मा. पुं. पंडित यांच्या चिंतनाचा जो परिच्छेद गेल्यावेळी आपण वाचला होता, त्याचा मागोवा आता घेऊ. यात पंडित हे मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीचा उल्लेख करतात आणि त्या उत्क्रांतीत जो विकास घडत गेला त्याचा उल्लेख करतात. पण ही उत्क्रांती किंवा हा विकास म्हणजे आध्यात्मिकच आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे माणसानं जी आध्यात्मिक उत्क्रांती साधली आहे आणि त्याद्वारे जो आंतरिक विकास साधला आहे त्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची संमती आणि सहकार्य अनिवार्य असतं. म्हणजे काय? तर सद्गुरू बोध भरपूर करतील हो, पण जिवानं तो ऐकला तर पाहिजे, त्यानुरुप आचरण तर केलं पाहिजे! या मार्गात ज्या अनेक विघ्नबाधा येतात त्यातली सर्वात पहिली विघ्नबाधा असते ती जीवहट्ट! म्हणजे आधी जीवच नीट ऐकून घ्यायला तयार नसतो, आपला देहबुद्धीचा हट्ट सोडत नसतो. या जीवाचा उद्धार करण्यासाठी प्रेषित अर्थात परमात्म्याचा दूत असा सद्गुरू आला असतो, पण त्याला प्रत्येक वेळी आपल्या बोधाला, आपल्या सांगण्याला जीव काय प्रतिक्रिया देईल, प्रतिसाद देईल आणि सहयोग कितपत देईल, याचा विचार करावा लागतो. साईबाबा त्यांचे अनन्य भक्त श्यामा याला म्हणाले की, ‘‘शामा हा तुझा आणि माझा ७४वा जन्म सुरू आहे. तुला ते जन्म आठवत नाहीत, पण मला आठवतात.’’ याचाच अर्थ इतके जन्म जिवाला आपल्या बोधाकडे वळवण्याची प्रक्रिया अथक सुरू होती. त्या प्रत्येक टप्प्यावर तो बोध आचरणात आणवताना त्या जिवाच्या आंतरिक तयारीचा, आकलनाचा, इच्छेचा किती विचार करावा लागला असेल! मग साईबाबा काय समर्थ नव्हते? होतेच, पण तरीही जीवाचा हट्ट अधिक समर्थ असतो! ज्याचा उद्धार करायचा त्याची त्या उद्धारासाठी अनुमती घ्यावी लागते. जीव कसा आहे? त्याला ‘मी’पणाची क्षुद्र झोपडीही जपायची आहे आणि त्याच जागी आध्यात्मिक ज्ञानाचा उत्तुंग महालही बांधून हवा आहे! तो महाल बांधायचा तर आधी झोपडी पाडावी लागणारच ना? ती पाडण्यासाठी जिवाची अनुमती घ्यावीच लागणार ना? देहबुद्धीच्या सवयींनीच माणूस ‘मी’पणात चिणला आहे. त्या सवयी सोडल्याशिवाय उद्धार म्हणा, विकास म्हणा शक्य नाही आणि त्या सवयी त्याला सोडता सोडवत नाहीत. म्हणून तो आधी प्रत्येक बोध आचरणात आणताना विरोधी सूर उमटवतोच. ते पाऊल टाकतानाही त्याबदल्यात भौतिकातल्या कोणत्या ना कोणत्या लाभाची त्याला आस असते. सद्गुरूच्या सामर्थ्यांचा पुरावा हवा असतो. जीवनात काही ‘आश्चर्यकारक’ घडून भौतिक इच्छा पूर्ण होण्यात हा पुरावा तो जोखत असतो. या जीवहट्टासाठी सद्गुरूंनादेखील प्रथम जिवाच्या पातळीवर खाली उतरावं लागतं. यात साहजिकच कार्याचा दर्जा कमी होतो, अनावश्यक विलंब होतो व परिणामांविषयी अनिश्चितता निर्माण होते!

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

Outbrain

Show comments