समर्थ विचारतात, ‘‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे। असा सर्व भूमंडळी कोण आहे?’’ समर्थाचा जो सेवक आहे त्याच्याकडे वाकडय़ा नजरेनं पाहण्याची शक्ती या सर्व भूमंडळात, या जगात, या चराचरात कुणाकडेच नाही. हा परमलाभ ‘सेवका’लाच मात्र आहे आणि खरी ‘सेवा’ होत नसेल, तर खरा सेवकही होणं शक्य नाही! या सेवेच्या आड काय येतं हो? तर मी सेवा करतो, मी समर्थाचा सेवक आहे, हा ‘मी’च आड येतो! ‘श्री अवध भूषण रामायणा’त म्हटलं आहे : ‘‘गुरु पद सेवा अहम भाव ते।। होइ न तम आवरण चाव ते।।’’ श्री सद्गुरूंची सेवा अहंभावानं होऊच शकत नाही. ‘आवरण’ म्हणजे देह आणि ‘तम आवरण’ म्हणजे देहाची आसक्ती. या देहाचीच आसक्ती असेल, आवड असेल तर ही सेवा होऊच शकत नाही. कारण गेल्याच भागात म्हटल्याप्रमाणे खरी सेवा म्हणजे त्यांच्या बोधाचं सेवन आणि त्यानुरूप आचरण हीच आहे. अशा ‘सेवे’च्या आड म्हणजेच त्यांचा बोध पटण्याच्या आणि त्यानुसार आचरण करण्याच्या आड माझा अहंकार, माझी देहासक्तीच येत असते! कारण माझ्यासाठीची त्यांची प्रत्येक आज्ञा, माझ्यासाठीचा त्यांचा बोध हा माझ्यातल्या अहंकाराच्याच विरुद्ध असतो. माझी देहातली आवड मोडणाराच असतो. माझा स्वभावदोष दूर करणारा असतो. माझा अहंकार, ‘मी’ आणि ‘माझे’चा हट्टाग्रह अर्थात देहासक्ती आणि माझ्यातले स्वभावदोष यामुळेच तर माझ्यात आणि जगात ताण असतो! श्रीसद्गुरूंच्या बोधानुरूप जगण्याचा अभ्यास जसजसा वाढू लागेल तसतसा ‘मी’ खरा कोण आहे, ‘मी’ खरा कुणाचा आहे, हे उमगू लागेल. मग ‘माझे’पणाची दृष्टीही बदलू लागेल. ‘मी’ खरा कोण आणि कुणाचा आहे, हेजितकं उमगू लागेल तितकं ‘माझे’ खरे कोण आहेत, हेही उमगू लागेल. जगाचं खरं स्वरूप उकलू लागलं की या जगाची ओढ, या जगाचा हव्यास ओसरू लागेल. जगाकडूनच्या भ्रामक अपेक्षा कमी होऊ लागतील. मग जगामध्ये धावण्याची, जगाच्या दास्यत्वाची, जगाच्या सेवेची सवय तुटू लागेल. मग खऱ्या अर्थानं समर्थ अशा सद्गुरूंची अव्यभिचारी सेवा घडू लागेल! जो अशा सेवेत रत आहे त्याच्याकडे त्रिभुवनातील कुणीही वाकडय़ा नजरेनंपाहू शकणार नाही.

indian model of secularism
संविधानभान : धर्मनिरपेक्षता : समज व गैरसमज
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…

आता या भूमंडळाचा, तीन लोकांचा उल्लेखही या श्लोकात आला आहे. स्वर्ग, भूमी आणि पाताळ हे तीन लोक आपण जाणतो. हे तिन्ही आपल्या जीवनातही आहेत. पाताळलोक हा या भूलोकाच्या खाली आहे. तो दिसत नाही. स्वर्गलोक हा या भूलोकाच्या वर आहे तोही दिसत नाही. मध्ये असलेला भूलोक मात्र दृश्यमान आहे. माणसाच्या दृश्य जगाचा पसारा या भूलोकीच आहे. पाताळलोकात प्रामुख्यानं नरक आहे, असं पुराणकथा सांगतात. माणसाचं सुप्त मनही असंच अनेकानेक विकार-वासनांनी भरलेलं असतं. वाईट हेतू, वाईट कल्पना, वाईट विचारांचा झंझावातही इथं असतो. या वाईटावर पडदा टाकून माणूस व्यवहार करतो, वावरतो. साधना प्रामाणिकपणे सुरू झाली की सुप्त मनाची घडण बदलू लागते. सुप्त मन उदात्त विचारांनीही भारलं जातं. हाच स्वर्गलोक! पण असं असलं तरी सुप्त मनात वाईट विचार कधी उसळतील हे सांगता येत नाही, सुप्त मनातले चांगले विचारसुद्धा वाईट विचारात कसे वेगानं रूपांतरित होतील, हे सांगता येत नाही. प्रत्यक्ष व्यवहारातला तोलही कधी ढळेल आणि विसंगतीनं जगणं भरून जाईल हेही सांगता येत नाही. श्रीसद्गुरूंच्या बोधानुरूप जगण्याचा अभ्यास प्रामाणिकपणे, चिकाटीने सुरू असला तर मात्र या दृश्य आणि आंतरिक त्रिभुवनावर श्रीसद्गुरूंचीच कशी सत्ता आहे, हे जाणवू लागेल. माझ्यातील विकार माझं काही वाकडं करू शकणार नाहीत!

चैतन्य प्रेम