नित्याचा नेम करायचा तो नित्याच्या अनुभवासाठी. अनुभव सांगण्यासाठी नव्हे, स्वत: घेऊन त्यात रममाण होण्यासाठी. एक खरं की माणसाला एखादी गोष्ट सुरू केली की त्यातील प्रगतीचा काहीतरी अनुभव यावासा वाटतो. नोकरी करीत आहे तर काम चांगलं होणं, केलेल्या कामाबद्दल कौतुक होणं, पगार वाढणं किंवा बढती मिळणं.. या गोष्टी नसतील तर नोकरी करण्यात माणसाला गोडी वाटत नाही. तेव्हा व्यावहारिक जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत माणूस प्रगती जोखत असतो, नफा जोखत असतो, लाभ जोखत असतो. अगदी त्याचप्रमाणे साधना करून काय लाभ होतो, हेदेखील सूक्ष्मपणे तो जोखू पाहातो. विमला ठकार म्हणतात त्याप्रमाणे साधना जर नेटानं आणि सातत्यानं सुरू झाली तर शरीरात रासायनिक बदलही होतात. त्यामुळेच माणसाला डोळे मिटल्यावर अवर्णनीय असा प्रकाश वा रंग दिसू शकतो, अवर्णनीय असा नाद किंवा ध्वनी ऐकू येऊ शकतो. तर असा काहीतरी अनुभव आला तरी माणूस एकदम हुरळून जातो. त्यानं हुरूप वाढून तो अधिक चिकाटीनं साधनेला लागला, तर गोष्ट वेगळी. पण हा जो क्षणिक अनुभव आला, ओसरणारा असा, ओझरता असा अनुभव आला तो दुसऱ्याला सांगण्यात त्याला अधिकच गोडी वाटते. आता मोठी मौज आहे! समर्थ तर सांगतात, साधना नेटानं करा, पण अनुभव दुसऱ्याला सांगू नका! मग नित्यनेमात काय रस उरणार? म्हणून समर्थ काय सांगतात? ‘‘राम जपे त्याचें चित्त पाहतो।’’ बाबा रे, जो जप करतो त्याचं चित्त तेवढं राम पाहातो! त्याचा अनुभव पाहात नाही!! जो जप करू लागतो त्याचं चित्त पाहाण्याचं काम राम अर्थात सद्गुरू लगेच सुरू करतो.. पुढे तर फार बहारीचं सांगतात.. ‘‘राम जपे त्याचें चित्त पाहतो। जप करितां शीण येतो। विकल्प अंतरीं प्रवेशतो। तरी ढळेना मेरू जैसा।। ४०।।’’ समर्थ काय, सर्वच संत मोठे मानसशास्त्रज्ञच होते हो! काय म्हणतात? जप करणाऱ्याचं चित्त राम पाहात असतो, पण जप करणाऱ्याला जप करता करता शीण येतो.. नुसता जप करीत राहायचं आहे ना? अनुभवांची प्रसिद्धी नाही ना? तर मग शीण येतो.. मग अंत:करणात विकल्प प्रवेश करतो आणि इथंच खूप सांभाळायचं आहे.. विकल्प म्हणजे शेवाळ धरलेली निसरडी वाट.. तिथून घसरण्याचा धोका फार.. एकदा विकल्प शिरला की कल्पांतापर्यंत तो साधकाला विरुद्ध दिशेलाच नेत राहील.. पण असा विकल्प आला, जपात शीण आला तरी साधकानं साधना सोडता कामा नये. अगदी मेरु पर्वताप्रमाणे स्थिरपणे साधना अखंड करीतच राहिलं पाहिजे. पुढे म्हणतात, ‘‘कां प्रपंचीं होती थोर आघात। तेणें चित्त होय दुश्चित्त। देहासी आपदा होती अत्यंत। तरी रामासी विसरूं नये।।’’ या चरणातही एक उपरोध आहे बरं का! कसा ते पाहू.. आधी चरणाचा अर्थ पाहू. साधना करीत असलेल्याच्या मनात विकल्प का येऊ शकतो, याची यादीच या चरणात आहे. समर्थ म्हणतात की, प्रपंचात मोठा आघात झाला की चित्त दुश्चित्त होतं. देहावर संकट आलं, आजारपण आलं किंवा शरीरात काही बिघाड झाला की चित्त अस्थिर होतं. तरीही रामास विसरू नये. सद्गुरूंच्या बोधास विसरू नये.. आता पहिली गोष्ट ही की आपण परमार्थात का आलो? साधनापंथावर का आलो? प्रपंच चांगला करायला? घर-दार टिकावं म्हणून? आर्थिक प्रगती व्हावी म्हणून? तसं असेल तर त्यासाठीचे व्यवहारातले मार्ग आहेतच ना? मग खुशाल व्यवहारातले प्रयत्न करा की, साधनेवर ते ओझं का? पण नाही.. आत्मकल्याणाचा हेतू सांगत माणूस साधनपथावर येतो आणि प्रत्यक्षात देहकल्याण, प्रपंचकल्याणाचाच जप सुरू करतो. या चरणातला खरा उपरोध मात्र आपल्यातल्या प्रपंचाच्या आसक्तीवर बोट ठेवणारा आहे. तो आता पाहू.

-चैतन्य प्रेम

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा